सोमवार, १५ मार्च, २०२१

पहिलं मव्हाळ

पहिलं मव्हाळ

 

    मी चौथीला होतो तेव्हाची गोष्ट. शिक्षणासाठी आणि बाकी बऱ्याच काही कारणांमुळे आम्ही मामाच्या वाडीत राहत होतो. या वाडीत चौथी पर्यंत दोन खोल्यांची शाळा आहे. माझ्या वर्गात एकूण फक्त दहा जण होते. मी सोडून फक्त आणखी एकच मुलगा माझ्या वर्गात होता, प्रकाश. आणि बाकी सगळ्या मुली. तर साहजिकच मी आणि पक्या एकदम जिवलग मित्र झालो. पक्या तसा नात्याने माझा चुलत-चुलत मामेभाऊ लागतो.

 

    आम्ही मुळ वाडी मध्ये राहायचो जिथे जवळपास दहा-पंधरा घरे होती आणि पक्या हा आमच्या मामाच्या वस्तीवर राहत होता. जिथे माझे मामा आणि त्याचे चुलतभाऊ वगैरे अशी पाच-सहा घरे होती. या वस्तीवर जायला दोन ओढे पार करून जावं लागायचं. आणि याच दोन ओढ्यांकाठून फिरताना मी आणि पक्याने दहावी पर्यंत वाट्टेल ते प्लॅन्स केले. त्यातले कित्येक फेल होऊन लोकांचा खूप मार पण खाल्ला. खरतर बिचारा पक्याच जास्त मार खायचा, मी पाव्हण्याचं पोर म्हणून दरवेळेस बाकीच्या लोकांकडून वाचायचो आणि फक्त आईचाच खूप मार खायचो.

 

    वाडीमध्ये आम्ही एवढा धुमाकूळ घातला होता की अजूनही लोक विक्या-पक्याच्या कुप्रसिद्ध जोडीची आठवण काढतात. यात काहीच अतिशयोक्ती नाही [1]. विक्या-पक्याची पहिली गोष्ट म्हणजे आमचं पाहिलं मव्हाळ झोडण्याचा प्रयत्न [2].

 

    पक्याला लहानपणापासून मव्हाळांचं अप्रूप. पक्याचे मोठे चुलतभाऊ, चुलते वगैरे मव्हाळ झोडून मधाचे मोठमोठे कांदे घेऊन येत [3]. चौथीपर्यंत मी तर मव्हाळ फक्त लांबूनच पाहिलेलं. मधपण खाल्ला नव्हता. पण मग पक्यानेच मला मव्हाळांची सगळी माहिती दिली. ते झोडतात कसं, मध कुठे असतो, कोणत्या माशा चावत नाहीत वगैरे. मग आम्ही विचार केला की आपणसुद्धा एखाद छोटं मव्हाळ झोडायचं.

 

    मग एके दिवशी पक्याने सांगितलं की त्याने एक मव्हाळ पाहून ठेवलयं. नक्की काळ आठवत नाही पण वाडीतल्या शेतांमध्ये नुकतीच ज्वारीची सोंगणी संपून वाळलेल्या चाऱ्याच्या गंजी रचलेल्या होत्या [4]. माझ्या मामांचे वस्तीवर दूरपर्यंत असणारे  शेत संपून मग एक छोटं माळरान लागत. त्या माळरानाच्या कडेला अडचणीत तरवाडाच्या झुडपाला हे मव्हाळ होतं. मव्हाळ तसं छोटंच होतं. वीतभर लांबी रुंदी असेल किंवा त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे जाणकार माणसाने अजून एक महिना तरी ते झोडायचा प्रयत्न केला नसता.

 

    आम्ही शाळा सुटल्यावर मव्हाळ पाहून आलो आणि रविवारी सकाळी झोडायचा प्लॅन केला. प्लॅन एकदम अचूक बनवला होता. पक्याने सांगितलं होतं की धुराने माशा आंधळ्या होतात. म्हणून धूर करायला गवऱ्या आणि गरज पडली तर उपयोगी येईल म्हणून सायकलचा जुना अर्धवट तुटलेला टायर पक्याने आणला होता. त्याचबरोबर केरोसीन, त्या केरोसीनने भिजवायला एक घाणेरडं फडकं आणि काडीची पेटी वगैरे. हे सगळं सामान पक्याने त्याच्या घराच्या चुलीजवळून ढापलं होतं. मी पण काही तरी मदत करायची म्हणून अतिहुशारी दाखवून घरातील आईने जपून ठेवलेल्या, शेंगदाणे-डाळी वगैरे बरोबर येणाऱ्या, प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन गेलो. मधमाश्यांपासून हाताला वाचवायला. पक्या मात्र माशांपासून वाचवायला एक मोट्ठी घोगंडी घेऊन आला.

 

    खरं तर दोघांनीच जायला हवं होतं पण पक्याने वस्तीवरचे चार-पाच चिल्लीपिल्ली पोर-पोरी गोळा केले. नसते केले तरी सुट्टी असल्याने आमच्या मागोमाग ते आलेच असते. आम्ही सगळे त्या तरवाडाच्या झुडपापाशी पोचलो. मी दोन्ही हातात प्लास्टिकच्या पिशव्या घातल्या. पक्याने घोंगडी अंगावर घेतली. बाकी चिल्लीपिल्ली आम्ही लांब उभी केली. आणि दोघांनी गवऱ्या पेटवायचा कार्यक्रम सुरु केला. काही केल्या आमच्याकडून गवऱ्या आजिबात पेटल्या नाहीत. केरोसीन आम्ही जपून वापरत होतो. मग आम्ही टायर वापरायचं ठरवलं. टायरच्या तोंडावर केरोसीन मध्ये बुडवलेलं फडकं गुंढाळून मी धरलं आणि पक्याने ते पेटवून टायर माझ्याकडे दिला.

 

    फडकं मस्त पेटलं होतं पण धूर मात्र कमी होता. तो टायर मी एकाबाजूने झुडपात घुसून लांबूनच मव्हाळाच्या खाली धरला. थोड्या माश्या त्या धुराने उठल्या पण बाकीच्या फक्त पोळ्यावरच दुसरीकडे धूर चुकवत सरकल्या. उठलेल्या माश्या पाहून मी घाबरलो होतो पण पक्याने आधिच सांगितलं होतं की त्या चावक्या नाहीत. आणि प्लास्टिक मुळे मला दिलासा होता की कमीत-कमी हाताला तरी चावणार नाहीत. सगळं आम्ही बरोबर करत होतो पण धूर कमी आणि जाळंच जास्त होता. सगळ्या माश्या कधीच उठल्या नाहीत. धूर दुसरीकडे नेला की आधी उठलेल्या माशा परत जागेवर जाऊन बसायच्या. पण तरीही माशा अजून चावत नाहीत म्हणून आत्मविश्वास मात्र भयंकर वाढलेला होता.

 

    मग पक्याने शेवटचा उपाय सांगितला. तो म्हणजे मव्हाळ ज्या फांदीला आहे ती फांदी जोरजोरात हलवायची आणि माश्या उठल्या की फांदीच तोडून पाळायचे. खरतरं मव्हाळ झोडण्याची हि सर्वोत्तम पद्धत आहे. म्हणजे मव्हाळ झोडण्याच्या कलेत पारंगत असणारे क्वचितच धूर वगैरे करतात. पण त्यावेळी हा प्रकार मला अति वाटला. मी कडाडून विरोध केला. माशा जर आंधळ्या नाही झाल्या तर चावतील वगैरे. पण मग पक्याने सगळी जवाबदारी घेतली आणि मी दूर जाऊन उभा राहिलो.

 

    त्याने खाली अडचणीत जरा दूर बसून एक हाताने मव्हाळाची फांदी जोरात दोन चार वेळा हलवली. सगळ्या माश्या उडाल्या. मग तो फांदी तोडायचा प्रयत्न करू लागला. तशी तरवाडाच्या झुडपांची फांदी लगेच तुटते पण त्या वेळी ती लवकर तुटलीच नाही. मग त्याने मला मदतीला बोलावले. मला सांगितलं की तो फांदी न तोडता सरळ-सरळ पोळंच तोडणार आहे. पण काही माशा परत परत येऊन पोळ्यावर बसत होत्या. मला मग त्या जळणाऱ्या टायर ने त्यांना उडवून लावायचं काम दिलं.  

 

    माश्या उडवताना एक माशी माझ्या हातावरच्या प्लस्टिकच्या पिशीवी मध्ये गेली आणि एक-दोन ठिकाणी चावली. मी लांब पळत जाऊन पिशवी काढून टाकून दिली. आईची शप्पथ घेऊन परत मव्हाळ वगैरे झोडणार नाही असं म्हणालो. पण मग पक्याने मला सांगितलं की आता चावलीच आहे तर कमीत कमी मध तरी खाऊ आणि नंतर ते पोळं जाळून बदला वगैरे घेऊ. बदला म्हणल्यावर मी खुश झालो. आता चावलेल्या ठिकाणी जास्त दुखत पण नव्हतं. टायर आणखी जळतच होता. मग मी दुसऱ्यापण हातातली पिशवी काढली आणि परत जाऊन जोमाने माश्या उठुवून लावू लागलो. नंतर आणखी एक माशी दुसऱ्या हाताला चावली पण यावेळी आता मी गप सहन केलं. किंवा परत शपथ वगैरे घेतली असेल. पण शेवटी पक्याने ते मव्हाळ ओरबडून काढलं.

 

    मध खूपच कमी होता. खऱ्या कांद्यां एवढा सुद्धा कांदा नव्हता. मला जर माहित असत की कांदा काय प्रकार असतो तर आधीच एवढा कमी मध पाहून मी मव्हाळाला रामराम ठोकला असता. आता तर चिल्ली-पिल्ली मुळे मध फक्त चाटण्यापुरता मिळाला. मग आम्ही ते पोळं आक्ख जाळून टाकलं.

 

    हा जाळण्याच्या कार्यक्रम होईपर्यंत ते केरोसीन ने भिजवलेलं जाडजूड फडकं कधीच जळून गेलं होतं आणि आता टायर पेटला होता. जोरात जळणाऱ्या टायर चे जळके थेम्ब खाली पडत होते. त्यातल्याच एका थेंबाने माळरानावरील वाळलेल्या गवताने पेट घेतला. आम्हीपन ते पेटलेलं गवत पाहत राहिलो. मस्त वर्तुळाकार पेटत होतं गवत. मग साधारण एक दीड फुटाच्या वर्तुळाचा आकार झाला. वर्तुळाच्या कडा जळत होत्या आणि मध्ये गवत जळून झालेली सुंदर काळी चकती! लगेच पक्याने घोंगडी टाकून जाळ विझवला.

 

    सगळे चिल्लीपिल्ली आणि आम्ही त्या वर्तुळाकार कोरलेल्या काळ्या बिंबाकडे आश्च्यर्याने पाहत होतो. त्या पिवळ्या रानमाळावर खूपच सुंदर दिसत होतं ते. मग पक्या म्हणाला परत करू. मग मी दुसरीकडे आग लावली. आता आम्ही ते जळणारं वर्तुळ आणखी मोठं होऊन दिलं. जवळपास चार-पाच फूट रुंद. यावेळी पक्याला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली. वर्तुळाच्या कडेने चार-पाच वेळा घोंगडी मारून त्याने ते विझवलं. हे तर आणखीच सुंदर दिसत होतं. मग आम्ही परत एकदा याच्यापेक्षा मोठ्ठ बिंब तयार करू असं ठरवलं. यावेळी मी थेट माळरानाच्या मध्यभागी जाऊन आग लावली. परंतु यावेळी मात्र जरा वेगातच गवत जळायला सुरुवात झाली. खरं तर तेव्हाच जोरात वारं सुटलेलं होतं. आम्हाला काडीची कल्पना नव्हती की वाऱ्याने गवत जोरात जळतं म्हणून. पक्याने सुद्धा हे पाहून आधीचं विझवायला सुरुवात केली होती. पण वर्तुळ एवढं मोठं झालं होतं की त्याने एकीकडे विझवत आणलं की दुसरीकडे पेटायचं. मग वाऱ्यामुळे जाळ खूपच वाढला. काही क्षणाआधी चिल्लीपिल्ली ओरडून सांगत होते की इकडे पेटलं, ते तिकडं पेटलं. पण आता तो भयानक मोठा जाळ पाहून ते सगळे सुसाट आल्या रस्त्याने पळाले. मग मी आणि पक्याने सुद्धा घाबरून पळ काढला.

 

    वेगात पळत जाऊन आम्ही आधी चिल्ली-पिल्लीना रस्त्यात गाठले आणि सगळ्यांना दम भरला की आजिबात घरी कुणाला काही सांगायचं नाही. आमच्याबरोबर तुम्हीपण मार खाल. मग पक्याने मला सांगितलं की माळरान असंपन जाळतात लोक. फक्त कुणाला कळलं नाही पाहिजे. मग मी गप दुसऱ्या रस्त्याने वाडीत गेलो. संध्याकाळपर्यंत घरीच गेलो नाही.

 

    फक्त माळरान जळालं असत तर ठीक होतं पण माझ्याच चुलत मामाची चाऱ्याची गंज माळरानाला खेटून असणाऱ्या शेतात कडेलाच होती. तीपण जळाली. जवळपास ५०० रुपयांचं नुकसान झालं मामाच. हे मला रात्री समजलं. आमच्या आजोबांनी घरी येऊन आमचे पराक्रम आईला सांगितले. चिल्लीपिल्लीनी कधीच घरच्यांना आमचे उद्योग रंगवून सांगितले होते. पक्याला खूप मार बसला. मला आठवत नाही मार वगैरे खाल्लेला पण आई खूप वेळ डोक्याला हात लावून बसली होती. आणि नंतर बरेच दिवस मला बोलणं सहन करावं लागलं.  

 

    दुसऱ्याच दिवशी विक्या-पक्याने गंज जाळली हे अक्ख्या वाडीत झालं होतं. कुठंही एकत्र गेलं की लोक 'आली विक्या पक्याची जोडी' म्हणून आम्हाला टोमणे मारत. आम्हीपण आणखी खूप सारे उद्योग करून लोकांना त्याचा विसर पडू दिला नाही.

 


तळटीपा (माझ्या काही इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या मित्रांसाठी):

[1] म्हणजे आता वाचताना वाटत की 'धुमाकूळ' शब्द जरा जास्तच वाटतो. 'उद्योग' ठीक आहे. पण माझी गोष्ट माझे शब्द. :D

[2] मव्हाळ म्हणजे मधमाश्याचं पोळं. ते  झोडणं म्हणजे माशांना हाकलून लावून मध काढणं.

[3] कांदा म्हणजे पोळ्याचा मध ज्या षट्कोनी आकाराच्या मेणाच्या घरात जमवलेला असतो त्यांचा संग्रह. इंग्रजीत honeycomb.

[4] ज्वारीची सोंगणी म्हणजे ज्वारीचे कणसं बाजूला करून उरलेलं रोपटं (i.e ताट) चारा म्हणून बाजूला करणं. आणि गंज म्हणजे या चाऱ्याची बांधणी करून एकावर एक ठेवून रचलेला खूप मोठ्ठा चारा.   


-विक्रम खैरे ( 20 April 2020)

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा