सोमवार, १५ मार्च, २०२१

डोळे





पिवळे डोळे 

 

    इथल्या डोहातील स्वच्छ नितळ पाणी पिताना मला माझ्या डोळ्यांचे प्रतिबिंब दिसले. किती सुंदर आहेत माझे डोळे. एकदम पिवळे! तशी मी सुद्धा सुंदरच आहे, पण बाकी सगळे मला घाबरतात. नक्कीच त्यांना मी विद्रुप दिसत असेल किंवा माझं ओरडणं त्यांच्या हृदयात धडकी भरवत असेल. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. माणसं जर मला घाबरली नाहीत तर मग कालच्यासारखा प्रसंग ओढावतो. खूप मोठ्या संकटातून वाचले मी काल आणि रातोरात माझ्या मुलांना घेऊन इथे निघून आले. 

 

    ही जागा मला आवडली! इथे माझी आवडती वडा-पिंपळाची झाडे आहेत. मनासारखा डोंगर आहे. तोही गावापासून लांब, माणसांपासून लांब आणि माथ्यावर कसलं मंदिरपण नाही. नाहीतर माणसांना खूप हौस, दिसला डोंगरमाथा की बांधलं मंदिर! तसंही आम्ही कधी मंदिरांजवळ जात नाही. तिथं सतत माणसांची वर्दळ असते.

 

    मी आधी सुद्धा गावापासून थोडी लांबच राहत होते. पण काही दिवसांपासून मला शिकार मिळणं अवघड व्हायला लागलं. त्यात मला वाघासारखी दोन मुलं. त्यांची बकासुरासारखी मोठी भूक! त्यामुळं मला कधी कधी गावाजवळ जाऊन शिकार शोधावी लागायची. तसंही मी माणसांवर कधीच झडप घातली नाही कारण आमच्यात असं म्हणतात की माणसाचं रक्त तोंडाला लागलं तर  त्याची सवयच लागते. ही सवय शेवटी जीव गेल्यावरच जाते. जुन्या काळात आम्ही बिनदिक्कत माणसांच्या मागे लागायचो. पण आता काळ बदलला आहे. त्यात माणूस प्राणी म्हणजे खूपच वाईट. तो मुळात प्राणी म्हणण्याच्या लायकीचापण नाही. असं म्हणतात की शंकराने त्याला तयार केल्यानंतर खूप मोठी चूक झाली म्हणून स्वतःच डोकं फोडून घेतलं आणि हिमालयात जाऊन प्रायश्चित करत बसला. त्याच्या कोपाने माणसाची कातडी जळून गेली आणि म्हणून तो कपडे घालून फिरतो आणि उठसूट मंदिरं बांधून देवाचा धावा करत बसतो. जुन्या काळात तर ही माणसं प्राण्यांची शिकार करून त्यांची कातडी अंगावर घालायचे. अजूनही प्राण्यांच्या कातडीने बनवलेल्या वस्तू पायात घालून फिरतात. किती दुष्ट जात! मी कधीच त्यांच्या वाटेला गेले नाही. मी फक्त लहान सहान प्राण्यांच्या मागावर असते. माणसांमुळे तेपण मिळणं अवघड झालं म्हणून गरज लागली तरच गावाजवळ जाऊन सावज शोधते.

 

    काल खूप दिवसांपासून शिकार मिळली नाही म्हणून मुद्दाम मी गावाजवळच्या जंगलात दबा धरून बसले. पायवाटेपासून थोडं लांब, माझ्या आवडत्या पिंपळाच्या झाडाखाली आडोशाला लपले. काल आमावश्येची रात्र होती, म्हणजे सूर्य खाली गेला की मी अंधारात वस्तीजवळ जाऊन काही मिळतं का ते पाहणार होते. तेव्हाच सारं घडलं. अजूनही आठवून अंगावर काटा येतो. 

 

    नुकताच दिवस मावळायला आला होता. मला पायवाटेने कुणीतरी येतंय असं जाणवलं. मी खरं तर तेव्हाच पळ काढायला पाहिजे होता पण मी थोडा गाफीलपणा केला. मला आधी पायांचा आवाज आला. मी ओळखलं की कोणीतरी माणूस चालत येतोय. मी तशी माणसांना जास्त घाबरत नाही उलट माणसंच मला घाबरतात. त्यात माणसांना मी क्वचितच दिसते. मी तिथून कोणालाच न दिसता निघूनही गेले असते, पण मला अचानक मंदिरातल्या घंटीचा आवाज ऐकू यायला लागला. मी लहानपणापासून त्या आवाजाला घाबरते. म्हणजे कधीकधी गाई-गुरांच्या गळ्यातपण अशी घंटी असते, पण माणसाकडे असली की म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट होणार. मी लहान असताना एकदा शिकारीची तयारी करत होते. मी लांबूनच शिकार हेरली होती. शेळीचं एक छोटं पाडस हेरून मी शेजारच्या शेतातून धपकन उडी मारली. ती पाडसाने सहज हुकवली. मी परत उडी मारणार तोच मला जवळच्या मंदिरातल्या घंटीचा आवाज आला. तो घुमणारा आवाज ऐकून मी तिथंच थांबले. जसं काय त्या आवाजाने मला गुंगवून टाकलं. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर मला दूरच्या छोट्या मंदिराबाहेर लटकवलेली एक छोटी घंटी दिसली. मग मला त्या घंटीखाली एक तुळतुळीत डोक्याचा माणूस दिसला. अंगात फक्त धोतर घातलेला. नक्कीच पुजारी किंवा मांत्रिक असावा. त्याने माझ्याकडे त्याचे राखाडी डोळे लहान करत पाहिलं. मला वाटलं त्याला मी दिसणार नाही, पण माझा अंदाज चुकला. मला ओळखून त्याने अचानक टुन्नकण उडी मारली आणि मंदिराच्या घंटीला पकडून झोका घ्यायचा प्रयत्न केला. त्यासरशी घंटीचा आवाज बंद झाला आणि मी भानावर आले. तोपर्यंत तो माणूस पाय वर करून घंटीसोबत मंदिराच्या ओट्यावर पडला होता. मग अचानक तो ओट्यावरून गायब झाला. मला काही क्षण समजलंच नाही की काय झालं. आम्हाला शिकवलं होतं की मंदिरापासून लांब राहायचं आणि जर चुकून जरी माणसाने पाहिलं तर लगेच पळून जायचं. पण मी ती सगळी शिकवण विसरून गेले होते. मग मला मंदिराच्या दुसऱ्या बाजूने ते तुळतुळीत डोकं आणि अजून एक पांढऱ्या टोपीने झाकलेलं डोकं दिसलं. त्यासरशी एक मोठा दगड माझ्याजवळ येऊन पडला. मी संकट ओळखलं आणि धावत सुटले. नेमकं तेव्हाच त्या तुळतुळीत डोक्याच्या माणसाने नेम धरून घंटी फेकली. मी ती थोडक्यात हुकवली पण तरीही ती माझ्या कमरेला घासून गेली. भयंकर आग झाली. अजूनही तिचे व्रण गेले नाहीत. आजही तो प्रसंग मला जशाचा तसा आठवतो. तेव्हापासून मी मंदिरांपासून दहा कोस लांब राहते आणि चुकून जरी घंटीचा आवाज आला तरी घाबरून थिजून बसते.

 

    कालही तेच झालं. मी घंटीचा आवाज ऐकला आणि आहे तिथंच थिजून बसले. मला लांबून तो माणूस दिसला. धोतर बंडी घातलेला आडदांड माणूस. त्याचंही डोकं एकदम तुळतुळीत होतं. उलट हे तर मावळतीच्या सूर्याच्या प्रकाशात चमकत होतं. हातात कसलीतरी मोठी दोरी आणि घंटी घेऊन तो रस्त्याच्या ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत सगळीकडे निरखून पाहत येत होता. काळेकुट्ट डोळे बारीक करून पूर्ण लक्ष देवून तो सगळीकडे पाहत चालला होता. हा सगळा प्रकार पाहून मला अजूनच भीती वाटली. त्यात भर म्हणजे हा माणूस काहीतरी मंत्र म्हणत होता. नेमकं मला समजलं नाही पण काहीतरी एकदम बेसूर चालीत म्हणत होता. "आमावश्येच्या भयानक रात्री मी ज्ञानाच्या अग्नीची मशाल घेऊन आलोय, किर्रर्र अंधारात उडणाऱ्या काजव्यांच्या गाण्यात मी शोधतोय, मी जीवांचा-जीव दिला तरी बरं तू कुठंच दिसत नाही, कुठे कुठे शोधू मी तुला, तू इथेही नाही आणि तिथेही नाही", असाच काहीतरी अर्थ होता त्या मंत्राचा. खूपच विचित्र! त्यात तो कसलेतरी तांडव नृत्य करत चालला असंच वाटत होतं. डोक्यावर हात ठेवून काहीतरी शोधत. आता तर मी घाबरून थरथर कापू लागले होते. नक्कीच काहीतरी होतं त्या मंत्रात. 

 

    माझ्या जवळून जाताना त्याने अचानक वळून पिंपळाकडे पाहिलं आणि त्याला मी दिसले. "हा! दिसली ग, बाई दिसली!" असं हसून म्हणत तो थेट माझ्याकडे चालत आला. हा माणूस तर मलाच शोधत होता! एवढा धीट माणूस मी पहिल्यांदा पहिला. मला मोठ्याने ओरडावंसं वाटलं पण तेवढ्यात त्याने ती घंटी माझ्या गळ्यात टाकली आणि माझा आवाजच बसला. मग त्याने हातातली दोरी माझ्या गळ्यात बांधली आणि पाठीवर थाप मारून म्हणाला "चल ग बाई. झाली तुझी वेळ आता". आता तर मी अर्धमेली झाले. तो जिकडे नेईल तिकडे मी चालू लागले. 

 

    मी इतकी घाबरली होते की मला काहीच उमगत नव्हतं. मी गप-गुमान त्याच्या मागून चालत होते. तो जसा चालेल तसाच. तो तर अजून काहीतरी शोधत होता. मग मी पण त्याच्याबरोबर कधी रस्त्याच्या या कडेने तर कधी त्या कडेने जात होते. आता त्यानं मंत्र म्हणणं बंद केलं होतं आणि तो माझ्याशी काहीतरी बोलत होता. म्हणजे मला माणसांची भाषा समजते पण तरीही हा काय म्हणतोय ते मला नीट समजत नव्हतं. "मी तुला दावणीला नेवून बांधणार. तुला चाबकाने मारणार. मग तुझं मटण खाणार. रात्रभर झोपणार." हे ऐकून मी सगळीच आशा सोडली आणि जागेवर उभी राहिले. मला माहित नव्हतं की माणसंपण आम्हाला खातात. मी जागची हालत नाही पाहून त्याने मला जोरजोरात ओढायला सुरुवात केली. तशी माझ्यात खूप ताकद आहे, त्याच्यासारखी चार माणसं मी सहज ओढू शकते, पण माझे पाय गाळून गेले होते. त्यामुळं मीपण ओढली जात होते. 

 

    जशी मी जंगलाबाहेरच्या मोठ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला आले तशी मनाची हिम्मत करून जोरात पाय रोवून थांबले. तिथल्याच एका झुडपाच्या मागे. त्या माणसाने दोरी जोरात ओढून धरली पण मी थोडीसुद्धा हलले नाही. दोरी खांद्यावर टाकून तो तिरपा होऊन जीव खाऊन ओढत होता. मग त्याने माझ्या आईला माणसांच्या शिव्या घालायला सुरुवात केली. हा प्रकार मला आजिबात समजला नाही. एकतर मला माझी आई आठवत नाही आणि तिला माणसांच्या शिव्या देऊन काय फायदा? आता मला हा माणूस थोडा वेडा वाटायला लागला, एखाद्या मांत्रिकासारखा. तेवढ्यात मला दुसरीकडून एक घाऱ्या डोळ्याचा माणूस येताना दिसला. त्याच्या हातात कसलंतरी पत्र्याचं भांडं होतं आणि त्याच्या कडीला धरून तो ते वाजवत येत होता. लांबुनच तो  दोरी ओढणाऱ्या या माणसाकडे पाहून "राम राम चांगदेव महाराज!" असं म्हणाला. 'महाराज' म्हणजे हा खरंच मांत्रिक तर नाही ना? का त्या खऱ्या चांगदेवाचा अवतार, जो हातात नागाचा चाबूक घेऊन वाघावर बसून फिरायचा? मी आता भयंकर घाबरले आणि आत्तापर्यंत दोरीला लावलेला जोर सोडून दिला. त्यासरशी मी झुडपाबाहेर ओढली गेले आणि चांगदेव महाराज खाली पडले.

 

    झुडपाबाहेर आलेल्या मला पाहून तो घाऱ्या डोळ्याचा माणूस हातातलं पत्र्याचं भांडं तसंच टाकून मोठ्याने ओरडत गावाकडे पळाला. एखाद्या घाबरलेल्या हरणापेक्षाही जास्त वेगात! तिथल्याच जवळच्या शेतातल्या बांधावर असणाऱ्या कडुनिंबाच्या झाडावर सरसर चढला. एखाद्या वानराला लाजवेल एवढ्या चपळाईने! आणि मग तिथंच एका फांदीवर उभं राहून जवळच्या वस्तीकडे पाहून जोरजोरात काहीतरी ओरडायला लागला. मग आधी जवळच्या घरातून एक बाई बाहेर आली. तिने रस्त्यावर येऊन पाहिलं आणि किंचाळून घराकडे परत धूम पळाली. मग एक माणूस रस्यावर येऊन डोकावून गेला. तो सुद्धा मोठ्याने ओरडत धूम पळाला पण दुसऱ्या घरांकडे. मग अजून थोडी आरडाओरड आणि पळापळ झाली.

 

    इकडे आत्तापर्यंत चांगदेव महाराज उठून बसले होते. त्यांनी आपली धोतर बंडी झटकली आणि परत माझ्या आईला शिव्या घालत मला जीव खाऊन ओढायला सुरुवात केली. मी खूप घाबरले होते पण तरी थोडी हिम्मत करून पाय रोवून चालले होते. मग थोड्याच वेळात दहा-पंधरा लोक हातात काठ्या कुऱ्हाडी घेऊन समोरून येताना दिसले. त्यात तो घाऱ्या डोळ्याचा माणूसपण झाडावरून उतरून सामील झाला. आता मला साक्षात यमदूत समोर दिसायला लागला. मी शेवटचा प्रयत्न म्हणून जोरात ओरडले. यावेळी घशातून मोठ्ठा आवाज निघाला. लोक थांबले. चांगदेव महाराजांनी दचकून माझ्याकडे पाहिलं आणि मी संधी ओळखून मानेला एक जोराचा हिसका दिला आणि जंगलाकडे धूम ठोकली. 

 

    आजिबात मागे पुढे न पाहता दम लागेपर्यंत धावले. त्यात दोरी आणि घंटी कुठेतरी निसटून पडली. ते पाहून तर मी आनंदाने अजूनच धावले. थेट माझ्या बछड्यांना घेऊन इथे आले. खरंच खूप मोठ्या संकटातून सुटले मी काल. आता परत कधीच त्या गावाजवळ जाणार नाही. 

 

काळे डोळे

 

    म्या पितळीच्या तांब्यात बघितलं. निव्वळ पाण्यागत दिसते देशी अन् त्यात माझ्ये काळे डोळे दिसले. किती सुंदर! शेवटच्या येका घोटात मी उरलेली संपवली. घश्यात जळजळ झाली, रोजच्यासारखी! रेडीवोत भारी गाणी चालली होती. पिंजरा पिक्चर मधली. तव्हांच रखमा आरडली "आव्ह ऐकलं का? ढवळी परत उलथली जंगलात. दिस मावळायच्या आधी हुडकून आणा तिला. मग ढोसा उरलेली."

 

    च्या मायाला या ढवळीच्या! जाग्याव थांबत नाह्य बेनी. म्या तसाच उठलो अन् निघालो. रखमीला "मटान बनून ठेव. मी आलोच लगी" सांगून दावनीची दोर सोडली. आज तर ढवळीनं कहरच केला. मायला, गळ्यातली घंटी पण तोडून गेली आज. तशी गुणाची गाय हाय. दूध देती लै पण उठसुठ जंगलाकडं उधळती. 

 

    "नीट जावा. अन् नाह्य गावली तरी लगी या निघून. येईन आपुआप मागच्या येळे सारखी" रखमीनं निरोप दिला. नीट जावा म्हंतीया. एवढी पण नाह्य  पिलो. पण म्या ध्यान नाह्य दिलं अन् लागलो जंगलाच्या वाटला. कुठं जाणार हाय? असल त्या पिपळाच्या झाडाजवळ.

 

    मी आपलं चाललो व्हतो गाणं म्हणत. कोणतं बरं? हां ते " दिसाला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला". इकडून तिकडं बघत. अन् मग मला ढवळी दिसली. आईच्यान, येकदम पिवळी झालती ढवळी! मावळतीच्या पिवळ्या उन्हात. आता गावातली लोकं काही म्हणुद्यात पण मला तर ढवळीच वाटली. मला वळखून ती गालातपण हसली असं वाटलं. म्यापण लगीच तिच्या गळ्यात घंटा टाकून दोरी बांधली अन् म्हणलो "चल गं बाय. लै येळ झाला आता".

 

    बरं झाली लवकर घावली. "आता घरी जावून दावणीला बांधून मग मटान खातो अन् रातभर झोपतो" म्हणलो. तर लगी पाय रवून हूबी राह्यली. मग मी "लै नाटक केलं तर चाबकानीच फोडीन" म्हणलो अन् तिला वढत रस्त्याला आणलं. तर रस्त्याच्या अलीकडं आडून बसली. मंग मीपण चार शिव्या घालत जोरात वढलं. 

 

    तेव्हाच माध्या तिथ उपटला. त्यानं लांबनच राम राम ठोकला अन् त्यासरशी मी धापकन पडलो. उठून बघतो तर माध्या गायप झाल्याला. थ्येट लिंबाच्या झाडावरून बोंबलायला लागला. या येड्याला काय झालं? तसं तर याला बघून म्या घाबरायला पायजे व्हतं. भुतागत घारे डोळे ह्याचे. तर हेच घाबरून येड्यावानी बोंबलत व्हतं. मंग म्या बघितलं की धा-बारा माणसं काठ्याकुरहाडी घेवून माझ्याकडंच येत व्हते. आयला, म्या काय घोडं मारलं यांचं? तव्हाच मला तो आवाज आला. लै डेंजर आवाज! अंगावर सर्रकन काटाच आला. दचकून मागं बाघुस तवर दोरीला येक मोठा हिसका बसला अन् माझं डोकं दाणकन खाली आपटून डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या. 

 

घारे डोळे

 

    दिस मावळायला आला व्हता. मी पत्र्याच्या टरमाळ्यात बघितलं. त्या पाण्यात माझे डोळे दिसले. येकदम घारे! किती सुंदर! मंग मी सगळं पाणी वापरून परसाचा कारेक्रम आटापला आणि टरमाळ हलवत घरी निघालो.

 

    वाटेत टकला चांग्या दिसला. नक्कीच आजपण ढोसून आला व्हता. येड्या सारखं गचपणात गुतलेली दोरी वढत होता. मी म्हणलं गम्मत करू आणि लांबूनच आरडलो "राम राम चांगदेव महाराज!" नेमकं तव्हांच ते धुड बाहेर आलं. अन् ते पण चांग्याच्या दोरीला बांधलेलं. त्या येड्यानी याच्या गळ्यात घंटापण बांधली व्हती. 

 

    मी तसा भेदरलो. म्हंजे कोण नाय भिणार? मी सनाट पळालो अन् थेट घरापसल्या लिंबाच्या झाडावरच चढलो. म्हणलं आधी आपला जीव वाचवा. मंग तिथूनच आयला वरडून सांगितलं की बा ला बोलावं. आय म्हणली "काय झालं मुडद्या? लिंबावर चढून काय वरडतो?" पण मग जव्हा तिनं रस्त्यावर जावून पाह्यलं की चांग्या कुणाला वढतोय तव्हा ती माझ्या बा कडं धावली. मंग बा नी पण पाह्यलं अन् वस्तीवरच्या लोकांना गोळा करायला धावला.

 

    येडा चांग्या अजूनपण दारूच्या नशेत जीव खावून दोरी वढत व्हता. मग जव्हा पंधरा-इस माणसं आली तव्हा मी झाडावून उतरलो अन् त्यांच्यात शामिल झालो. खरं तर लैच भारी दिसत होत ते जनावर. लै मोठं! बैलापेक्षा थोडं लहान. पण चांग्यामागं गुमान चाललं होतं. जसा काय जादुटोणाच केलाय त्यावर. नक्कीच त्या घंटीत कायतरी जादू असणार. नाह्यतर मग चांग्याच्या दारूच्या वासानी गुंगलं असणार. जर आम्ही  पाहिलं नसतं तर चांग्याने त्याला घरी नेवून दावणीलाच बांधलं असतं. 

 

    आम्ही पंधरा-इस माणसं पाहून ते जनावर बिचकलं. अन् मग जी डरकाळी फोडली की सांगायलाच नको. अख्खा गाव हादरला. दोन चार लोकांचे पायजमे वले झाले. अन् मग त्यानं एक जोरात हिसका देऊन चांग्याला वढत नेलं. नशिबानं चांग्याच्या हातातली दोरी सुटली अन् त्यो वाचला. 

 

    मग काय, लोकांनी त्याला सुधीवर आणला. पाणी पाजलं. तर मंग माझा बा त्याला म्हणतो "वो चांगदेव महाराज, उद्या आमच्या बांधावर या. लय मोठं नागाचं वारूळ हाय तिथं." चांग्याला अजून कायबी कळलं नव्हतं काय झालंय ते. त्यानी चिडून इचारलं 

"अन् त्ये का बरं?" तर माझा बा म्हणतो कसा, "त्ये काय हे, आधी नागाचा चाबूक बनीव अन् मंग जा वाघावर बसायला!"



--विक्रम खैरे (August 2020) 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा