सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

ब्रेव्ह गर्ल!




त्याच्या बोटांवरून ओघळ वाहत लालभडक रक्ताचे टपोरे थेंब खाली पडतात. ते पाहून मला कसतरीच व्हायला लागतं. अचानक छातीतल्या ठोक्यांची गती वाढते आणि परत काही केल्या ती मंदावतच नाही. किडनी ट्रे मध्ये जमा होणाऱ्या रक्ताकडे पाहून पेशंटने काकुळतीला येऊन विचारले  "अजून किती वेळ, सिस्टर?"

"अं... थोडाच वेळ. ते साकळलेलं रक्त निघालं की मी तो टाका परत बांधते."  मी रक्तावरची नजर न हटवता म्हणाले. 


मग मी पुढच्या पाच मिनीटांत ड्रेसींग उरकली. हातातले सर्जिकल हातमोजे तसेच ठेवले आणि पर्स खांद्याला अडकवून एक छोटा बाथरूम ब्रेक घेतला. जाताना आरतीला तो ट्रे साफ करायला सांगितला. पण एक घोडचूक झाली. मी माझा ऍप्रन तिथंच खुर्चीवर ठेवला. परत आल्यावर पाहते तर आरतीदेवी फरशी पुसत बसल्या होत्या. हिची तर आरती उतरवयाला पाहिजे! भयंकर वेंधळी बाई! काहीच जमत नाही. आजकाल कुणीही उठसूट नर्स बनतं. तिने ट्रे तर पालथा केलाच, वरती माझ्या ऍप्रनवर रक्ताचे शिंतोडे पण उडवले. आता हिला कोण सांगणार की मागच्या आठ दिवसांतला हा माझा दुसरा नवीन ऍप्रन आहे म्हणून. तरी बरं मी ऍप्रनचा एक मोठा सेटच विकत घेतलायं. मी माझी पर्स टेबलवर ठेवली आणि मग मीच तिला फरशी साफ करायला मदत करू लागले. 


तेव्हाच पर्स मधून मोबाइल फोनची रिंग वाजू लागली. नक्कीच आई असणार. मी थोडावेळ तसाच फोन वाजू दिला पण मग हात स्वच्छ धुवून शेवटी आईचा फोन उचलला. 

"शाले, फोन उचलत जा ना लवकर!" आई अपेक्षितपणे ओरडली. 

"कामात होते आई. बोल. काय झालं?" मला माहित होतं की ती काय बोलणार, तरीही मी विचारलं.

"अगं, डॉक्टरांना विचारलं का तू शिफ्टचं? "

"हो आई. उद्यापासून सकाळची शिफ्ट असेल माझी. नको काळजी करू."

"असं कसं काळजी नको करू? बातम्या वाचतेस ना तू? मी येऊ का तुला घ्यायला आज? रात्री दहाला संपते ना तुझी शिफ्ट?" आईने प्रश्नांचा भडीमार केला.

"दहाला नाही अकराला संपते, आई. पण तू अजिबात येऊ नकोस. आणि माझी काळजी नको करत जाऊ एवढी, ब्लॅक बेल्ट आहे तुझी पोरगी! मी येईल व्यवस्थित." मी समजवायचा प्रयत्न केला. 

"त्या ब्लॅक बेल्टच्या फुशारक्या नको मारू. खूप उशीर करते तू घरी यायला. झोप लागत नाही मला तू येईपर्यंत", आईने तक्रार केली. 

"फक्त आजचाच दिवस, आई! उद्यापासून दुपारीच घरी येत जाईल मी", मी वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयन्त केला. मग जवळपास पाच मिनिटे लागली आईला समजवायला. शेवटी ती मला घ्यायला येणार नाही हे कबूल करून घेतलं. यामुळेच मी फोन उचलायचा कंटाळा करत होते. काही दिवसांपासून हे दररोजचं झालं होतं. 


फोन ठेवला आणि लगेच आरती म्हणाली "खोटं का ग सांगते आईला, शालिनी? दहालाच निघतो ना घरी आपण?". 

ही का दुसऱ्यांच्या फोनवरचं बोलणं ऐकते? बाकी काही जमत नाही पण गप्पा मात्र लागतात हिला. पण मी न चिडता आरतीला सांगितलं, "अगं, आई काळजी करत बसते. एखाद्या दिवशी बस मिळाली नाही किंवा इथुन उशीर झाला की तिचा बीपी वाढतो. मी अकरा सांगितलं की ती साडेबारा पर्यंत काळजी करत नाही. उलट मीच घरी लवकर पोहचून सांगते की आज लवकर सोडलं. तेवढीच खुश होते."

"हे मला नाही सुचलं कधीच. सुभाषबरोबर जास्त वेळ घालवता आला असता", आरती आश्चर्याने म्हणाली. 

"तुला सुचणार पण नाही कधीच", हे मात्र मी मनात म्हणाले.  

आरती पुढे म्हणाली, "पण आई काळजी करणारच ना. एकुलती एक पोरगी. वडील नाहीत. त्यात लग्नाचं वय झालंय."

हिला माझ्या लग्नाचं काय देणं घेणं. नको तिथं नाक खुपसते. सुभाष बरोबर एंगेजमेंट झाल्यापासून हटकून लग्नावरून मला टोमणे मारते. 

"हं... मग?" आता मी थोडं चिडून बोलले. 

"अगं असं नाही पण तु बातम्या वाचतेस ना. तुला खरंच भीती वाटत नाही का?"

"आधी तू तो पोलीस टाईम्स वाचणं बंद कर. काहीही लिहतात त्यात." मी तिचा रोख ओळखून मुद्द्याला हात घातला. दररोज पोलीस टाइम्स सारखा फालतु पेपर अक्खा वाचून काढते ही.

"फक्त पोलीस टाइम्स मध्येच नाही तर सगळ्या बातम्यात आहे तो सिरीयल किलर. मागच्याच आठवड्यात दोन जणींना मारलं त्याने. त्यापण आपल्याच वयाच्या." आरती न थांबता बोलू लागली. हिला सगळी माहिती होती त्या सिरीयल किलरची. कुठूनही काहीही माहिती गोळा करत असते. मलापण उत्सुकता होती म्हणून मी पण तिला बोलू दिलं. 

ती पुढे सांगू लागली "पोलिसांनी आत्तापर्यंत कमीत कमी सहा खुनांशी संबंध जोडलाय त्याचा. असं म्हणतात की तो किलर फक्त कुरळ्या केसांच्या सुंदर मुलींचा जीव घेतो. डायरेक्ट गळे कापतो. मी तर कालच माझे केस तुझ्यासारखे सरळ करून घेतले. कशाला उगाच रिस्क!". 

"कुरळ्या केसांच्या सुंदर मुली? काहीपण वाचतेस तू, आरते. पोलिसांना तरी समजलंय का हे?" असं म्हणून पुढे मी मिश्किल हसत विचारलं "पण तुझे केस कधी कुरळे होते गं?"

तशी आरती सुंदर आहे. पण मी काही तिचं उगाच कौतुक करणार नव्हते.

"हसू नको. चुकून त्या खुन्याला माझे केस कुरळे वाटले अन नेलं मला ओढून तर? सॉरी म्हणून सोडून देईल का?" ती चिडून म्हणाली. मी मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आलेलं हसू दाबायचा प्रयत्न केला पण आरतीला ते समजलं. 

आता जरा जास्तच चिडून ती पुढे म्हणाली " मला माहित आहे तुझे पण केस कुरळे आहेत पण तू सतत पार्लर मध्ये जाऊन सरळ करून घेतेस ..."

हे मात्र खरं होतं. माझे केस पण कुरळे आहेत आणि ते मला खूप आवडतात. पण त्यांना सांभाळायचं म्हणजे खूप अवघड. एवढा वेळ कुणाकडे असतो. त्याऐवजी मी माझे केस जास्त वाढूच देत नाही आणि जमेल तेव्हा त्यांना सरळ करून घेते. आता मलापण सरळ केस आवडू लागले आहेत. 

आरतीचा राग अजून शांत झाला नव्हता. ती रागात पुढे म्हणाली " ... तू पण घाबरतेस. फक्त तू कराटेची ब्लॅक बेल्ट आहेस म्हणून न घाबरायचा आव आणतेस."

कराटे नाही टायक्वांदो. पण हिला कोण सांगणार ते. 

मी तिला समजावत म्हणाले "मी खरंच नाही घाबरत कुणाला. आणि मी घेते काळजी खूप सारी. लक्ष असतं माझं सगळीकडे. हे असे सिरीयल किलर किंवा साधे चोर-बदमाश सुद्धा काही अचानक येऊन हल्ला करत नाहीत. ते लोक पाळत ठेवतात. पाठलाग करतात. मग वेळ साधून हल्ला करतात. आपलं लक्ष असेल सगळीकडे तर मग काही होत नसतं."

तिच्या चेहऱ्यावरचा अविश्वास पाहून मी पुढे म्हणाले "मी करू शकते बचाव माझा, आरती. तशी ट्रेनींग घेतलीय मी. आणि जर अशी वेळ आलीच तर माझ्याकडे एक छोटा पण धारदार चाकू सुद्धा आहे."

आता आरतीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरले.  

"चाकू! दाखव मला?" तिने विचारलं आणि माझ्या पर्सकडे सूचक नजरेने पाहू लागली. 

कशाला सांगितलं हिला मी! नसती कटकट. आता ही मागेच लागेल चाकू पाहूदे म्हणून. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ती पर्स घ्यायला पुढे झाली पण मी झटकन मध्ये जात तिच्या हातातून पर्स ओढली.
“काय सोनं लपवतेस का पर्समध्ये?” तिने लटक्या रागात विचारलं . 

मी प्रेमाने म्हणाले “मी दाखवते की चाकू तूला. उगाच हात वगैरे कापून घेशील ”

मग मी तिला पर्समधून तो छोटा चाकू काढून दिला. एका हाताच्या तळव्यात बसेल एवढा त्याचा फोल्ड केलेला आकार होता. तिने तो चाकू हातात घेऊन पाहिला. काही क्षण निरीक्षण करून ती आनंदाने म्हणाली "चांगलाच जड आहे गं! कसा उघडायचा याला?"

मग मी तो चाकू माझ्या हातात घेतला. त्याच्यावरचे दोन बटण तिला दाखवले आणि म्हणाले "हे जे बटण आहे त्याला सेफ्टी बटण म्हणतात. आणि हे दुसरं बटण दाबलं की चाकू उघडतो. पण जर सेफ्टी बटण लॉक असेल तर मग जरी दुसरं बटण दाबलं तरी चाकू उघडत नाही."

मग मी चाकूचं सेफ्टी बटण आधी दाबलं आणि नंतर चाकू हातात नीट धरून त्यावरच दुसरं बटन दाबलं. खट आवाज करून चाकू उघडला. ट्यूब लाईटच्या प्रकाशात त्याचे धारदार पाते चमकले. ते पाहून आरती अजूनच खुश झाली. तिने परत एकदा चाकू हातात घेऊन निरखून पाहिला. 

मग मला म्हणाली "मला पण पाहिजे असा एक चाकू. असलं काही बरोबर असेल तर मला पण थोडी कमी भीती वाटेल. सुभाष मला न्यायला येतो म्हणून मी येते दुपारच्या शिफ्टला. नाहीतर मी हॉस्पिटलला येणंच बंद करणार होते."

आता हिला कोण चाकू आणून देणार. मी म्हणाले "नुसता चाकू बरोबर असून काय फायदा. तो चालवता पण आला पाहिजे. तुला साधं ड्रेसिंग करायला जड जातं." मग मी थोडा विचार करून पुढे म्हणाले "तू एक काम कर. या रविवारी घरी ये डिनरला. कितीवेळा बोलावलं तुला? अजून एकदा पण आली नाहीस तू. तू घरी आलीस कि मग मी तुला शिकवते चाकू कसा चालवायचा तो."

"येईल ग मी. या रविवारी नक्की येईल." थोडं खजील होऊन आरती म्हणाली. 

" नक्की ये. रविवारी आई पण घरी नाही. मी वाईन आणून ठेवते. आपण मस्त टाईमपास करू." मी म्हणाले. 

"आणि चाकू पण चालवायला शिकव?" आरती उत्साहाने म्हणाली.

“हो गं. चल आता गप्पा बंद करू. खूप कामं आहेत.” मी हिच्या तोंडाचा पट्टा बंद करायचा प्रयत्न करून पाहिला. पण एवढ्या सहज ऐकणारी आरती कोण?

ती पुढे बोलतच राहिली “चाकू वरून आठवलं. तो किलर म्हणे दरवेळी वेगवेगळ्या चाकूने गळे कापतो. आणि तूला माहित आहे का, तो भेट म्हणून मारलेल्या मुलीचा एक दात काढून घेतो. ”
“ई!.., आरते बंद कर की आता.”

पण ती काही गप्प बसली नाही. नशिबाने मी विषय बदलत राहिले. रात्री शिफ्ट संपेपर्यंत मी तिच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा ऐकल्या. हे पण दररोजचं झालं होतं. 


रात्री दहाला शिफ्ट संपली की मी रोजच्या सारखं आधी ड्रेस बदलला. नर्सचा युनिफॉर्म बदलून सलवार कमीज घातली. रक्ताचे शिंतोडे उडालेला तो ऍप्रन शेवटी प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून दिला. अजून ते टपटप पडणारं रक्त डोक्यातून जात नव्हतं आणि उलट परत ते आठवून हृदयातील धकधक अजूनच वाढत होती. तोपर्यंत सुभाष आरतीला न्यायला आला होता. दोघांना बाय म्हणून मी बस स्टॉप कडे चालू लागले.  


रस्त्याच्या कडेचा तो छोटा बस स्टॉप तसा जवळंच होता. पाच-सात मिनिटांनी मी तिथे पोहचले. अशा वेळी खूप कमी लोक असायचे बस स्टॉप वर. रस्त्यावर रहदारी आजिबात नव्हती. सगळीकडे शांतता पसरलेली. क्वचित एखादी बाईक किंवा रिक्षा ती शांतता चिरत जायची. हे शहर खूप लवकर झोपतं. खरं तर मोठं शहर म्हणण्यासारखं इथे काही नाही. खूपच विरळ वस्ती. बोटावर मोजण्या इतक्या मोठ्या इमारती. खूप कमी गर्दी. फक्त सगळ्या सुविधा मात्र आहेत. हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत, हॉटेल्स आहेत, बार्स आहेत. रात्री बारा पर्यंत बस आहेत. रात्री अपरात्री मुली बाहेर पडतात. त्यांना अजूनही या शहरात सुरक्षित वाटतं.  


माझी बस यायला अजून बराच वेळ होता. बस स्टॉपवरच्या  एका लोखंडी खुर्चीत मी आरामात बसले. दिवसभर काम करून थोडा थकवा जाणवत होता. इथे बसल्यावर जरा बरं वाटलं. त्यात छान थंड वातावरण झालं होतं. बस स्टॉप वर मी सोडून अजून एक-दोन जण उभे होते. पण सगळे आपल्या फोनमध्ये गुंग. दोन बोटांनी टाईप करत कुणाशी तरी बोलत किंवा गेम्स खेळत. सगळ्यांकडे आजकाल नोकियाचे फोन. सुरवातीला जेव्हा नवीन फोनचं फॅड आलं होतं तेव्हा तर नुसते रींगटोन वाजवून डोकं उठवायचे. आता कमीत कमी फ्री एसएमएस मुळे तो त्रास तरी सहन नाही करावा लागत.


थोड्या वेळाने मी पाहिलं की लांबून रस्त्याच्या कडेने एक मुलगी चालत येत आहे. जीन्स टॉप घातलेली तिची एक पुसट आकृती दिसली. तीसुद्धा फोनमध्ये पाहण्यात गुंग होती. त्या फोनच्या प्रकाशात तिचा सुबक चेहरा थोडा उजळलेला दिसत होता. रस्त्यावर सगळीकडे पिवळे दिवे बसवलेले होते. पण त्यातले काहीच चालू होते. काही दिवे उगाच लुकलुक करून बंद पडत. अशाच अचानक लुकलुकणाऱ्या दिव्याच्या मंद पिवळ्या प्रकाशात मला एक आकृती त्या मुलीच्या मागे चालताना दिसली. एका उंच मोठ्या माणसाची. मला वाटलं, मला भास झाला. मग मी जरा जास्त लक्ष देऊन पाहू लागले. पुढच्या दिव्याच्या प्रकाशात तो मला नीट दिसला. अत्यंत हळूहळू तो त्या मुलीच्या पाठोपाठ अंतर ठेवून चालत होता. त्या मुलीला मात्र याचं काही भान नव्हतं. तिचं सारं लक्ष फोनमध्ये. 


मग ती मुलगी बस स्टॉप जवळ पोहचली. लांबूनच मला तिचे केस दिसले. मोठे आणि मोकळे सोडलेले कुरळे केस. खूपच सुंदर! ते पाहून माझ्या अंगावर अचानक काटा आला. आरतीने सांगितलेलं आठवलं. बातम्यांमध्ये स्पष्ट सांगूनसुद्धा या मुलींना भीती वाटत नाही. उलट रात्री बिनधास्त केस मोकळे सोडून फिरतात. आणि आजू-बाजूला तर आजिबात लक्ष नाही. त्यात तो माणूस अजूनही तिच्याच मागे येत होता. 


बस स्टॉपवर येऊन ती मुलगी कोपऱ्यातल्या एका रिकाम्या खुर्चीत बसली. खांद्यावरची महागडी पर्स तिने मांडीवर ठेवली आणि परत फोनमध्ये डोकं घातलं. बस स्टॉपच्या लाईटमध्ये ती अजूनच सुंदर वाटली. तो माणूसपण तिच्या मागोमाग येऊन तिच्याजवळ उभा राहिला. जरा जास्तच जवळ. आता मी त्या माणसाकडे नीट पाहिलं. जवळपास तिशीच्या आसपास वय असेल. उंच आणि किंचित सडपातळ. कपडे स्वच्छ घातलेले पण डोक्यावरचे केस वेडेवाकडे विंचरलेले, खुरटी दाढी आणि मिश्या, डोळे मात्र लालसर. हा खरा सिरीयल किलर शोभेल. असाच माणूस शोधत असतील का पोलीस? त्याच्या पायात चप्पल मात्र खूप ठिकाणी शिवलेली होती. कपड्यांबरोबर बाकी काहीच नीट शोभत नव्हतं. जसं काय आज पहिल्यांदा नवीन कपडे घालून आलाय. बरोबर कसली बॅगसुद्धा नाही. पॅन्टच्या खिस्यामध्ये मात्र काहीतरी होतं. आकारावरून अंदाज येत नव्हता. कदाचित दारूची बाटली असेल. तो हाताची घडी घालून ऐटीत उभा होता. त्याचं लक्ष त्या मुलीच्या खांद्यावरच्या केसांवर असावं. मला तो माणूस खूप खटकला. मी बस स्टॉपवर सगळीकडे पाहिलं. मी आणि तो माणूस सोडून बाकी जे दोन-चार लोक होते, ते सगळे आपापल्या फोनमध्ये बिझी होते. फक्त मी आणि तो माणूस फोनवर नव्हतो. माझं त्या माणसाकडे लक्ष आणि त्याचं त्या मुलीकडे. मी मुद्दाम उठून मुलीजवळ जाऊन उभी राहिले आणि त्या माणसाकडे पाहिलं. त्याला माझ्या नजरेची जाणीव झाली असावी. मग त्याने दुसरीकडे पाहायला सुरुवात केली. हे खुर्चीत विराजमान झालेलं सुंदर ध्यान मात्र अजून फोनमध्येच व्यस्त होतं. दोन्ही हातांच्या अंगठ्याने पटापट टाइप करत कुणाशी तरी एसएमएस वर बोलत. 


माझ्या बसची वेळ झाली होती. मग दुरून बसचा आवाज ऐकू आला. माझीच बस असावी. अचानक मनात हुरहूर वाटू लागली. एक क्षण वाटलं की आपली बस सोडून या मुलीबरोबर जावं. तो माणूस अजूनही चोरून तिच्याकडेच पाहत होता. मला त्या माणसाचा भयंकर राग आला. बस जवळ आल्यावर मला पाटी दिसली. माझीच बस होती. छातीत धस्स झालं. छातीतले ठोके अजून जोरात पडायला लागले. पण बस थांबायच्या आत ती मुलगी पटकन उठून माझ्यापुढे उभी राहिली. तिचे ते सुंदर कुरळे केस माझ्या अंगाला घासून गेले. मी मोठा श्वास घेतला. म्हणजे ही मुलगी माझ्याच बसने जाणार. मला अचानक हायसं वाटलं. माग मात्र मी घाई केली नाही. तशीच उभी राहिले. त्या मुलीमागे तो मानुसपण बस मध्ये चढला. मग मी त्या दोघांमागे बसमध्ये चढले.  


बसमध्ये तशी गर्दी नव्हती. फक्त दोन चार माणसं उभी होती. डावीकडच्या सगळ्या सीट्स महिलांसाठी राखीव होत्या. त्यातल्या काही रिकाम्या होत्या. ती मुलगी अशाच एका रिकाम्या सीटवर जाऊन बसली. मला वाटलं की तिच्या शेजारी बसावं आणि ओळख वगैरे करावी. पण तो माणूस त्या मुलीच्या सीट जवळच उभा राहिला. ते पाहून मी विचार बदलला आणि त्या मुलीच्या मागच्या सीट वर जाऊन बसले. बस चालू झाली. खिडकीतून थंड वारे आत येऊ लागले. त्यात त्या मुलीचे केस उडत माझ्या चेहऱ्यासमोर येत होते. तिचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं.  


मी शेवटच्या स्टॉपवर उतरणार होते. समोरून कंडक्टर तिकीट काढत येत होता. सर्वात आधी त्या माणसाने शेवटच्या स्टॉपचं तिकीट काढलं. मग त्या मुलीने फोनवरची नजर न उठवता केशवनगरचं तिकीट मागितलं. केशवनगर म्हणजे अगदी सुनसान जागा. तिथे जुन्या काळातल्या पडक्या इमारती पाडून नवीन वस्ती बांधत आहेत. दिवसासुद्धा लोक तिथं जायला घाबरतात आणि ही एवढ्या रात्री तिथे जातेय. त्यात तिच्यामागे हा माणूस आहे. माझ्या छातीतल्या ठोक्यांचा वेग परत वाढला.  मी पर्समध्ये हात घालून माझा चाकू तपासून पाहिला. त्या चाकूच्या थंड लाकडी मुठीच्या स्पर्शाने मला बरं वाटलं. तेवढ्यात कंडक्टरने मला तिकीट विचारले. मी चाकूवरची पकड सोडून माझा पास शोधला आणि तो कंडक्टरला दाखवला. पासवर एक नजर टाकून कंडक्टर तिकीट विचारायला मागे निघून गेला. 


जसजशी बस शहराबाहेर जाऊ लागली तशी बसमधली गर्दी कमी होत गेली. मग तो माणूस उजव्या बाजूच्या रिकाम्या झालेल्या सीटवर जाऊन बसला. त्याची नजर सतत त्या मुलीकडे. खरं तर बाकी लोक पण त्या मुलीकडे पाहत होते. लोक बिनदिक्कत सुंदर मुलींकडे पाहत असतात. पण हा मात्र सतत तिच्या खांद्यावरच्या केसांकडे पाहत होता. किंवा कदाचित त्या खांद्यावर अडकवलेल्या पर्सकडे पाहत असावा. 


रात्रीचे जवळपास साडे अकरा वाजले असतील. केशवनगरचा स्टॉप जवळ आला. तशी ती मुलगी लगबगीने उठली आणि खांद्यावरची पर्स संभाळत दरवाजा जवळ जाऊन उभी राहिली. लगेच तो माणूसपण उठला आणि तिच्यामागे जरा अंतर ठेवून उभा राहिला. याचा तर शेवटचा स्टॉप होता ना? माझ्या डोक्यात रागाची भयंकर सणक गेली. बस जशी थांबली तशी मी पण पटकन उठून त्या दोघांमागोमाग बसमधून उतरले. 


त्या मुलीचं कुठेच लक्ष नव्हतं. उतरल्यावर लगेच तिने फोनमध्ये डोकं घातलं आणि केशवनगर मध्ये जाणारा एक रस्ता पकडून चालायला लागली. मी थोडावेळ बस स्टॉप वर घुटमळले. बस स्टॉप वर दुसरं कुणीच नव्हतं. सगळीकडे सामसूम झालेली. मी उगाच फोन काढून काहीतरी पाहत बसले. मग तो माणूस इकडे तिकडे पाहत त्या मुलीच्या मागे अंतर ठेवून सावधपणे चालू लागला आणि ते दोघेही माझ्या डोळ्याआड गेले. मी फोनमध्ये वेळ पाहिला. अजून घरी पोहचायला खुप वेळ होता. माझ्या फोनची बॅटरी खूपच कमी होती. उगाच रिस्क नको म्हणून मी फोन स्विच-ऑफ केला आणि पर्स मध्ये ठेवला. मग मी पटपट चालत ते दोघे गेले त्या रस्त्यावर पोहचले. त्या दोघांच्या नजरेच्या टप्प्यात मी येणार नाही याची खात्री करत मी चालत होते.


थोडं पुढे गेल्यावर ती मुलगी मुख्य रस्ता सोडून आडवाटेने निघाली. त्या रस्त्यावर एकही दिवा नव्हता. नाही म्हणायला उगवणाऱ्या चंद्राचा मंद प्रकाश होता. आजूबाजूला पडक्या इमारती होत्या. सगळीकडे सामसूम होती. जवळपास माणसांचा मागमूसही नव्हता. मला जाणवलं की आता त्या दोघांमधील अंतर कमी होत आहे. माणसाचा चालण्याचा वेग हळूहळू वाढत होता. मी सावध झाले. पटकन पर्समध्ये हात घालून मी माझा चाकू बाहेर काढला. त्याचा सेफ्टी लॉक उघडला आणि तो उजव्या हातात घट्ट पकडला. त्याबरोबर मी माझा ऍप्रन पण बाहेर काढून अंगात घातला. त्याचा एक फायदा म्हणजे ऍप्रन घातलेल्या व्यक्तीवर लोक लगेच विश्वास ठेवतात. त्यांना वाटत कुणीतरी डॉक्टर असावा. 


मी अजून खूप लांब होते. मी पण माझा चालण्याचा वेग वाढवला. आता तो माणूस मुलीच्या खूपच जवळ पोहचला होता. ती मुलगी अजून फोनमध्येच पाहत होती. त्याने एकदा इकडे-तिकडे पाहिलं आणि मग पटापट चार पावलं टाकत तिच्या खांद्यावर हात टाकला. ते पाहून मी रागाने पळायला सुरुवात केली. 


अचानक झालेल्या स्पर्शाने ती मुलगी दचकली आणि थोडी दूर झाली. त्या माणसाच्या हातात तिच्या पर्सचा बंध आला. तिने फोन टाकून पटकन पर्स पकडून ठेवली आणि दोन्ही हाताने पूर्ण ताकद लावून ओढू लागली. त्या माणसाने कदाचित याची अपेक्षा केली नसेल. तो थोडा गडबडला पण मग त्याने फक्त एका हाताने पर्स ओढून धरली. मुलीने कितीही ओढलं तरी हा जागचा हलला नाही. उलट त्याने दुसऱ्या हाताने खिशातून एक मोठा चाकू काढला. अशा वेळी पर्स सोडून पळून जायला पाहिजे, पण त्या मुलीने पर्स तशीच धरून ठेवली. त्याने चाकू मारण्यासाठी हात उंचावला आणि मला जाणवलं की मी वेळेत पोहचू शकत नाही. मी जीव तोडून धावत होते तरीही मी पोहचू शकत नव्हते. मग मी मोठयाने ओरडले "ये... सोड तिला!"


तो माणूस दचकला आणि माझ्या दिशेने पाहू लागला. आता चाकूचा रोख त्याने माझ्याकडे वळवला होता. मी जोरात अंतर कापत त्याच्याजवळ पोहचले. त्याने पर्स सोडून दिली. त्या सरशी ती मुलगी मागे जात खाली कोलमडली. आणि मग जेव्हा मी त्याच्यापासून हाताच्या अंतरावर पोहचले तेव्हा त्याने माझ्या दिशेने चाकूचा वार केला. मला तो अपेक्षितच होता. मी खाली बसत तो चुकवला आणि त्याच क्षणाला माझ्या हातात लपवलेल्या चाकूचे बटन दाबून तो उघडला. तो  माणूस सावरायच्या आतच मी माझ्या चाकूने त्याच्या मांडीवर एक जबरदस्त वार केला. मांडीवरून तिरपा चाकू मी एवढ्या जोरात चालवला होता की त्याची पॅन्ट फाटून मांडी खोलवर कापली गेली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्यातलं काही रक्त माझ्या ऍप्रन वर उडालं. काही माझ्या तोंडावर. ते रक्त पाहून आणि विशेष म्हणजे नका-तोंडावर उडालेल्या रक्ताचा वास घेऊन मला भयंकर कसंतरी झालं. माझ्या सर्वांगावर शहारे आले. हृदय एवढ्या जोरात धडकू लागले की ते छातीचा सापळा तोडून बाहेर येईल असं वाटू लागलं. 


मांडीवरची जखम पाहून तो पटकन चार-पाच पाऊल मागे गेला. ती खाली पडलेली मुलगी आता सावरून उठली होती पण काय झालं हे न समजल्याने वेड्यासारखी आम्हा दोघांकडे पाहत उभी राहिली होती. अजून जखमेची वेदना त्या माणसाला जाणवली नसेल. अचानक मोठी जखम झाली की ती जागा काही वेळ बधिर होते. त्याचं तसच झालं असेल. त्याने रागात माझ्याकडे पाहिलं व आमच्या दिशेने चाकू उगारून धावायला सुरुवात केली. मी आत्तापर्यंत उठून सावध उभी राहिले होते. मी सुद्धा त्याचाकडे पाहून आणि विशेष म्हणजे त्याच्या मांडीतून जोरात वाहणारं रक्त पाहून त्याच्याशी दोन हात करायचा विचार सोडून दिला आणि पळायला सुरुवात केली. ती मुलगी अजून जागची हलली नव्हती. मी तिच्या जवळ जात तिचा डावा हात पकडून पळायला सुरुवात केली. पुढचे दोन-तीन मिनिटं आम्ही न थांबता धावलो. ती मुलगीसुद्धा वेगात धावली. 


मला भयंकर धाप लागली होती. मी मागे वळून पाहिलं. तो माणूस कुठेच दिसला नाही. मग मी थांबले आणि ती मुलगीपण थांबली. आम्हाला वाटलं की आपण आता सुटलो. पण फक्त काहीच क्षण. तो माणूस लंगडत येताना दिसला. त्याचा वेग कमालीचा कमी झाला होता पण तो हार मानायला तयार नव्हता. मी पाहिलं की त्याचा एक पाय पूर्णपणे रक्ताने न्हाऊन निघालाय. माझ्या छातीतली धडधड अजूनच वाढली. मी परत पळायला सुरुवात केली. ती मुलगीपण माझ्या बरोबर पळू लागली. मग मात्र आम्ही अजून थोडाच वेळ पळालो. तिचा वेग कमी झाला होता म्हणून मी पण थांबत थांबत तिच्या गतीने पळत होते. मी पळताना मागे पाहून तो कुठे असेल याचा अंदाज बांधत होते. एका वळणावर कडेला तो मला लंगडत येताना दिसला. आता तो खूपच जास्त लंगडत होता. खूप प्रयत्न करून एक-एक पाऊल उचलत होता. 


आम्हा दोघींना आता भयंकर दम लागला होता. आम्ही धावणं जवळपास बंदच केलं होतं. दोघीही धापा टाकत चालत होतो. तेही सारखं-सारखं मागे वळून पाहत. तो आमच्या नजरेच्या टप्प्यात होता पण खूपच हळूहळू एक पाय ओढत चालत होता. मग एके ठिकाणी तो कोलमडून पडला. खरं तर आमच्या मागे आवेशात धावून त्याने खूप मोठी चूक केली होती. त्याच्या मांडीतून जोरात वाहणाऱ्या रक्ताकडे पाहून मी ओळखलं होतं की नक्कीच फेमॉरेल नावाची मुख्य शीर तुटली असेल. धावल्यामुळे त्यातून अजून जोरात रक्तस्राव झाला होता. आता तो पुरेस्या रक्ताअभावी बेशुद्ध पडला असेल. अजून पाच-दहा मिनटात जर त्याला रक्त मिळाले नाही तर त्याचं जगणं अशक्य होतं. 


तो रस्त्यावर पडलेला पाहून आम्ही दोघी थांबलो. काही वेळ आम्ही तसेच एका जागेवर थांबलो. पण त्याची काहीच हालचाल दिसली नाही. ते जाणून त्या मुलीने तिथेच बसकण मांडली. मग मीसुद्धा तिच्या जवळ जाऊन बसले. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडायला लागली. मीही तिच्या डाव्या खांद्यावर हात टाकून तिला सावरायचा प्रयत्न केला. तिचे ते सुंदर कुरळे केस माझ्या गालांवर, मानेवर, खांद्यावर विसावले. मला त्यांच्या स्पर्शाने अत्यंत भरून आलं. पण माझ्या छातीतली धडधड अजून थांबली नव्हती. उलट ती वाढतच होती. मग तिने माझ्या ऍप्रन वरच्या रक्ताकडे पाहून विचारलं "तुला लागलंय का?" 

माझ्या उजव्या हातात अजूनही तो चाकू होता. मी त्याच हाताने पडलेल्या माणसाकडे चाकू दाखवत सांगितलं "नाही. ते त्याचं रक्त आहे." मग चाकूकडे पाहून पुढे अभिमानाने म्हणाले "याच्यामुळे वाचलो आपण." 

"देवासारखं धावून आलीस तू!" असं म्हणत ती अजूनच फुंदत रडू लागली. 

 

मग थोडया वेळाने अचानक काहीतरी आठवून तीने स्वतःची पर्स उचकायला सुरवात केली आणि म्हणाली, "फोन करायला पाहिजे कुणाला तरी. माझा फोन सापडत नाही. तुझ्याकडे फोन आहे का?" 

मी माझी पर्स उचकली आणि माझा फोन काढून चालू करायचा प्रयत्न केला. तो स्विच ऑफ होता. मी म्हणाले "फोन ची बॅटरी संपली वाटतं. स्विच ऑन नाही होत." मग तिच्याकडे एक क्षण नजर टाकून म्हणाले "मला माहित आहे तुझा फोन कुठं पडलाय. चाल जाऊ आणि शोधू."

मग आम्ही दोघी उठलो आणि आल्या रस्त्याने परत माघारी जाऊ लागलो.  


तो माणूस जिथे पडला होता तिथे जाताना आम्ही खूपच हळू आणि सावध रीतीने चाललो. पण आम्हाला काहीच हालचाल दिसली नाही. आम्ही दोघीही त्याच्या जवळ गेलो. तो अस्ताव्यस्त पालथा पडला होता. त्याच्याकडे पाहून तिने मला विचारलं "मेला असेल का तो?"

मी म्हणाले "थांब, चेक करून पाहते." मग मी थोडा विचार करून आधी पर्स उचकली आणि एक सर्जिकल हातमोजा काढला. 

ते पाहून तिने विचारलं “तू कुणी डॉक्टर आहेस का?”

मी हातामोज्याकडे पाहत म्हणाले “नाही. मी नर्स आहे. सह्याद्री हॉस्पिटल मध्ये.”

मी विचार करू लागले की तो हातामोजा कसा घालायचा. माझ्या उजव्या हातात अजूनही चाकू होता मग मी तो चाकू तिच्याकडे देऊ लागले. पण मग त्या चाकूकडे पाहून आणि त्याच्या पात्यावरच्या रक्ताकडे पाहून मी तिला "थांब" म्हणाले. मी तो चाकू एकाच हाताने ऍप्रन वर टेकवून आधी बंद केला आणि मग तिच्याकडे दिला. मग मोकळ्या झालेल्या उजव्या हातात दुसऱ्या हाताने हातमोजा घातला आणि त्याची नाडी तपासली. खूप वेळाने मला थोडी धकधक जाणवली. पण खूपच मंद. मी परत तपासून खात्री करून घेतली. मग मी तिला म्हणाले "बेशुद्ध आहे तो. पण जगणार नाही असं वाटतं."

तेवढ्यात त्याचा एक पाय जोरात हलला. ते पाहून दोघीही भयानक दचकलो आणि पटकन मागे सरकून उभे राहिलो. पण मग परत काहीच हालचाल झाली नाही. मग मला अचानक काहीतरी सुचलं. मी तिला म्हणाले "एक मिनिट थांब" आणि पटकन दुसरा सर्जिकल हातमोजा काढून डाव्या हातात घातला. मग त्या माणसाजवळ सावधपणे जाऊन मी इकडे तिकडे नजर टाकली. मला त्याचा हाताशी पडलेला तो चाकू दिसला. त्याचा भला मोठा रामपुरी चाकू! मी तो पटकन उचलून घेतला. मग मी उलट्या पावलाने मागे जात तिच्याजवळ गेले आणि म्हणाले "हा जर परत उठून मागे आला तर कमीत कमी त्याच्याकडे हा चाकू तरी नसेल. काय माहित किती जणींना मारलं असेल या चाकूने?" ती काहीच म्हणाली नाही. फक्त मान हलवून माझ्याशी सहमत आहे असं दाखवलं. मग आम्ही तिथून पुढे निघालो. तो माणूस परत येणार नाही याची मला खात्री होती तरीही आम्ही मागे वळून पाहत पटापट चालत होतो. 


चालताना तिने तिच्या हातातला माझा चाकू नीट पाहिला. चाकू घट्ट पकडून तिला थोडा धीर आला असेल. तिने मग तो परत माझ्याकडे देऊ केला. पण मी न घेता तिला म्हणाले "असू दे तुझ्याजवळ" आणि माझ्या हातातल्या चाकूकडे इशारा करत म्हणाले "हा आहे माझ्याकडे. काळजी नको करू. आता फक्त फोन शोधू." 


चंद्राच्या स्वच्छ प्रकाशात रस्ता उजळला होता. त्या प्रकाशात रस्त्यावर सांडलेलं त्या माणसाचं रक्त जागोजागी दिसत होतं. एवढं सारं रक्त! ते पाहून परत मला माझ्या वेगात पडणाऱ्या छातीच्या ठोक्यांची जाणीव झाली. दुपारपासून सगळीकडे फक्त रक्तच दिसत होतं मला. 


थोड्याच वेळात आम्ही जिथे त्या माणसाशी आमचा सामना झाला त्याठिकाणी पोहोचलो. रक्ताचा माग तिथे संपत होता. मी तिला लांबूनच रस्त्यावर पडलेला तिचा फोन दाखवला. ती उत्साहाने पटापट पाऊले टाकत फोनजवळ गेली. पण तो नोकियाचा फोन होता. पडला की त्याची बॅटरी आणि सिमकार्ड वेगळं होतं. मग आम्ही दोघी बॅटरी अन सिमकार्ड शोधू लागलो. तिला बॅटरी सापडली. मला चंद्राच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला सिमकार्ड चमकल्यासारखं जाणवलं. मी तिकडे गेले. पण चुकून माझा पाय घसरून तो सिमकार्ड वर गेला. मला जाणवलं की ते तुटलं आहे. मी पाय बाजूला घेतला आणि तिने ते तुटलेलं सिमकार्ड उचलून पाहिलं. ते कामातून गेलं होतं. तोंडावर आलेलं रडू आवरत ती म्हणाली "आता कसा फोन करायचा?"


ही आरती सारखीच आहे. माझ्या मनात विचार चमकून गेला. मी तिला म्हणाले "अगं, ती बॅटरी मला दे. माझा फोन चालू करते मी." हे ऐकून अचानक तिचा चेहरा खुलला. हे तिला सुचलंच नव्हतं. आताशी कुठं ती पूर्ण रिलॅक्स झाली होती. ते पाहून मला खूप आंनद झाला. पण आता तिला प्रचंड थकव्याची जाणीव झाली होती. तिने त्या रस्त्याजवळच एक दगड शोधला आणि तिथे बसली. माझ्या उजव्या हातात अजूनही त्या माणसाचा चाकू होता. मग डाव्या हाताने मी माझा फोन उघडला. बॅटरी काढून पर्समध्ये ठेवली आणि तिची बॅटरी हातात घेतली. हे करताना मी आजूबाजूला पाहिलं. रस्त्याच्या कडेलाच जिथे त्या माणसाच्या रक्ताचा माग संपतो तिथे चार पावलांवर एक पडके घर होते. त्या घरासमोर बसायला छान दगड होते. तिथे चंद्राचा प्रकाश सुद्धा मस्त पडला होता. मी तिला तिकडे जाऊन बसू म्हणाले. ती पण माझ्याबरोबर तिथे आली आणि आरामात बसली.


मी मग तिची बॅटरी फोनमध्ये टाकून माझा फोन चालू केला. तिने मला विचारलं "कोणाला फोन करणार?"

मी म्हणाले "आधी माझ्या भावाला फोन करते. तो इथं जवळंच राहतो. तो येईल न्यायला आपल्याला. मग आपण पोलिसांना फोन करू."

मी फोन हातात घेऊन थोडं दूर गेले. नंबर टाईप करून फोन लावला. फोन वाजत होता. पण कुणी उचलत नव्हतं. सगळीकडे भयंकर शांतता पसरली होती. आसपास चिटपाखरूही नव्हतं. माझं त्या फोनच्या रिंगकडे आजिबात लक्ष नव्हतं. मी त्या मुलीकडं पाहत होते. रिलॅक्स झाल्याने ती बसस्टॉप वर जशी दिसत होती तशीच दिसली. चंद्राच्या प्रकाशात अजूनच जास्त सुंदर वाटली. त्यात तिचे ते मोहक केस! माझ्या अंगावर आनंदाने शहारे आले. दुपारपासून छातीत सुरु झालेली धकधक मंदावत होती. आताशी कुठं मीपण रिलॅक्स व्हायला लागले होते. हीच वेळ होती. 


मी हॉस्पिटलच्या स्टोअर-रूम मध्ये लावलेला फोन कट केला. एवढ्या रात्री तिथे कोण फोन उचलणार? मग तिच्याजवळ जात मी पर्समध्ये फोन टाकला. ते पाहून तीने विचारलं "काय झालं?". मी उत्तर न देता खसकन तिच्या त्या कुरळ्या केसात डावा हात घातला. केस घट्ट पकडून जोराचा हिसका दिला आणि तिला खाली पाडलं. प्रचंड आवेगात मी तिला चार पाच पावलं ओढत नेलं.  जिथं त्या माणसाचं रक्त सांडलं होतं त्या जागेपर्यंत नेलं. तिच्या हातामधे माझा चाकू होता. तिने तो उघडायचा प्रयत्न केला पण मी तो सेफ्टी लॉक करूनच तिला दिला होता. मग मी तिच्या छातीवर गुढगा ठेवून बसले. डाव्या हाताने तिचे सुंदर केस मागे ओढून ताणून धरले. तिच्या डोळ्यात काही क्षण पाहिलं. भयानक भीती होती त्यात. माझा चेहरा आनंदाने खुलला. अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांत वेगळीच नशा उतरली. मग मी माझ्या उजव्या हातातला रामपुरी चाकू तिच्या गळ्यावर सराईतपणे चालवला. लालभडक रक्ताचे कारंजे उडाले. माझा ऍप्रन परत एकदा रक्ताने भिजून गेला. दुपारी सुरु झालेली माझ्या छातीतील धकधक आता कुठे पूर्णपणे मंदावली होती. 


थोड्या वेळाने माझी तंद्री तुटली. मग मी पटकन उठून उभी राहिले. अंग साफ केलं आणि माझे कपडे बदलले. नर्सचा पोशाख परत केला. बाकी रक्ताने भरलेले सर्व कपडे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरले. ते भरताना मी घडलेल्या घटनेची पूर्णपणे उजळणी केली. तिच्याकडे पाहून विचार केला की हिचा दात काढायची काही गरज नाही. त्या किलरला एवढा वेळ नव्हता. हिने त्याची मांडी फाडली. ब्रेव्ह गर्ल! किलर स्वतःचा जीव वाचवायला हिला सोडून पळाला. मग अति-रक्तस्त्रावाने रस्त्याच्या कडेला पडून मेला.


मग मी तिच्या हातात असलेल्या माझ्या चाकूचे लॉक उघडून ते पाते निरखून पहिले. त्यावर अजूनही त्या माणसाचे रक्त होते. मी चाकूची मूठ आणि त्या मुलीचा उजवा हात काळजीपूर्वक स्वच्छ पुसला. मग मी तो उघडलेला चाकू तिच्या उजव्या हातात परत ठेवला. त्या मुठीवर तिच्या बोटांचे ठसे उमठतील अशा पद्धतीने तो तिच्या हातात दाबला. फोनची बॅटरी काढून स्वच्छ पुसली आणि रस्त्यावर टाकली. मग तिच्या पर्समधून तिचा बॅटरी नसलेला फोन आणि तुटलेलं सिमकार्ड काढून रस्त्यावर फेकलं. मग मी तिच्या डाव्या हाताचं मनगट स्वच्छ पुसलं. माझ्या हाताचे ठसे मिटवले. हाच हात पकडून मी तिला पळवलं होतं. ज्या खांद्यावर मी हात ठेवला होता तो साफ करायची गरजच नव्हती. तो आधीच रक्ताने न्हाऊन गेला होता. नाहीतरी पोलीस एवढीपण चोख तपासणी करत नाहीत. 


त्यानंतर मी झपझप चालत जिथे तो माणूस पडला होता तिथे गेले. मी आधी खात्री केली की तो जिवंत नाही. मग त्याच्याकडे एकदा नीट पाहिलं. त्याला पाहून मला खूप चीड आली. त्याला लाथेने तुडवायचा विचार मनात आला होता. पण मी तो मोठ्या प्रयत्नाने टाळला. मला त्याचा भयंकर राग आला होता. भुरटा चोर कुठला! विनाकारण माझ्या अन तिच्या मध्ये येत होता. "चोर म्हणून जगलास आता सीरिअल किलर म्हणून मर. हे घे तुझं प्रमोशन!" असं मोठ्याने म्हणत मी त्याचा चाकू त्याच्याच हातात दिला. मग माझी पर्स उघडून सर्वात आतल्या कप्प्यात दडवलेली एक अत्यंत छोटी सोनेरी पिशवी काढली. आज दुपारी बाथरूम ब्रेक नंतर मी दुसऱ्यांदा ही पिशवी उघडत होते. त्यात असणाऱ्या आठ दातांवर मी शेवटची नजर टाकली. आठही मुलींचे सुंदर चेहरे आणि त्यांचे मोहक केस डोळ्यांसमोर तरळून गेले. थोडं नाराज होत मी ती पिशवी परत बंद करून त्या माणसाच्या पॅन्टच्या खिशात लपवली. पोलिसांना काही अक्कल नाही. त्यांना वाटतं सहाच खून झालेत. आता अजून दोन जणींना शोधत बसा. 


मग मी तिथून निघाले. माझ्या फोनची बॅटरी परत फोनमध्ये टाकुन मी तो चालू केला. अजून बॅटरी शिल्लक होती. रात्रीचे साडेबारा वाजले होते. आई काळजी करत असणार. 


आता फक्त एकच गोष्ट राहिली. आरतीने तो चाकू पाहिला होता. त्यात ती सगळ्या बातम्या वाचते. तरी तिला काही संबंध लावता येणार नाही याची मला खात्री आहे. आणि असं काही झालं तरी मला काही काळजी नव्हती. तिच्याकडे खूप कमी वेळ होता. फक्त या रविवारपर्यंत! पोलिसांना काही माहित नाही. मला सरळ केसांच्या सुंदर मुलीसुद्धा आवडतात. 



-- विक्रम खैरे 

(२ ऑगस्ट २०२१)


---------------------------------------

विशेष आभार: 

सूचना आणि दुरुस्त्या : स्वप्नाली, अभिजित आणि प्रितेश.

मुखपृष्ठ : अभिजित बेंद्रे.

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा