रविवार, १४ जून, २०२०

एका शापित वाड्याची कहाणी


----------------------------------------------------------------

For more options to read on smartphones:

Pratilipi: Follow this link 

Pdf file: download 

Epub file (best viewed using Google Play Books app): download

------------------------------------------------------------------


"पुणे विद्यापीठातील तमाम होस्टेलवासी आणि त्यांच्या पॅरासाईट्सना समर्पित."

१. मुतारी


पुणे महानगर पालिकेच्या बस-स्टॉप वरील मुतारीकडे पाहून संग्रामच्या गंभीर चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. शेजारीच बसची वाट पाहत उभा असलेला त्याचा जिवलग मित्र सचिन उर्फ सच्चू कालियाच्या खांद्यावर थाप मारून संग्राम म्हणाला "आलोच मी धार मारून". कालियाने आत्ताच हातात काढलेली गायछापची पुडी तशीच न उघडता खिशात कोंबली आणि संग्रामकडे निर्विकार भावाने पाहत म्हणाला "थांब, मी पन येतो". आज सभेच्या बॅकस्टेजवर बसून दोघांनी प्रत्येकी चार बिअर तरी गटकावल्या असतील. अशा परिस्थितीत मुतारीची ओढ लागणं हे साहजिकच होतं.


संग्राम आणि कालिया यांना आज खूप दिवसांनी बसचा प्रवास घडणार होता. आज अचानक सभा गाजवणाऱ्या नेत्याच्या PA ची कार बंद पडली तेव्हा संग्रामने खुल्या दिलाने आपली नवीन स्कॉर्पिओ त्याला घरी जाण्यासाठी दिली. आणि स्वतः मात्र बसने जाऊ असे सांगून आपण किती साधे आहोत हे दाखवून दिले. याचा फायदा नक्कीच संग्रामला पुढच्या सर्व कार्यक्रमांत होणार होता. हे जाणून तो खुश होऊन बस-स्टॉपवर आला होता.


रात्रीची दहाची वेळ असेल. दिवसा नेहमी गजबजलेल्या या म. न. पा. च्या बस-स्टॉप वर आता तुरळक गर्दी होती. याचं एक उदाहरण म्हणजे मुतारी रिकामीच होती. तशी मुतारी छोटीच. फक्त तीन जण एकावेळी मुतू शकतील एवढ्याच जागा आणि दरवाजा मागे छोट्याश्या जागेत बसवलेलं एक नवीन वॉशबेसिन. संग्राम आणि कालिया, मध्ये एका माणसाची जागा सोडून, धार सोडण्याचा कार्यक्रम उरकत होते. संग्राम मात्र सभा संपल्या पासून, बॅकस्टेजची सर्व कामे लोकांकडून करून घेताना ते इथे येईपर्यंत, आणि आता मुतारीतसुद्धा, सभा गाजवणाऱ्या नेत्याचं तोंड भरून कौतुक करत होता.

"राजकारणात माणूस पाह्यजे तर असा. काय भाषण ठोकतो. अंगावर नुस्ता काटा उभा राहतो." संग्रामचं मुतत असतानाही कौतुक चालूच होतं. 

"खरंय. नाहीतर आपला प्रधानमंत्री. तोंडातून एक शब्द फुटत नाही." कालियाने न कंटाळता दुजोरा दिला. कालिया तसाही कधी संग्रामच्या गप्पांना कंटाळत नव्हता.

"मी सांगतो बघ, पाच-दहा वर्षात हा मुख्यमंत्री होणार. मग मात्र सगळ्या भैय्यांची वाट लागणार. सगळ्यांना हाकलून देणार हा." संग्राम मनापासून बोलत होता.

"व्हायला पाह्यजे. जिथं पाहावं तिथं युपी बिहारची लोकं. माझं तर डोकंच फिरतं पाहून." कालिया पँटची चेन लावत म्हणाला.

कालियाने काही सेकंद वाट पाहिली पण संग्रामचं आणखी उरकलेलं नाही हे पाहून तो हसत म्हणाला "ये संग्राम, किती मुततो रे? किती बिअर ढोसल्या आज?"

संग्राम सुद्धा हसत उत्तराला "हा हा! तू थांब बाह्येर. आलोच मी."

कालिया तसाच बाहेर गेला. मुतारीपासून जरा लांब, फूटपाथच्या कडेला मुठा नदीच्या बाजूने बांधलेल्या रेलिंग्सवर, थोडं बाहेर आलेलं पोट हळूच टेकवून उभा राहिला. तिथं अंधारात थांबून खिशातल्या गायछापच्या पुडीशी चाळा करत, नदीवरून वाहणारा - गटारीचा वास मिसळलेला - गार वारा अंगावर घेत, लांब कुठेतरी शून्यात पाहत राहिला.


लांबून जर कोणी रेलिंग्स कडे पाहिलं तर त्यांना कालिया आजिबात दिसला नसता. याचं कारण म्हणजे कालियाचा काळा रंग आणि त्यात त्याने घातलेला विटकरी रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट. सचिनचं सच्चू कालिया होण्यामागे महत्वाचं कारण फक्त त्याचा काळा रंग हेच होतं. एखाद्या कावळ्याला सुद्धा लाजवेल एवढी काळी कांती सच्चूला लाभली होती. तरीही कालिया सारखा देखणा माणूस अक्ख्या वाघवस्तीवर नव्हता.


इकडे मुतारीमध्ये संग्रामनेही आपला मुतण्याचा कार्यक्रम आटपून पँटची चेन लावली. समोर गुटख्याच्या लाल रंगाने माखलेल्या भिंतीकडे पाहून त्यालाही थुंकायची इच्छा झाली. गुटखा-तंबाखू असं काही कधीच खाल्लेलं नसतानाही संग्राम 'आ.. थूक' असा आवाज काढत थुंकला आणि दरवाजा मागच्या वॉशबेसिन कडे निघाला. या नवीन दिसणाऱ्या वॉशबेसिनमध्ये पाण्याचा नळ मात्र जुनाच दिसत होता. संग्रामने आधी नळाची तोटी घड्याळाच्या दिशेने पूर्ण फिरवली. लोखंडाला लोखंड घासण्याचा कर्कश आवाज झाला. पण पाण्याचे फक्त दोन थेंब बाहेर आले. मग संग्राम ने तोटी घडयाळाच्या उलट्या दिशेने फिरवली. परत फक्त दोन थेंब पाणी. संग्रामने परत दोन वेळा डावी-उजवी कडे तोटी फिरवली आणि मग चिडून महापालिकेच्या मातोश्रींना एक घाण शिवी हासडत दात खाऊन तोटी पिरगाळली. पाणी नाहीच पण हातामध्ये स्क्रू सहित तोटी तुटून बाहेर आली. तुटलेल्या तोटीकडे पाहून संग्रामच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी झाला, पण तिथे संभ्रमित भाव दिसू लागले. तोटी तुटूनसुद्धा पाणी कसं येत नाही हे पाहायला संग्रामने तोटी बसवलेल्या जागेवर डोकावून पहिले. तिथे घाणेरडा काळा कचरा अडकला होता. तेव्हा अचानक दुरून कुठेतरी ढग गडगडल्याचा आवाज ऐकू आल्याचा भास संग्रामला झाला आणि पुढच्याच क्षणाला तो अडकलेला काळा कचरा थोडा हलला. काय घडतंय हे समजायच्या आतच संग्रामच्या तोंडावर पाण्याचे कारंजे इतक्या जोरात उडाले की तो जवळपास अर्धा भिजून निघाला.


उजव्या बाजूला मुतारीच्या आतमध्ये सरकत, खाली वाकून संग्रामने पाण्याचे कारंजे हुकवले आणि परत एक घाणेरडी शिवी हासडली. एका क्षणासाठी त्याला वाटलं की जावं असंच निघून, पण वाया जाणारं पाणी पाहून त्याने विचार बदलला. मग डाव्या हाताने पाण्याचे कारंजे अडवून, उजव्या हाताने दोनदा तोटी बसवण्याचा निरर्थक प्रयत्न केला. दोन्ही वेळेस तोटी बसली असं वाटत असतानाच ती पाण्याच्या दबावाने उडाली आणि संग्राम परत परत भिजला. जवळपास पूर्ण भिजलेला संग्राम आता भयंकर चिडला होता. थोडी चढलेली बिअर सुद्धा आता पूर्णपणे उतरली होती. तिसऱ्या वेळेस मात्र तोटी बसवून संग्रामने उजवा हात तसाच तोटीवर ठेवला आणि दात खाऊन डाव्या हाताच्या मुठीने तोटीवर जोरात एकच ठोका लावला. लगेच स्वतःला सावरत, पाण्याच्या कारंज्यापासून वाचण्यासाठी सावध होऊन उभा राहिला. पण यावेळी मात्र पाण्याचे कारंजे उडालेच नाही. संग्रामने सुटकेचा निःश्वास सोडला. हळू आवाजात शिट्टी मारून स्वतःलाच मनातल्या मनात शाबासकी दिली आणि अंगावरचे पाणी झटकायला सुरवात केली. मात्र पुढच्या चार-पाच सेकंदात तिथं काहीतरी तडकल्याचा आवाज झाला. संग्रामने लगेच घाबरून तोटी कडे पहिले. ती जागेवरच होती पण वॉशबेसिनला तडे जात होते. पुढच्याच क्षणाला त्या नवीन वॉशबेसिनला सगळ्या बाजूने तडे गेले आणि धाडकन त्याचे चार-पाच वेडेवाकडे तुकडे होऊन फरशी वर पडले. त्याबरोबर पूर्ण नळंच तुटून पडला. आता तर आधीपेक्षा खूप जोरात पाणी उडाले, जसं काय पाण्याचा छोटा धबधबाच अंगावर पडतो आहे. संग्रामची परत एकदा अंघोळ झाली. यावेळी मात्र संग्राम जागचा हलला नाही. तसाच पाणी अंगावर घेत हतबल होऊन उभा राहिला. त्याचं तोंड पडून गेलं. चेहरा रडकुंडीला आला. कुठून अवदसा सुचली आणि हात धुवायला गेलो असं झालं. संग्रामने हताश होऊन मान खाली घातली. नेमकं त्याचवेळी, मान खाली जात असताना, त्याला वॉशबेसिन तुटल्यामुळे त्याच्या खालच्या रिकाम्या झालेल्या जागेत, नळाच्या पाईपवरची एक गोल चकती दिसली. लगेच काय आहे हे ओळखून संग्राम खाली वाकला आणि त्याने ती नळ बंद करायची चकती फिरवली. पाण्याचा धबधबा बंद झाला. नाही तेव्हा चार थेंब पाणी येत नाही आणि आज जशी काय अक्खी मुठा नदीच नळातून वाहिली. ते ही मुतारीच्या नळातून. असा विचार करून निराशेनं मान नकारार्थी हलवत आणि अंगावरचे पाणी झटकण्याचा निष्फळ प्रयत्न करत संग्राम मुतारीच्या बाहेर आला.


बाहेर लांब उभा असलेल्या कालियाने कंटाळून तंबाखू मळायला घेतली होती. वॉशबेसिन तुटल्याचा आवाज ऐकून तो तसाच तंबाखू मळत लगबगीने मुतारीकडे निघाला होता. लांबूनच त्याने संग्रामचा पराक्रम पहिला आणि जोरजोरात हसायला सुरुवात केली.

बाहेर आलेल्या संग्राम कडे पाहत "अंघोळ करायची होती तर आधीच सांगायचं ना" असं म्हणत कालिया आणखी जोरात खिदळला.

संग्रामने कालिया कडे रागाने पाहिले. काय बोलावे अन् काय नको असे त्याला झाले होते. पण मग कालियाच्या हाताकडे पाहून तो म्हणाला "काल्या, हात धुतला का तशीच मळतो भाडखाऊ?"

कालियाच्या तोंडावरचं हसू एका क्षणात मावळलं. तंबाखू मळनं थांबवून निराश होत त्याने तंबाखू खाली टाकून दिली आणि म्हणाला "लै तल्लफ लागली रे. हात धुवून येऊ का?"

संग्रामला एक क्षण खरंच वाटलं की याला धरून भिजवावं. पण राग गिळून तो काहीच बोलला नाही.

कालिया उत्तराची वाट न पाहता म्हणाला "जाऊदे नको. अंघोळ केलीय मी आज!" आणि परत जोरजोरात हसायला लागला.


"आजचा दिवसंच लय खराब गेला रे कालिया!" तसाच ओल्या कपड्यात बस-स्टॉपवर उभा राहून संग्राम तक्रारीच्या सुरात बोलत होता, "सकाळी सकाळी त्या काळ्या मांजरीनं परत दूध पिऊन टाकलं. रात्री त्या PA ची गाडी बंद पडली. आणि आता मुतारीत अंघोळ!"

"ती रानटी मांजर लै माजलीय. परवा आमचंपन दूध पिऊन पळाली. अक्ख्या वस्तीवर धुमाकूळ घातलाय. काह्यतरी करायला पाह्यजे तिचं." कालियासुद्धा मनापासून बोलत होता.

"एकदा सापडू दे रे तावडीत. दगडचं घालतो डोक्यात सालीच्या", संग्राम रागाने बोलत होता, "तरी पिऱ्याला सांगितलं होतं मी काल, दूध मांडणीवर ठेव म्हणून. पण विसरून गेला. येडपट हाये एक नंबरचा. आज तरी ठेवलं पाह्यजे."

संग्राम पिराजी बद्दल बोलत होता. एकदम बेरकी आणि काहीही वेडपट धंदे करणारा पिराजी हा संग्रामचा वस्ती वरचा बिझनेस, त्याबरोबर गोठ्यातील गाईंची देखभाल आणि दुधाची कामे पाहायचा.

मान हलवत कालियापण त्याची खंत सांगू लागला, "खरंच आजचा दिवस लै खराब जातोया. त्या नाग्यालापन माल नाही मिळाला अजून. नवीन ऑर्डर आलीय. आबा सांगत होते त्या कन्नडी अन्नाने मधे आई घातली. साले दुसऱ्या राज्यातले हरामी लोकं."

कालिया नागेश उर्फ नाग्या काशीद बद्दल बोलत होता. एकदम चपळ आणि कराटे वगैरे शिकलेला नाग्या काशीद हा कालिया आणि संग्रामच्या बिझनेसमध्ये पार्टनर होता.

"खरंच यार! या भैय्यांचं काहीतरी केलं पाह्यजे. सगळ्यांना हाकलून लावलं पाह्यजे." असं म्हणत संग्राम आणि कालियाने परप्रांतीयांना शिव्या द्यायला सुरुवात केली आणि सभा गाजवणारा नेता कसा मुख्यमंत्री बनेल यावर परत चर्चा चालू केली.


काही वेळात तिथे यांची बस आली. बस तशी रिकामीच होती. म्हणजे नेहमीप्रमाणे बसायला जागा नव्हतीच पण कंडक्टर सोडून फक्त एक-दोन लोकंच उभे होते. आणि आतासुद्धा या बस-स्टॉप वरून फक्त तीन-चार जण चढले. कालिया लगेच बसमध्ये चढण्यासाठी पुढे निघाला होता पण संग्रामने त्याला थांबवून सांगितले "थांब काल्या. शेवटी चढून दरवाजात थांबू. तेवढंच उतरायच्या आधी कपडे वाळतील."


बस चालू झाली तसे संग्रामचे वेडे चाळे चालू झाले. बसमध्ये आत जाण्यासाठी असणाऱ्या मागच्या दरवाजात उभा राहून कधी हा पाय तर कधी तो पाय बाहेर काढत संग्राम पॅन्ट वाळवू लागला. रस्ता पाहून दोन्ही हाताने दरवाजा जवळचे रेलिंग्स पकडून, पाठमोरं होऊन आक्ख अंग बाहेर काढणं वगैरे प्रकार संग्राम शिताफीने करत होता.


"तिकीट बोला तिकीट" ओरडत आणि हळूहळू डुलत बसचा कंडक्टर दरवाज्याजवळ आला. "ओ काका, आत बसा की. का लटकता दरवाज्याला?" असा शहाणपणाचा सल्ला संग्रामला देऊन दरवाजा जवळच्या खांबाला पाठ टेकून कंडक्टर उभा राहिला.

संग्रामने घाणेरड्या नजरेने कंडक्टर कडे पाहिलं. संग्रामला काका म्हणालेलं आजिबात आवडत नसे. तसं पाहिलं तर संग्राम पंचविशीच्या आसपास असेल. पण त्याचा रागीट चेहरा, त्यावरती वाढलेली दाढी, दणकट बांधा, आणि एकंदर शरीर पाहता सर्वांचा अंदाज चुकायचा. तो त्याच्या वयापेक्षा कमीत कमी ५-१० वर्ष मोठा दिसायचा. 

कंडक्टर वरचा राग संग्रामने तात्पुरता गिळला आणि तिकीट काढण्यासाठी दरवाजाच्या आत आला. ओल्या कपड्यातल्या संग्रामकडे पाहून कंडक्टरला विनोद सुचला. "अक्ख्या महाराष्ट्रात पाऊस नाही, आणि तुम्ही कुठून पाऊस घेऊन आलात पाव्हणं?" असं म्हणून कंडक्टर खि-खि करत एकटाच हसला.

संग्रामने डोळे बारीक करत कपाळावर आठ्या आणत कंडक्टरकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. मग कालियाकडे पाहत म्हणाला "काल्या, माझ्या कपड्यात काय प्रॉब्लेम हाये का रे".

कालियाने संग्रामकडे एकदा पटकन खाली-वर पाहिले आणि म्हणाला "आजीबात नाह्य".

संग्रामने चांगला चौकाट्यांचा शर्ट आणि इस्तरी केलेली पॅन्ट घातली होती. ती इस्तरी फक्त आता पॅन्ट ओली झाल्यामुळे दिसत नव्हती.

"मग बुटात प्रॉब्लेम हाये का?" संग्रामने परत विचारलं.

"नाह्य तर, मस्त वूडलँडचे हायेत. भिजल्येत फक्त." कालिया म्हणाला.

"आयला, दिवसच लय वाईट आजचा. कुणी उठ-सूट चेष्टा करतंय माझी." संग्राम कंडक्टरकडे खुनशी नजरेने पाहत म्हणाला.

"जाऊ दे रे सोड." असं म्हणत कालियाने सुद्धा कंडक्टरकडे नजर रोखून पाहिलं.

हे सगळं ऐकून कंडक्टर मनातून थोडा घाबरायला लागला होता.

"अं... तिकीट?" असं घाबरत कंडक्टर बोलला.

"दोन जुनी सांगवी दे" असं म्हणत कालियाने शर्टच्या खिशातली शंभरची नोट पुढे केली.

"सुट्टे नाहीत." कंडक्टर कचरत बोलला.

मग संग्रामने त्याच्या शर्टच्या खिशातून ओल्या नोटा काढल्या आणि दहाच्या नोटा वेगळ्या करायला लागला. ते पाहून कंडक्टर म्हणाला "अं... ओल्या नोटा नाही चालणार."

संग्रामने झटकन नोटा कालियाकडे देऊन पुढे जाऊन कंडक्टरची कॉलर धरली आणि रागात म्हणाला "भाडखाऊ! तिकीट काढतोय तर शहाणपणा करतो का? नाह्य काढत जा तिकीट. काय उपटशील?"

कंडक्टरच्या छातीत धडकी भरली. भीतीने हात-पाय लटपटायला लागले.

संग्रामने कॉलर आणखी पिरगळली आणि "नाव काय तुझं भाड्या?" असं विचारून कंडक्टरच्या शर्टवरची नेमप्लेट शोधायला लागला. शर्टच्या खिशावर पिनेने अडकवलेली नवीन नेमप्लेट आता तिरपी झाली होती. कंडक्टरच्या गुंडीवाल्या खिशावरच्या छोट्या झडपेत त्या तिरप्या झालेल्या नेमप्लेटचं वरचं टोक थोडं घुसलेलं होतं. त्यावरचं नाव संग्राम मोठ्याने वाचू लागला "नील... घनश्याम... जगताप". मग काहीतरी विचार करत परत हळू आवाजात "घनश्याम जगताप?" असं म्हणत संग्रामने कॉलर वरची पकड सैल केली.

कालियाकडे पाहून संग्रामने विचारलं "नाव ऐकल्यासारखं वाटतं ना?"

कालियाने वर पाहत मान थोडी तिरपी केली आणि आठवत म्हणाला "अरे ते नाही का…? अं... पिंपरी वाले घनश्यामराव. आबांचे मित्र. मागच्या महिन्यात भेटलेले. पिंपरीच्या वाड्यावर आबांशी गप्पा मारत होते." 

कालिया याच कारणामुळे संग्रामच्या बिझनेस मध्ये एकदम महत्वाचा माणूस होता. याच्या तीक्ष्ण बुद्धीतून कुठल्याच गोष्टी सुटत नाहीत आणि हे माहित असल्याने संग्राम त्याचे सल्ले गंभीरपणे घ्यायचा.

घनश्याम रावांच नाव ऐकून संग्रामला ती घटना पूर्ण आठवली. "आयला, खरंच की!" असं म्हणत कॉलर सोडून संग्रामने हाताने कंडक्टरच्या शर्टाच्या दोन्ही खांद्यावर न पडलेल्या सुरकुत्या झाडायचा प्रयत्न केला.


आता कंडक्टरच्या डोळ्यात पाहत संग्रामने विचारलं "पिंपरीच्या घनश्यामरावांचा मोठा पोरगा ना रे तू?" 

भयंकर घाबरलेल्या कंडक्टरने आवंढा गिळत घश्यातुन घर्र्र आवाज काढत मान हलवली.

"सांग तुझ्या पप्पांना...", संग्राम आता प्रेमाने बोलत होता "...संग्राम वाघमारेने नमस्कार सांगितला म्हणून. अन् आबा आठवण काढत हायेत म्हणावं. जात जा भेटायला अधून मधून. बर वाटतं आबांना जुने लोकं भेटले की."

संग्राम वाघमारे हे नाव ऐकून कंडक्टर आणखीच भेदरला. परत आवंढा गिळत मानेनेच होकार दिला आणि तिथून लवकर सटकायची वाट पाहू लागला.

संग्राम वाघमारे हा वाघवस्ती वरील कुप्रसिद्ध गुंड होता. सर्जेराव आबांचा पोरगा. आता आबा पिंपरीचं साम्राज्य सांभाळत होते आणि तरुण संग्रामने नुकताच सांगवीचा कारभार हातात घेतला होता.

"कालिया, दहाच्या दोन नोटा दे रे काढून." असं कालियाला सांगत मग कंडक्टरकडे पाहून, एकेरी हाक मारणं सोडून, संग्राम म्हणाला "फाडा दोन जुन्या सांगवीची तिकिटं."

"नाही नाही राहूद्या." असं घाबरत म्हणत कंडक्टरने पटकन दोन तिकिटे काढून पंच करून कालियाला दिली. कालियाकडून पैसेपण घेतले नाही. आणि तिथून निघून जायचा प्रयत्न करू लागला. तोच संग्रामने "एक मिनिट..." असं म्हणून कंडक्टरला थांबवलं.

"घनश्यामराव लय कौतुक करतात तुमचं." संग्राम एकदम काळजीने बोलत होता, "श्रावण बाळासारखा मोठा पोरगा जन्माला आलाय म्हणून. पण फक्त एकच खंत त्यांना...", असं बोलून संग्रामने कालियाकडे पाहून विचारलं "काल्या, घनश्यामरावांच्या छोटया पोराचं नाव काय रे?"

कालिया परत आठवत उत्तरला "आ.. तो मोठा नील आणि... लहाना स्वप्नील."

कंडक्टरकडे पाहत संग्राम पुढे म्हणाला "हां, त्योच! एक काम करा तुम्ही निलराव. घरी गेलं की त्या स्वप्नीलच्या एक फनकण कानफटात लावा. मोठ्या भावाचं कामच हाये ते. तुमचे पप्पा सांगत होते, नुसती ही नौकरी सोड ती नौकरी सोड. कुठंच थांबत नाय. येडं करून सोडलंय घरच्यांना. एक कानाखाली मारून समजून सांगा. तसे आबा ओळखी काढून तुमच्यासारखी सरकारी नौकरी शोधतायत. ती नाय सोडली म्हणजे झालं."

स्वप्नीलचं नाव ऐकताच कंडक्टर चपापला आणि हळूच त्याने डावा हात शर्टच्या खिशावर नेवून ठेवला. मग एकदम हळू आवाजात होकारार्थी मान हलवत "हां" म्हणून कंडक्टर तिथून चालता झाला. कालिया आणि संग्राम यांच्याकडे पाठमोरा होत थेट ड्राइव्हर जवळ जाऊन थांबला. मग पटकन खिशावरचा हात काढून कंडक्टरने स्वतःची नेमप्लेट पाहिली. तिरप्या नेमप्लेट वर अजूनही पहिलं नाव "NEEL" असंच दिसत होतं. "SWAP" अजूनही खिशाच्या वरच्या झडपेत लपलेलं होतं. मोठा सुटकेचा निश्वास सोडून त्याने संग्राम आणि कालियाकडे एक चोरटी नजर टाकली. कोणी पाहत नाही हे पाहून झपकन ती नेमप्लेट पिनसहित ओढून काढली आणि पॅन्टच्या खिशात लपवली. आज स्वप्नीलचा कंडक्टरचं ट्रेनिंग संपून नव्या नोकरीचा दुसराच दिवस होता.


२. बॉम्ब


"पंडित हिशोब करतो का कविता लिहतो रे? किती वेळ लावतो?" हॉटेलच्या बीलावरून कोणी किती खाल्लं आणि त्यानुसार प्रत्येकाने किती पैसे द्यायचे याचा हिशोब करत असणाऱ्या अच्युत कविपंडितला त्याचा मित्र विनय कंटाळून म्हणाला. हॉटेल वैभव मध्ये रात्रीच्या जेवणाच्या बीलाकडे पाहत, टेबलवर उजव्या हाताला ठेवलेल्या मोबाईलच्या calculator मध्ये काहीतरी टाईप करत अच्युत हिशोब करण्यात गुंग होता. त्याने विनयच्या बोलण्याकडे लक्ष न देता "दो बटर रोटी किसने खायी?" असं त्याच्यासमोर बसलेल्या विनय आणि जयकिशनला उद्देशून विचारलं. यावर जयकिशनने त्याच्या खास उत्तर-भारतीय शैली मध्ये "मैने भाई!" असं उत्तर दिलं. आणि ते ऐकून अच्युत परत हिशोब करण्यात गुंग झाला.


पुणे विद्यापीठाच्या मेन गेट समोर, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या वैभव हॉटेलमध्ये आत्ताच रात्रीचं जेवण संपवून, विनय, अच्युत आणि जयकिशन हे एकाच वर्गातील तीन जण रूमवर निघायच्या तयारीत होते. नुकताच तिघांनी पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात एम. एस. सी. साठी प्रवेश घेतला होता आणि हॉस्टेलच्या यादी मध्ये नाव नसल्याने नव्या सांगवी मध्ये एक रूम भाड्याने घेऊन तिघे राहत होते.


हे तीन जण एकाच रूम मध्ये कसे राहू शकतात असा प्रश्न कोणालाही पडेल असेच तिघांचे तीन टोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व होते. बुलढाण्या वरून आलेला सडपातळ बांध्याचा अच्युत कविपंडित हा सतत पाठीला लॅपटॉपची बॅग, त्यात डाव्या बाजूला बाहेर एक निळ्या रंगाची पाण्याची बाटली आणि कानात हेडफोन घालून कसलेतरी गाणे ऐकत राहायचा. हा तसा हळव्या मनाचा, त्याच्याच जगात गुंग राहणारा, आणि वाट्टेल त्या विषयावर फावल्या वेळात मुक्तछंदात कविता करणारा मुलगा होता. खरं तर कविता त्याच्या घराण्यातच होती. त्याचे कुणीतरी पूर्वज कुठल्यातरी राज-दरबारात कवी होते. त्यामुळेच त्यांचं आडनाव पंडितचं कविपंडित असं झालं असं सांगतात. हे अच्युतने त्याच्या वर्गातील सर्वांना पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. त्यानंतर याला सर्व जण फक्त पंडित याच नावाने हाक मारायला लागले. पंडितचं वागणं एवढं तर्हेवाईक असायचं की तो कोणत्या परिस्थितीत कसा वागेल हे त्यालासुद्धा माहित नसावं, असं त्याला जवळून ओळखणारे सांगत असत.


दुसरा म्हणजे मुंबई वरून आलेला विनय भावे. हा एकदम शांत स्वभावाचा आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा लावणारा. विनय वर्णाने एवढा गोरा की तो लोकांना उत्तर भारतीय किंवा पाश्चिमात्य देशातून आला असंच वाटायचं. हा पंडित इतकाच सडपातळ पण सतेज चेहऱ्यामुळे किंवा कदाचित उंची जरा कमी असल्याने दिसायला एकदम तरुण दिसत असे. जसं काय नुकतीच दहावी-बारावीची परीक्षा देऊन आला असावा. विनय एकदम प्रॅक्टिकल विचार करत असे. पटकन सरळ-सरळ बोलून विषय संपवत असे. कधी कोणाच्या भांडणात नाही आणि कधी कुणाला वाईट शब्द नाही. खरं तर त्याला वाईट शब्द बोलता येतात किंवा शिव्या वगैरे देता येतात यावर कुणाचाच विश्वास नाही. त्याच्या बालमित्र संदेशने एकदा सांगितलं होतं की विनय खूप वाईट शिव्या देऊ शकतो. असं सांगतात की लहानपणी दुसरीला असतानाच त्याने शाळेतल्या एका शिक्षकाला आई-माई वर शिव्या दिल्या होत्या. त्या लहान पोराच्या तोंडून एवढ्या घाण शिव्या ऐकून शिक्षकाला फिट आली. तेव्हा विनयने त्याच्या वडिलांचा भयंकर मार खाल्ला होता आणि मग परत त्याने कधीच एकही शिवी दिली नाही. पण ही गोष्ट कितपत खरी आहे हे स्वतः संदेशलाही माहित नाही. त्याने सुद्धा विनयच्या तोंडून आजपर्यंत एकही शिवी ऐकलेली नाही.


आणि तिसरा म्हणजे अलाहबाद वरून आलेला जयकिशन त्रिपाठी. सव्वा-सहा फूट उंचीच्या आणि आडदांड शरीराच्या जयकिशनने जिम वगैरे करून एखाद्या बॉलीवूडच्या हिरोला लाजवेल अशी उत्तम शरीरयष्टी बनवली होती. तो बॅडमिंटनमध्ये राज्यस्तरावर स्पर्धा वगैरे जिंकून आला होता. त्यामुळे सध्या जिम बंद असूनसुद्धा हा एकदम फिट होता. या राजबिंड्या जयकिशनवर, फक्त भौतिकशास्त्र विभागातल्याच नाही तर पुणे विद्यापीठातील सर्व विभागातील मुली मरत असत. पण जयकिशनला मात्र हे सर्व माहित असून त्यावर त्याला तिळमात्र गर्व नव्हता आणि तो मनापासून सगळ्यांशी नम्रतेने वागायचा प्रयत्न करायचा. याचं कारण कदाचित जयकिशनचं जुन्या काळातील देशभक्त क्रांतिकारी लोकांवर असणारं प्रेम असावं. विशेष म्हणजे शहीद भगत सिंग. हा भगत सिंग बद्दल बोलताना कधीच थांबत नसे आणि त्यांनी कारावासात लिहलेली सर्व पत्रे याची तोंडपाठ होती. हा इतका आदर्शवादी होता की प्रत्येक ठिकाणी स्वतःला बाजूला करून फक्त दुसऱ्यांचाच विचार करायचा.


पंडितचा हिशोब संपत नाही आणि बस यायची वेळ झाली हे पाहून जयकिशन म्हणाला "पंडित, इसबार मैं देता हुं. तुम बाद में हिसाब-किताब करके वापस दे दो", आणि पंडितचं आणि विनयचं न ऐकता सगळं बील त्याने भरून टाकलं.

वरती बडीशेपच्या वाटीमध्ये दहा रुपयांची नोट टीप म्हणून ठेवली.

विनयने लगेच ती नोट उचलून "पागल जयकिशन!" असं म्हणून जयकिशनच्या शर्टाच्या खिशात ठेवून दिली. आणि पंडितकडे पाहून म्हणाला "लई पैसे उतू चाललेत याचे. टीप देतोय!"

विनय काय म्हणाला हे हिंदी बोलणाऱ्या जयकिशनला आजिबात समजलं नाही. तसा तो मराठी शिकण्याचा प्रयत्न करत होता, पण पुण्यात येऊन त्याला फक्त एकच महिना झाला होता. दोन चार साध्या शब्दांपलीकडे त्याला जास्त मराठी भाषा समजत नव्हती. तरीही वर्गातल्या मुलांकडून मराठी शिव्या मात्र त्याने लवकरच शिकून घेतल्या होत्या.

"क्या हुआ विनय?" जयकिशन विनयला म्हणाला आणि उत्तराची वाट न पाहता पंडित कडे पाहून पुढे म्हणाला, "पंडित, कोई गंदी गाली दी क्या इसने मुझे?"

"कुछ नहीं जयकिशन. विनय क्या गाली देगा? सिर्फ टीप मत दे ऐसा बोल रहा है", पंडितने लगेच हिंदीमध्ये भाषांतर करत सांगितलं.

"पैसे उतू चालले, हे पण सांग की पंडित हिंदी मध्ये" असं म्हणत विनय हसला.

"तुम बता नहीं रहे हो. लेकिन पक्का कुछ गंदी गाली दिये हो." असं म्हणत जयकिशन पण हसला.

"कुछ नही जयकिशन. सिर्फ टीप मत दे." असं म्हणून विनयने बॅग उचलून खांद्याला अडकवली.

नम्र जयकिशन पण "ठीक हैं. जैसा तू बोलेगा", असं म्हणत बॅग अडकवून बस-स्टॉप कडे निघाला.


वैभव हॉटेलच्या समोर दोन मिनिटांच्या अंतरावर एक बस-स्टॉप होता. तिथे पाषाण औंध आणि बाणेरला जाणाऱ्या बस थांबत असे. रात्रीची साडेदहाची वेळ असेल. हे तिघे तिथं सांगवीला जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे होते. लांबूनचं त्यांना बस दिसली. स्टॉप जवळ येत बसचा वेग कमी होतं गेला आणि ती बस-स्टॉपच्या थोडं पुढे जाऊन थांबली. बस समोरून जाताना त्यांना बसमध्ये गर्दी दिसली आणि दरवाजात उभे असलेली दोन माणसं. डाव्या बाजूला उभा असणारा एक जण. त्याचा रंग एकदम काळा. बस-स्टॉप वर जर अंधार असता तर तो दिसलासुद्धा नसता. विनयला तर तो दिसलाच नाही. आणि उजव्या बाजूला दुसरा. ओला आणि भयानक रानटी दिसणारा माणूस. हे दोघे म्हणजे मनपाच्या बस स्टॉप वरून बसलेले सच्चू कालिया आणि संग्राम वाघमारे.


जयकिशन, पंडित आणि विनय पळत जाऊन बसमध्ये शिरायचा प्रयत्न करू लागले. सगळ्यात आधी विनय पोहोचला आणि शिताफीने कालिया आणि संग्रामच्या मधून बसमध्ये चढला. तरी चढताना त्याचं कोपर संग्रामला लागतं. विनयला तसा मुंबईमध्ये राहून तिथल्या लोकलच्या प्रवासाचा दांडगा अनुभव होता. दरवाज्यातील फक्त दोन माणसं म्हणजे त्याच्यासाठी काहीच नव्हतं पण बस जरा पुढे थांबल्याने लांबून येणाऱ्या बस-स्टॉप वरच्या अपुऱ्या प्रकाशात त्याला कालिया लवकर दिसलाच नाही. अचानक कालिया दिसल्याने दचकून विनय उजव्या बाजूला किंचित झुकला आणि संग्रामच्या पेकाटात कोपर मारलं गेलं. चूक समजून विनयने लगेच "सॉरी काका" म्हणून संग्रामची माफी मागितली. 'काका' ऐकून संग्रामच्या कपाळावर आठ्या पडल्या.


नंतर लगेच पंडित दरवाजातून आत घुसला. आधी संग्रामच्या पायाला लाथ घालत, मग कालियाला धडकत आणि परत संग्रामच्या पेकाटात गुढगा घालत कसाबसा पंडित पायऱ्या चढून वर गेला. जाता जाता त्याच्या निळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटलीनेपण कालियाच्या नाकावर वार केला. संग्राम जोरात कन्हला. कालिया पण विव्हळला. सॉरी वगैरे काही न म्हणता, संग्राम आणि कालियाकडे दुर्लक्ष करत पंडितने स्वतःलाच बसमध्ये चढल्याबद्दल मनातल्या मनात शाबासकी दिली आणि मागे वळून जयकिशनकडे पाहत राहिला. विनय हे सगळं पाहत होता. पंडितच्या लाथा-बुक्क्यांचे प्रहार पाहून त्याने डोक्यावर हात मारून घेतला.


जयकिशन मात्र हुशार निघाला. त्याने बाहेरूनच आरामात फक्त एक पाय पायरीवर टाकत हळूच आतली रेलिंग पकडली व कोणालाच स्पर्श न करता तसाच दरवाजाला लटकला. आणि मग "अंकल जरा साईड हो जायीयेगा. अंदर जाना हैं" असं नम्रपणे संग्रामला उद्देशून म्हणाला.


बस कधीच परत वेगात निघाली होती. विनयने मारलेल्या कोपराची आणि मग पंडितने मारलेल्या गुढग्याची कळ सोसून सावरण्याच्या आतच परत "अंकल" आणि हिंदी संग्रामच्या कानावर पडली, ती पण उत्तर भारतीय शैलीमधली. संग्रामचा संताप झाला. जयकिशनकडे तात्पुरतं दुर्लक्ष करत पुढे जाऊन झपकन पंडितचं गचुंड धरत संग्राम संतापून म्हणाला "लय माज आलं का रं तुला भाडया?"

विनय लगेच मध्ये पडत संग्रामला म्हणाला "जाऊ द्या ना काका. चुकून लागलं असेल."

'काका', 'अंकल' आणि परत 'काका' ऐकून संग्रामच्या रागाचा पारा आणखीच चढला. विनयकडे पाहून तो रागाने म्हणाला "तू गप रे भाडखाऊ. तुला पण पाहतो थांब."

तोपर्यंत कालियापण सावरला होता. त्याने आधी जयकिशन कडे पाहिलं. मग काहीतरी विचार केला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून लगेच विनयची कॉलर पकडली.


इकडे जयकिशनला काहीच समजलं नाही की काय झालं. का म्हणून हे लोकं भांडायला लागले. तो सुद्धा लगेच मध्ये पडला आणि म्हणाला "रुको रुको. झगडा मत करो. क्या हुआ बताओ मूझें."

एका हाताने पंडितची कॉलर धरत जयकिशनकडे वळून पाहत संग्राम रागाने म्हणाला "हा भैय्या सांगणार का मला आता काय करायचं ते? भाडखाऊ दुसऱ्या राज्यातून येऊन आमच्यावर शिरजोरी करतात."

"नाही हो, आम्ही इथलेच" विनय मधेच बोलला.

"गप बस की तू बगळ्या" कालियाने विनयच्या गोरेपणावर टोमणा मारत दम भरला.

"अंकल, गाली मत दिजीये. बाताओ हमें क्या हुआ?", संग्रामचा 'भाडखाऊ' शब्द ओळखून जयकिशन त्याला म्हणाला.

"अरे उपर चढते वक्त थोडा पैर लगा अंकलको" पंडितने अशाही परिस्थितीत हिंदीत जयकिशनला समजावून सांगितलं.

परत अंकल आणि हिंदी. आता संग्रामच्या कपाळावरील शीर रागाने थड्थडू लागली. कालिया सुद्धा संग्राम कडे पाहून घाबरला. 

"भाडया, पैर लागला म्हणे. पेकाटात पायाचा सापळा मारला माझ्या. कुठून येतो रे एवढा कॉन्फिडन्स काडी पहिलवान?" पंडितच्या सडपातळ बांध्यावर टीका करत दात खाऊन संग्राम बोलला.

"नाही समजणार ह्यलापन मराठी. हा पन भैय्या दिसतोय." कालिया संग्रामला उद्देशून म्हणाला.

पंडित आता सांगणारच होता की तो मराठी आहे, तोच जयकिशन मध्ये पडून आत्ताच शिकलेल्या तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाला "मुझसे बात करो. मला मराठी येता."

इकडे विनयने परत एकदा डोक्यावर हात मारून घेतला. हे सगळं चालू असताना कालिया मधे-मधे कंडक्टरकडे पाहत होता. आणि स्वप्नील कंडक्टरपण बाकी बसमधल्या प्रवाशांसारखं काय चाललंय हे गुपचूप चोरट्या नजरेने पाहत होता.


"लाथ घालू का रे याला काल्या?" संग्राम जयकिशनकडे पाहून कालियाला म्हणाला.

"नका काका. चुकून झालं. सोडून द्या ना. हवं तर मी सॉरी म्हणतो परत." विनयने संग्रामकडे पाहून विनवणी केली.

"तू क्यो बोल रहा है सॉरी?" मधेच पंडितने शहाणपणा दाखवला.

"हां. तुम लोंग रास्ते मैं बैठे हो. हात पैर तो लगना ही हैं." जयकिशनने पण आता परिस्थिती पाहून पंडितची बाजू घेतली.

इकडे संग्रामचा जळफळाट झाला. आता त्याचा ताबा सुटणार आणि जयकिशनला लाथ किंवा पंडितच्या कानाखाली बसणार तोच कालियाच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्याने आपला सॅमसंगचा नवीन मोबाईल "हां आबा देतो देतो" असं म्हणून डोळ्याने खुणावत संग्राम कडे दिला. संग्रामने लगेच पंडितचं गचुंड सोडून दिलं. हाताने तोंडावर बोट ठेवून शांत राहायचा इशारा करून फोन घेतला. आणि फोन वर अचानक सूर बदलून एकदम प्रेमाने बोलायला लागला "हां आबा... नाही आबा... सायलेंट वर असन... करतो आबा... नवीन इंपोर्टेड माल ना? नाग्याने आणला असल आत्तापर्यंत... पोचोवतो मी हप्ता उद्या सकाळीच... बसनी चाललोय... गाडी दिलीय साहेबांच्या PA ला, उद्या आणून देईन वस्तीवर... ओके आबा" असं म्हणून कॉल बंद करून कालियाला मोबाईल परत दिला.


कॉल नंतर थोडा शांत झालेला संग्राम पाहून कालियाचा जीव भांड्यात पडला. पण लगेच संग्रामने पंडितकडे पाहून कालियाला सांगितलं "काल्या लाव रे फोन. घे पोरं बोलवून. सांगवीत गाडी थांबवून या तिघांची जिरवतोच आज. तोपर्यंत उतरून नको देऊ भाड्यांना."

पण कालिया फोन लावण्याऐवजी संग्रामच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला "संग्राम, ते घनश्यामरावांचं पोरगं पाहतय सगळं. नको काही उद्योग. आबांना नाह्य चालणार बसमधी राडा केलेलं. दे सोडून. जाऊदे. आधीच आजचा दिवस लै खराब गेलाय."

संग्रामला कालियाचं म्हणणं पटलं. मग संग्रामने हळूच कंडक्टरकडे आणि नंतर या तिघांकडे नजर टाकली आणि हताश होऊन हळू आवाजात एक घाण शिवी दिली. उजवा पाय जोरात आपटून पंडित कडे पाहून म्हणाला "जा भाडखाऊ. सोडलं तुला आज. नशीब चांगलं तुझं." 

मग कालिया विनय कडे पाहून म्हणाला "तुला येतं ना मराठी? आवर या भैय्यांना. परत भेटलात तर फोडून काढू." 


मग सगळं शांत झालेलं पाहून जयकिशन सुद्धा पायऱ्या चढून वर आला. तो पंडित बरोबर तिथेच उभा राहिला. बसमध्ये तशी जास्त जागा नव्हती म्हणून तिथे जवळच उभं राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पंडित अजूनही संग्राम आणि कालियाकडे डोळे मोठे करून पाहत होता. संग्राम आणि कालियाने मात्र लगेच तिघांकडे दुर्लक्ष केलं. संग्रामने हळू आवाजात कालियाला नाग्या काशीदला फोन लावायला सांगितलं.


इतका वेळ झाला तरीही कंडक्टर तिकीट विचारायला मागे येत नाही हे पाहून, जयकिशन आणि पंडितला तिथंच थांबायला सांगून, विनय तिकीट काढायला पुढे निघून गेला. इकडे पंडित काही कारण नसताना अजूनही संग्राम आणि कालिया यांच्याकडे चोरून पाहत होता आणि जयकिशनला हिंदी मध्ये काय झालं ते हळू आवाजात सांगत होता.


"हां नाग्या, पोचला का घरी?" कालिया नाग्या काशीदशी फोनवर बोलत होता.

शेजारी उभा राहून संग्राम हताश मनाने परत डावा पाय बाहेर काढून वाळवत बसला होता.

"कालिया, त्याला नवीन माल कायहे विचार, आबा सांगत होते इंपोर्टेड हाये." संग्राम कालियाकडे न पाहता म्हणाला.

कालियाने मानेने होकार दिला "नाग्या, या खेपेला कस्टमला चुकवून नवीन काय आणलं? "

"... काय? आर डी एक्स? बरं." काय ऐकलं हे न समजता कालिया म्हणाला.

"... गोडाउन मध्ये ठेवून दे. उद्या सकाळी एक खोकं पोचवायचंय." हे सांगून कालियाने फोन ठेवून दिला.

"नवीन काहीतरी आरडीएस का काय आणलं सांगतोय नाग्या. एकदम बॉम्ब हाये म्हणतोय." असं खुश होऊन कालियाने संग्रामला सांगितलं.

"आबांनी पाठवलं म्हणजे आसल." असं म्हणून संग्रामने आता उजवा पाय बसच्या बाहेर काढला.


तसे कालिया आणि संग्राम हळू आवाजात बोलत होते, पण पंडित कान देऊन ऐकत होता. "आर डी एक्स" ऐकून पंडित चपापला. जयकिशनच्या कानावर सुद्धा नेमकं "आर डी एक्स" नाव पडलं. आणि नंतर "बॉम्ब" ऐकून दोघेही हादरले. तिथे न थांबता गर्दीतून लोकांना धक्के देत पुढे सटकले.


इकडे विनय तिकिटे घेऊन माघारी फिरला होता. कंडक्टरने काहीच तक्रार न करता शंभरचे सुट्टे देऊन गुपचूप तीन नव्या सांगवीची तिकिटे दिली होती. बसच्या पुढच्या भागात आलेल्या जयकिशन आणि पंडितला पाहून विनय म्हणाला "बरं झालं आलात तुम्ही. दारूचा वास येत होता त्यांचा. काय बेवड्यांच्या नादी लागायचं?"

जयकिशन आणि पंडित काहीच बोलले नाही. विनयला बाजूला घेऊन एकदम हळू आवाजात, घाबरत पंडित आणि जयकिशनने आत्ताच काय ऐकलं ते सांगितलं.

"चूप सालों. कुछ भी! यही टाईम मिला क्या तुम्हे मजाक करने का?" मोठ्या आवाजात विनय म्हणाला.

जयकिशन आणि पंडितने इकडे तिकडे चोरट्या नजरेने पाहून विनयचं बोलणं थांबवलं. त्यांचे हाव-भाव पाहून विनयसुद्धा थोडा गंभीर झाला.

जयकिशनने त्याला परत अत्यंत हळू आवाजात कुजबुजत सांगितलं "सच्ची मे भाई. माँ कसम. मैंने भी सही सुना. पक्का स्लीपर सेल एजन्ट हैं दोनो." आणि हळूच कालिया आणि संग्रामकडे एक नजर टाकली.

"नहीं रे जयकिशन. जादा से जादा मवाली गुंडे दिखते है. कुछ नहीं ऐसा. पक्का तुमने कुछ और सुना." विनय सुद्धा दरवाजाकडे एक चोरटी नजर टाकून हळू आवाजात म्हणाला.

"विनय, मुझे पुरा डाउट है. ऐसेही लोग होते है स्लीपर सेल मै." पंडितने इतक्या आत्मविश्वासाने सांगितलं की जसं काय त्याला ATS किंवा RAW चा अनुभव असावा.

"साले इतने पागल तो नहीं होगे लोग की जोर से बस में आर डी एक्स और बॉम्ब बोलेंगे", विनयने विचार करून शंका काढली.

"बात तो तेरी सही हैं. लेकिन तुनेही बताया ना दारू पी के आयें हैं? गलतीसे बोल दिये होंगे." जयकिशनने सुद्धा विचार करून उत्तर दिलं.

"और बहुत धीरे बोल रहे थे. मै बहुत ध्यान से सून रहा था" पंडितने जयकिशनच्या उत्तराला पुष्टी दिली.

जयकिशन आणि पंडितने जे ऐकलं त्यावरून जो अंदाज लावायचा तो लावला होता आणि विनयला पटवून सांगत होते. विनयचा अनुभव सांगत होता की जास्तीत जास्त छोटे-मोठे गुंड असतील पण स्लीपर सेल वगैरे नाही. मात्र विनयने स्वतः काहीच ऐकलं नव्हतं आणि मग त्यालासुद्धा जयकिशन अन् पंडितच्या निष्कर्षावर थोडा-थोडा विश्वास बसायला लागला होता.


आता हळू हळू विनयला कालिया आणि संग्राम स्लीपर सेल एजन्ट दिसायला लागले. अशीच कुजबुजत थोडा वेळ चर्चा झाली. जयकिशनच्या म्हणण्या नुसार शांत राहून दुर्लक्ष करणं योग्य नव्हतं. काहीतरी करायला पाहिजे. विनयने यावर उपाय सांगितला की बसमध्ये नको पण आपण उतरलो की लगेच पोलिसांना फोन करू आणि जमलं तर थेट पोलीस स्टेशनला जाऊ. पण मग जयकिशनने शंका उपस्थित केली की जर हे लोक आपल्या आधी उतरले तर? मग असं ठरवलं गेलं की ते दोघे जिथे उतरतील तिथेच या तिघांनी उतरायचं. आणि मग पोलिसांना फोन करायचा. पण मग पंडितने शंका विचारली की आपण कसं वर्णन करणार यांचं. हे कोण? कुठून आले? तो काळा तर नीट दिसला पण नाही. विनयने समजावलं की तो प्रश्न पोलिसांचा आहे. पण मग पंडितला आठवलं की उद्या सकाळीच आर डी एक्सचं खोकं कुठेतरी पोचवायचं आहे असं त्याने फोन वर ऐकलं. तोपर्यंत उशीर झालेला चालणार नाही असं जयकिशन म्हणाला. मग पंडितच्या सांगण्यावरून आणि जयकिशनच्या अनुमोदनाने नवीन प्लॅन रचला गेला. पाठलागाचा! बसमधून उतरले की त्या दोघांचा गुपचूप पाठलाग करायचा, चित्रपटांमधील गुप्तहेरांसारखा, आणि कुठे जातात ती जागा पाहून ठेवायची. मग पोलिसांना सगळी तंतोतंत माहिती द्यायची ठिकाणांसहित. विनयने या प्लॅनच्या विरोधात बोलण्याचा थोडा प्रयत्न केला पण जयकिशनच्या आदर्शवादापुढे आणि पंडितच्या उत्साहापुढे विनयच्या प्रॅक्टिकल वृत्तीने हार मानली. आणि तिघांनी मनोमन पाठलागाची तयारी सुरु केली.


३. पाठलाग


औंधच्या पुढे पोहोचल्यावर बसमधील गर्दी कमी झाली. जयकिशन आणि विनयला बसण्यासाठी जागा मिळाली. पंडित त्यांच्या सीट जवळच्या खांबावर टेकून उभा राहिला होता आणि दरवाजात असणाऱ्या संग्राम आणि कालिया वर सावधपणे पाळत ठेवून होता. नव्या सांगवीचा यांचा नेहमीचा पाण्याच्या टाकी जवळचा स्टॉप आला, तरीही हे तिघे आणि दरवाजातील ते दोघे बसमधून उतरले नाहीत.


कालियाने थोड्या वेळापूर्वी या तिघांची, एकमेकांजवळ उभे राहून खाली मान घालून चाललेली कुजबुज आणि अधून मधून संग्राम आणि स्वतःकडे टाकलेले चोरटे कटाक्ष पहिले होते. पण आणखी काही भांडण नको म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. संग्राम मात्र अजूनही कपडे वाळवण्यात गुंग होता. बसचा शेवटचा स्टॉप, जुन्या सांगवीचा बस डेपो, आल्यावर लगेच त्याच दरवाजातून संग्राम आणि कालिया उतरले आणि आपल्या नेहमीच्या वेगात चालायला लागले. यांच्या मागोमाग, पुढच्या दरवाजातून विनय, पंडित आणि जयकिशन उतरले. जयकिशनने बुटाची लेस बांधण्याचं नाटक केलं आणि थोडा वेळ वाया घातला. मग जेव्हा संग्राम आणि कालिया थोडं अंतर पार करून पुढे निघून गेले तेव्हा हे तिघे अंतर ठेवून त्यांच्यामागे चालायला लागले.

 

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रस्त्यावर आता जवळपास कुणीच दिसत नव्हतं. बस-डेपोच्या बाहेर डावीकडे वळून पूर्वेकडे जाणाऱ्या मोठ्या रस्त्याने कालिया आणि संग्राम झपाझप चालायला लागले. डावीकडे वळताना कालियाने मागे पाहिलं आणि त्याला मागे येणारे हे तीन जण दिसले. कालियाला आता काहीतरी शिजतंय याची शंका यायला लागली होती.


"ये पंडित, हळू चल ना" विनय हळू आवाजात पंडितच्या खांद्यावर हाताने स्पर्श करत म्हणाला. जयकिशनच्या बुटाची लेस बांधून झाल्यापासून पंडित खूपच उत्साहात पटापट चालायला लागला होता. जसा काय संध्याकाळी फिरायला निघालाय अशाच अविर्भावात. सगळ्यात पुढे पटापट, बिनधास्त आणि उत्साही चाल! इकडे मात्र विनयच्या हृदयात घाबरून धडधड होत होती. आपण काहीतरी खूप मोठी चूक करतोय हे त्याला सारखं वाटत होतं. जयकिशनच्या छातीतपण जोरात ठोके पडू लागले होते. पण ते भीतीचे नसून बॅडमिंटनच्या मॅच आधी किंवा काही तरी साहसी प्रकार करण्याआधी पडणारे ठोके होते.


रस्ता एकदम सरळ होता. अशावेळी रस्त्यावर जवळपास कुणीच नव्हतं. त्यात रस्त्याच्या कडेने लागलेल्या पिवळ्या लाईट्सच्या उजेडात रस्ता उजळून निघालेला. अशा परिस्थितीत काल्पनिक गुप्तहेर जेम्स बॉन्ड सुद्धा न कळता पाठलाग करू शकत नाही आणि इथे तर हे तिघे अर्ध्याच तासापूर्वी भांडलेले! कालियाने वीस-पंचवीस पावलानंतर थोड्या अंधाराचा फायदा घेत, परत हळूच वळून मागे पाहिलं आणि ओळखलं की शिकार स्वतःहून आपल्या तावडीत येत आहे.


"संग्राम तुला लै इच्छा होती ना त्या बस मधल्या भैय्यांना मारायची?" संग्रामच्या गळ्यात हात टाकत हळू आवाजात कालिया म्हणाला, "थांब तुझी इच्छा पूर्ण करतो आज."

"कशी करणार भाड्या? तुझ्यामुळं आणि त्या कंडक्टर मुळं सुटले ते." संग्राम चिडून बोलला.

"हा हा," हसत कालिया संग्रामच्या कानाजवळ कुजबुजला, "सावज स्वतः वाघाच्या गुहेत येतंय. मागं वळून बघू नको फक्त. येडपट भैय्ये आपल्याच मागं येतायत." 

अचानक मागे वळून पाहायची झालेली प्रबळ इच्छा बळंच काबूत ठेवून संग्राम गालात हसला, त्याचा चेहरा एकदम खुलला आणि त्याने प्रेमाने कालियाच्या पाठीवर थाप मारली.


विनय, पंडित आणि जयकिशन रस्त्यावरच्या फूटपाथ वरून, जमेल तेवढं दूर राहून पाठलाग करत होते. कालिया आणि संग्रामने एकदाही मागे वळून पाहिलं नाही म्हणून विनय खुश झाला. आता डावीकडच्या मूळव्याध सेवा रुग्णालया नंतर रस्त्यावरचे दिवे कमी झाले. पुढे उजवीकडे झाडे आणि डावीकडे मैदान लागले. रात्रीचा अंधार जाणवायला लागला. विनयने घाबरून, खूप झाला पाठलाग असं सांगायचा एक शेवटचा निष्फळ प्रयत्न केला पण आता पंडित आणि जयकिशन माघार घ्यायला तयार नव्हते.


इकडे आत्तापर्यंत संग्रामने फोन करून पिराजी आणि नाग्याला झोपेतून उठवलं होतं आणि पोरांना गोळा करायला लावलं होतं. दिव्यांची संख्या कमी झाल्याने रस्त्यावरचा अंधार वाढला आणि मग कालियाने दोन-चार वेळा मागे वळून खात्री केली की ते तिघे अजूनही पाठलाग करत आहेत. मग रस्ता एकदा उजवीकडे वळला आणि परत डावीकडे जिथे 'वाघवस्ती' असं लिहलेली एक नवीन पाटी होती.


वाघवस्तीच्या पाटीजवळून सरळ पुढे गेलं की दोन कच्चे रस्ते फुटतात. डाव्या बाजूच्या रस्त्याच्या शेवटी मुळा-पवना संगमाजवळ एक जुनं संगमेश्वराचं मंदिर आहे. आणि उजव्या बाजूच्या रस्त्याच्या शेवटी, मुळा नदीच्या किनाऱ्याजवळ, एक जुन्या काळातला वाघमाऱ्यांचा वाडा. या वाड्यासमोर मोठ्ठ पटांगण होतं आणि त्याच्या समोरचं एक आठ-दहा फूट उंचीची अर्धवट भिंत. वाड्याच्या अर्धवट बांधलेल्या कुंपणासारखी. त्या भिंतीची विकेट बनवून वस्तीतील पोरं दिवस-रात्र क्रिकेट खेळत असत. नवरात्रीला इथे पटांगणात दांडियाचा कार्यक्रम चाले. याचं महत्वाचं कारण म्हणजे वाघमाऱ्यांच्या वाड्यावर बसवलेले तीन-चार फ्लॅश लाईट्स. आत्ता या पटांगणात मात्र आठ जण लपून सावजाची वाट पाहत बसले होते आणि फ्लॅशलाईट्स बंद होत्या. तिथं एकदम भयाण अंधार होता.


कालियाने खात्री केली की तिघे अजूनही मागे येत आहेत. पाठलाग जवळपास चाळीस-पन्नास फुटांचं अंतर सोडून चालला होता. वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यातून हळूहळू चालत जाऊन कालिया आणि संग्राम वाड्यासमोरील पटांगणातील भिंतीमागे वळले. अंधारात झपाझप पावलं टाकून संग्रामने दरवाजा समोर जमलेल्या आठ पोरांना पटापट आदेश सोडले. कालिया लगेच अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याच्या पलीकडे जाऊन सावध लपून बसला. ठरल्याप्रमाणे तिघे पटांगणात आले की लगेच कालिया शिट्टी वाजवून इशारा करणार होता.


पंडित सर्वात पुढे चालत होता. आपल्यासारखा गुपचूप पाठलाग कोणीच करू शकत नाही असं त्याला मनापासून वाटत होतं. भिंतीजवळ जाऊन डोकावून पाहायची सुद्धा त्याला गरज वाटली नाही. तो सरळ पटांगणाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला. मग पाठोपाठ जयकिशन तिथे गेला आणि मागे घाबरत चालणारा विनय सुद्धा जयकिशनच्या मागे जाऊन उभा राहिला. तिघांना अंधारात काहीच दिसलं नाही. एका क्षणात त्यांना जाणीव झाली की आपण भयंकर फसलो आहोत. 


या वेडपटांचा पाठलाग कालिया रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने अंधारातून पाहत होता. कालियाने हसू आवरलं आणि तोंडात दोन बोटं घालून शिट्टी मारायचा प्रयत्न केला. फुस्स असा आवाज झाला. परत एकदा प्रयत्न केला तरी फुस्स. मग जोरात थुंकून तोंडानेच ओरडला "ये, लावा रे लाईट!"


आवाज कुठून आला हे समजायच्या आतच विनय, जयकिशन आणि पंडितचे डोळे प्रकाशाने झाकले गेले. तीन मोठे फ्लॅश लाईट्स लागले आणि वाघमाऱ्यांच्या वाड्यातील पटांगण दुधासारख्या शुभ्र प्रकाशाने उजळून निघाले. पटांगणाच्या मधोमध तीन जण डोळ्यावर हात ठेवून प्रकाशाची तीव्रता कमी करायचा प्रयत्न करत होते.


काही क्षणात तिघांचे डोळे तीव्र प्रकाशाला सरावले आणि समोरील दृश्य पाहून त्यांच्या छातीत धडकी भरली. त्यांना घेरून नऊ जण उभे होते. संग्राम सोडून बाकी सगळ्यांच्या हातात जाडजूड काठ्या होत्या. सगळ्यात समोर रानटी संग्राम ऐटीत हाताची घडी घालून उभा राहिला होता. उजेडात संग्राम आणखीच भयानक आणि रानटी दिसत होता.


सर्वात पुढे असणारा पंडित, हे भयाण दृश्य पाहून क्षणाचाही विलंब न लावता, झपकन पाठीमागे वळून सुसाट पळाला. तो एवढ्या वेगात पळाला की मागे उभे असलेल्या तीन जणांनी त्याला पकडायला झपाझप उड्या मारल्या, क्रिकेट मध्ये कॅच पकडायला जसे फिल्डर्स उड्या मारतात तसे, पण एकालाही सापडला नाही. संग्राम मात्र जागचा हलला नाही. मग भिंतीमागच्या रस्त्यावर कुणीतरी जोरात पडल्याचा आवाज झाला आणि त्या मागोमाग एखादं मोठं अजगर त्या कच्च्या रस्त्यावर लोळत असल्याचा आवाज आला. तोपर्यंत उड्या मारलेले फिल्डर्स उठून उभे राहिले होते आणि भिंतीमागे रस्त्याकडे पाहून जोरात हसायला लागले होते. "ये पिऱ्या, नाग्या काय हसताय रे भाड्यांनो? ह्ये जनावर आवरत नाही. या की इकडं." काकुळतीला येऊन भिंतीमागून कालिया ओरडला.


पंडितचं नशीब आज बलवत्तर नव्हतं. जरी तो पटांगणातून तीन जणांकडून सुटला तरी तो भिंतीपलीकडे रस्त्याच्या कडेला अंधारात दबा धरून उभा राहिलेल्या कालियाच्या तावडीतून सुटला नाही. कालियाने पायात पाय घालून पंडितला पाडलं. पंडित लगेच सावरून उठून परत पळणार तोच मागे जाऊन कालियाने त्याचा एक पाय पकडून ठेवला. पंडित जीव खाऊन हात मारत, वाकडा-तिकडा होत, पोटावर पाठीवर उलथा-पालथा पडत, पाय सोडण्याचा पराकाष्टेचा प्रयत्न करत होता. पण कालियाने सुद्धा पूर्ण ताकदीने त्याला पकडून ठेवलं होतं. तरीही पंडित काही थांबत नव्हता. आता दोन हातावर उड्या मारत त्याने आठ-दहा फूट कालियाला ओढत नेलं होतं. पण तोपर्यंत मोठ्याने हसणारे पिराजी आणि नाग्या काशीद कालियाच्या मदतीला आले. आता तिघांनी उचलून या भयंकर वळवळ करणाऱ्या पंडितला परत पटांगणात नेलं.


इकडे परिस्थिती ओळखुन आणि बसलेल्या धक्क्यातून सावरून जयकिशन आणि विनय गुपचूप उभे होते. विनय हळूच सरकत जयकिशनला खेटून उभा राहिला होता. तेवढंच त्याला जयकिशनजवळ उभं राहून सुरक्षिततेची जाणीव होत होती आणि स्वतःला जरा हिम्मत आल्यासारखी वाटत होती. जयकिशनने सगळीकडे नजर टाकून परिस्थितीचा मागोवा घेतला आणि काय करायचं याचा विचार करत होता.


पटांगणात आणला तरी पंडितची वळवळ थांबत नाही हे पाहून संग्रामने कालिया आणि पिराजीला हातानेच पंडितला त्याच्याजवळ घेऊन येण्याचा इशारा केला. त्यांनी पंडितला संग्राम समोर उभा केला. पंडित सरळ उभा राहायच्या आताच संग्रामने उजव्या हाताने एक फणकन त्याच्या कानाखाली मारली. अख्ख्या पटांगणात आवाज घुमला. पंडितच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. तो चार फूट उजवीकडे सरकला आणि अचानक शांत झाला. तिथेच उभा राहिला.


पंडितच्या कानाखाली मारल्याचा आवाज एवढा मोठा होता की पटांगणातील सर्वांच्या कानठळ्या बसल्या, वाड्यामागच्या गोठ्यात झोपलेल्या गाई खडबडून उठल्या आणि दूर कुठेतरी कुत्रे जोरात भुंकले. फक्त एकाच प्राण्याला आजिबात काही फरक पडला नाही. तो प्राणी म्हणजे आज पिराजीने आठवणीने मांडणीवर ठेवलेलं दूध, डोळे मिटून पिणारी काळी मांजर! ती या आवाजाने फक्त एक क्षण थांबली, पण डोळेही न उघडता परत जीभेने लपलप करत दूध पीत राहिली.


पिराजी आणि नाग्या काशीद आपापल्या जागेवर म्हणजे जयकिशन-विनयच्या मागे डाव्या-उजव्या बाजूला जाऊन उभे राहिले. संग्राम परत हाताची घडी घालून ऐटीत उभा राहिला. कालिया संग्राम शेजारी उभा राहून खिश्यातुन गायछापची पुडी काढू लागला. आता आपलंच राज्य या अविर्भावात संग्राम कुत्सित हसला आणि तिघांकडे पाहून म्हणाला "का रे भाड्यांनो, संग्राम वाघमाऱ्याचा पाठलाग करता काय तुम्ही? काय..."

आणि अचानक बोलायचं थांबत तंबाखू मळायच्या तयारीत असणाऱ्या कालियाकडे पाहून खेकसला "ये काल्या, हात धु की भाडखाऊ."

कालियाने लगेच जीभ चावली आणि तंबाखूची पुडी झाकून इकडे-तिकडे पाणी शोधायला सुरुवात केली.

संग्राम परत जयकिशन-विनय कडे पाहून आपलं उरलेलं वाक्य पूर्ण करायला लागला "संग्राम वाघमाऱ्याचा पाठलाग करता तुम्ही? काय...", पण वाक्य पूर्ण करायच्या आतच संग्राम परत थांबला आणि पुढे येणाऱ्या पिराजी कडे रागाने नजर रोखून पाहू लागला. डुलत पाच पावलं पुढे येत पिराजीने पंडितच्या बॅगमधून निळी पाण्याची बाटली काढून कालिया कडे "हे घे" असं म्हणून फेकली. मग कालियाने पकडलेला कॅच पाहून "माझ्याकरता पन मळ रे" असं म्हणाला. पण आता संग्राम आपल्याकडे पाहतोय हे समजलं की लगेच पिराजीने उलट्या पावलाने मागे जायला सुरुवात केली.

संग्रामने उपरोधाने मान हलवत नाटकी प्रेमाने सगळ्यांना विचारलं "झालं का तुमचं? आणखी कुणाला पाह्यजे का तंबाखू?" 

नाग्या काशीद हात वर करून हो म्हणणार पण लगेच संग्रामच्या बोलण्याचा खरा अर्थ समजून तसाच शांत उभा राहिला.  


संग्रामने सगळीकडे रागाने एक नजर फिरवली. मग परत पंडित, जयकिशन आणि विनयकडे पाहून भयंकर चिडून म्हणाला "भाड्यांनो, कशाला आई घालायला माझ्या मागावर होता रे? बोला पटकन नाह्य तर एकेकाचं तंगडंच तोडतो. मंग ढुंगणावर सरकत पाठलाग करा माझा." 

कुणीच काहीच बोललं नाही. पंडितने तोंड उघडलं आणि काहीच न म्हणता परत मिटलं.

"उघडा तोंड भाड्यांनो. का मराठी समजत नाह्य कुणालाच?" संग्राम परत ओरडला.

"मार पडला की बरोबर पोपटासारखं बोलतील" कालिया स्वतःच्या हातातल्या चुनामिश्रित तंबाखूकडे पाहून म्हणाला. पटकन तंबाखू मळण्याच्या कलेमध्ये कालिया एकदम पारंगत होता. आतापर्यंत कालियाने हात धुवून, तो स्वतःच्या पॅन्टला पुसून, मग चुना वगैरे मिसळून तंबाखू मळणे जवळपास संपवत आणले होते. उजव्या हाताचं अंगठ्याजवळचं बोट डाव्या हातातल्या तंबाखुवर शेवटच्या वेळी रगडून त्याने दोनदा उजव्या हाताने डाव्या हातावर थप-थप मारलं आणि पिराजीला डोळ्यानेच इशारा केला. पिराजी लगेच लगबगीने पुढे आला. कालियाने तंबाखू वाटली आणि दोघांनी दोन बोटांच्या चिमटीत धरून ती आपापल्या दाढेत ठेवली.


आत्तापर्यंत तोंड सुजलेला पंडित थोडा सावरला होता. पिराजी तंबाखू घ्यायला पुढे निघून गेला हे पाहून त्याने संधी ओळखली. आता तर कालियापण रस्त्यात लपलेला नव्हता. पंडित परत आधीपेक्षा जास्त वेगात गर्रकन मागे वळला आणि सुसाट धावत सुटला. मागे उभा असणाऱ्या नाग्याने आणि आणखी एकाने त्याला पकडायला परत विनाकारण उड्या मारल्या, पण कोणाच्याच हाती न लागता पंडित सुसाट धावत अंधारात गायब झाला. नाग्या काशीद उठून त्याच्या मागे पळणार तोच संग्रामने त्याला हाक मारून थांबवलं. "थांब नाग्या. पळूदे त्याला", असं म्हणत पुढे भयंकर रागात संग्राम सगळ्यांना ओरडला, "पण या दोघांना आजिबात सोडू नका". आणि लगेच कालिया कडे वळून म्हणाला "काल्या, त्या गोरट्या ढापण्या पोराला वढ बाजूला."


संग्रामने अशा कित्येक मारामाऱ्या केल्या होत्या. त्याला पूर्ण अनुभव होता की कोणाला कसं आणि किती मारायचं. म्हणूनच त्याने पंडितला जाऊ दिलं. एक कानाखाली मारली तेव्हाच मनात ठरवलं की याच्यासाठी खूप झालं. दुसरा फटका सहन नाही होणार. आणि आता फक्त कालियाला एकट्यालाच सांगितलं की विनयला बाजूला ओढ. कारण मग आधीच बाकी सगळयांना, वाड्याच्या पटांगणात आल्या-आल्या अंधारातच सांगितल्याप्रमाणे, जयकिशनला पकडून वाट्टेल तेवढा मार देता येईल. 


कालिया हुशारीने हळूच विनयजवळ गेला आणि झटकन विनयला जयकिशनपासून दूर ओढलं. जयकिशनला मराठी समजत नसल्यामुळे त्याला अंदाज नव्हता की विनयला ओढणार आहेत म्हणून. तो विनयला जवळ ओढायचा प्रयत्न करणार तोच चार पोरांनी पुढे येऊन जयकिशनचे दोन्ही हात धरून ठेवले. प्रत्येक हाताला दोन जण. जयकिशन जीव खाऊन ओरडला "उसे नहीं" आणि ताकद लावून चारही जणांना ओढत तीन पावलं पुढे घेऊन गेला. लगेच आणखी दोन पोरांनी मागून येऊन जयकिशनला मिठी मारली आणि त्याला चार पावलं मागे खेचलं. जयकिशन परत जोरात कण्हून ओरडला "विनय को नहीं" आणि जोर लावत सहाच्या सहा जणांना ओढत तीन-चार पावलं पुढे घेऊन गेला. एवढी ताकद पाहून बाकीचे घाबरले. कालियाला काहीच न करता घाम फुटला आणि घाबरून तो विनय पासून चार पावलं दूर संग्रामच्या बाजूला सरकला. संग्रामला वाटलं होतं की चार पोरं आरामात जयकिशनला थांबवतील. पण त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. जयकिशन पायावर जोर देऊन लोकांना ओढत होता हे पाहून शेवटच्या दोन पोरांनी, पिराजी आणि नाग्याने, लगेच मागून जयकिशनचे दोन्ही पाय जीव खाऊन पकडले. तोपर्यंत घाबरलेल्या संग्रामने इकडे तिकडे पाहिलं आणि पायाजवळच पडलेली एक मोठ्ठी वीट हातात घेतली. पण आत्ता जयकिशन पूर्ण जेरेबंद झाला होता. जयकिशनने खूप प्रयत्न केला मात्र तो जागचा हलू शकला नाही. हे पाहून संग्रामच्या जीवात जीव आला. आजपर्यंत असा प्रकार संग्रामने कधीच पहिला नव्हता. जरी संग्राम मनातून घाबरलेला असला तरी चेहऱ्यावर मात्र त्याने आजिबात कसलेच भाव येऊ दिले नाहीत. उलट जयकिशन थांबलेला पाहून संग्राम मनातून खुश झाला. इकडे कालियाने कपाळावर जमलेला घाम डाव्या हाताने पुसून काढला.


जयकिशनने आता हार मानली आणि प्रयत्न करणं सोडून दिलं. विनय जिथे कालियाने त्याला उभं केलं तिथेच घाबरून स्थिर उभा होता. मग संग्राम स्वतःजवळ आलेल्या कालिया कडे पाहून ओरडला "काल्या, दे दोन तोंडावर ठेवून त्या पोराच्या". 

आणि मग तीन पावलं पुढे विनय जवळ जाऊन कालियाने त्याला मारण्यासाठी उजव्या हाताची मूठ आवळली. 

हे पाहून जयकिशन परत गुरकला "विनय को कोई हाथ नहीं लगायेगा!"

कालियाने घाबरून जयकिशन कडे पाहिलं आणि तो तसाच थांबला.

"ए काल्या, काय घाबरतो? बिनधास्त दे ठेवून", संग्रामने हातातली वीट जयकिशन कडे उगारून धरत घाबरलेल्या कालिया कडे पाहून सांगितलं. 

वीट पाहून कालियाला जरा दिलासा मिळाला आणि त्याने मूठ बांधलेला उजवा हात उचलला. जयकिशन परत "नहीं" असा आणखी जोरात गुरकला. मग कालियाने घाबरून जयकिशनकडे पाहत, गुद्दी जोरात मारण्याऐवजी हळूच मूठ विनयच्या तोंडाजवळ नेली. पण कालिया घाबरून जरा लांबच उभा राहिला होता. त्याचा हात विनयच्या नाकापासून बोटभर अंतरावर जाऊन थांबला. अजून कसा स्पर्श झाला नाही म्हणुन कालियाने पटकन विनयकडे नजर टाकून पाहिलं तर अजून बोटभर अंतर बाकी आहे हे दिसलं. मग परत जयकिशनकडे पाहून गालात हसत मूठ उलगडून कालियाने हळूच अंगठ्या जवळचं बोट बाहेर काढलं. ते पाहून जयकिशन आणखीच ओरडला "विनय को कोई उंगली भी नहीं लगायेगा!" 

कालियाच्या चेहऱ्यावरची भीती पाहून संग्राम चिडून दात खात ओरडला "लाव रे काल्या भाड्या, बोट तरी लाव."


सगळे श्वास रोखून कालिया कडे पाहत होते. आणि कालियाने मग खूपच हळुवारपणे उजव्या हाताचं अंगठ्या जवळचं बोट विनयच्या नाकाच्या शेंड्यावर टेकवलं.

४. चौकी


पंडित अंधारातून सुसाट धावला. एकदाही मागे वळून न पाहता आणि न थांबता थेट दोन-अडीच किलोमीटर लांब असणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळच्या पोलीस चौकी मध्ये घुसला. दरवाजातून सरळ आत शिरत, समोरंच असणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरच्या टेबलवर दोन्ही हात टेकून जोरजोरात धापा टाकायला लागला. पळून पळून पंडितच्या तोंडाला फेस आला होता. त्याने तो शर्टाच्या बाहीने पुसून टाकला.


टेबलवर दोन्ही पाय ठेवून, खुर्चीमध्ये रेलून, तोंडावर रुमाल आणि कानात महागडे हेडफोन लावून, दोन महिन्यापूर्वीच इथे रुजू झालेले इन्स्पेक्टर जितेंद्र पाटील आरामात झोपले होते. कानात गाणे एवढ्या जोरात चालले होते की ना पंडितच्या पळण्याचा ना धापांचा आवाज त्यांना आला. हे पाहून मग पंडितने धापा टाकतंच इन्स्पेक्टर पाटलांचा पाय जोरात हलवला. "कोण हे रे भो..." असं म्हणत पाटलांनी तोंडावरचा रुमाल काढून समोर पाहिलं. पंडितची परिस्थिती पाहून आपलं वाक्य अर्धवट सोडत, पाटील पटकन हेडफोन काढून उभे राहिले आणि "अरे कुणी आहे का तिकडं? पाणी आणता का जरा?" अशी मोठ्या आवाजात हुकूम वजा विनंती त्यांनी डाव्या बाजूच्या मागच्या खोलीकडे पाहून केली.  


त्या मागच्या खोलीत हवालदारांची ओली पार्टी चालू होती. इन्स्पेक्टर पाटलांचा आवाज ऐकून त्यातला एकच दारू न पिणारा माळकरी हवालदार लगेच उठला आणि पाटलांसमोर जाऊन सावधान अवस्थेत उभा राहिला. 

"पाणी आणलं का कावळे?" पाटलांनी हवालदार मारुती कावळेनां विचारलं.

"पाणीच नाही साहेब." कावळेंनी लगेच पाटलांचा प्रश्न संपायच्या आतच उत्तर दिलं.

"आरे मग कोल्डड्रिंक तरी आहे का?" पाटलांनी त्रासिक आवाजात पंडित कडे पाहून कावळेंना विचारलं. 

"नाही साहेब." कावळेंनी परत लगेच उत्तर दिलं. 

"मग दारू कशात टाकून पितायत बाकीचे?" चिडून पाटील बोलले.

यावेळी मात्र कावळेंनी उत्तर द्यायच्या आत, मागच्या दरवाजातून हातामध्ये बिअरचा ग्लास घेऊन येणारे हवालदार विलासराव म्हस्के म्हणाले, "कोल्ड ड्रिंक मधेच पीत होतो आम्ही. पन हवालदार कावळ्यांनी सगळी कोल्डड्रिंक संपवली आणि सगळा चकणापन."

लगेच कावळे पाटलांना उद्देशून म्हणाले "सॉरी साहेब, मी येऊ का घेऊन कोल्डरिंग लगेच?"

"नको राहूद्या. रात्रीच्या बारा वाजता कुठून आणणार." असे म्हणून मग हवालदार म्हस्क्यांकडे चिडून पाहत पाटील पुढे म्हणाले "म्हस्के, त्या बिअरच्या ग्लासमध्ये काय आहे मग? पाजा ती कोल्डड्रिंक या पोराला लवकर. चौकीतच मरायचं नाहीतर."

"स्टाउट बिअर आहे साहेब ती. डार्क आहे म्हणून तशी दिसते." म्हस्के हवालदार पाटलांचा गैरसमज दूर करत म्हणाले. 

इन्स्पेक्टर पाटील कपाळावर आठ्या आणत आणखीच त्रासिक चेहऱ्याने म्हणाले "आहो म्हस्के, द्या ती बिअर इकडे." आणि मग हवालदार कावळेंना उद्देशून पंडितकडे हाताने इशारा करत पुढे म्हणाले "त्याला खुर्चीवर बसवून बिअर पाजा आधी."


कावळे हवालदारांनी लगेच पुढे जाऊन पटकन भिंतीजवळची एक खुर्ची ओढली आणि पंडितच्या खांद्यावरची बॅग बाजूला ठेवून त्याला खुर्चीत बसवलं. तोपर्यंत म्हस्के हवालदार बिअरकडे नाराज होऊन पाहत कावळ्यांकडे गेले. पाटील साहेबांनी आळस देत डावी-उजवीकडे वळत स्वतःच्या कमरेची हाडं मोडली. बिअरचा ग्लास म्हस्क्यांकडून घेऊन कावळेंनी आधी तो जमिनीवर ठेवून दिला आणि पंडितला खुर्चीत तिरपा करत त्याच्या पँटच्या मागच्या खिशातील पाकीट काढलं. पाटील आणि म्हस्के यांनी हा प्रकार पाहून एकमेकांकडे 'हे काय चाललंय?' अशा अविर्भावात पाहिलं. 

"बिअर पाजा कावळे. पाकीट का काढलं त्याचं?" पाटील चिडून म्हणाले.

तोपर्यंत पाकीट उघडून त्यातलं आय-कार्ड पाहून पाकीट परत ठेवता ठेवता कावळे म्हणाले "बिअर पाजणार म्हणुन वय पाहत होतो साहेब. पंचवीस आहे. पाजतो." 

पाटलांनी डोक्यावर हात मारून घेतला. कावळेंनी आत्तापर्यंत बिअरचा ग्लास पंडितच्या तोंडाला लावला होता. पंडितने सुद्धा दोन घोटात गटागटा बिअर संपवली आणि विचारलं "आणखी मिळेल का?"

पाटलांनी म्हस्क्यांकडे पाहिलं. म्हस्क्यांचा चेहरा पडला होता. मग म्हस्के नाराज सुरात म्हणाले "एकच राहिली साहेब. खूप दिवसांनी भेटली होती."

पाटलांना म्हस्क्यांचं दारूवरचं प्रेम माहित होतं, पण आता नाईलाज होता. मग त्यांनी प्रेमाने म्हस्क्यांना समजावलं "आणा ग्लास मध्ये ओतून म्हस्के. उद्या मी तुम्हाला नवीन स्टॉक देईल फॉरेनचा."

हे ऐकून म्हस्के खुश झाले आणि मागच्या खोलीत जाऊन त्यांनी दुसरा ग्लास भरून आणला. पंडितने तो बिअरचा ग्लाससुद्धा दोन घोटात संपवला आणि शांत होऊन खुर्चीत बसून राहिला.


पाच मिनिटांनी पंडित बोलायला लागला. त्याने पाटील आणि तिथे जमलेल्या चार-पाच हवालदारांना सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून पाटलांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि पंडितला म्हणाले "भडव्यांनो, एमएससी करता ना तुम्ही? ते पण फिजिक्स मध्ये. अक्कल काय शेण खायला गेली होती का? संग्राम वाघमाऱ्याचा पाठलाग करायला निघाले होते. आर डी एक्स ऐकलं म्हणे."

मग लगेच कानावर मोबाईल ठेवून काही तरी ऐकणाऱ्या कावळेंना उद्देशून पाटील पुढे म्हणाले "कावळे? कोणाशी बोलता फोन वर? संग्राम वाघमारेला फोन लावा."

कावळे तसाच फोन कानावर ठेवून म्हणाले "त्यालाच लावला होता फोन. उचलला नाही. परत लावलाय. रिंग वाजतीय."

पाटील कावळेंच्या हुशारी अन् चपळाई वर खुश होऊन म्हणाले "गुड! उचलला की द्या इकडे", आणि पुढं काय करायचा याचा विचार करत इकडे तिकडे चालायला लागले. 

मग काही वेळात कावळे म्हणाले "नाही उचलला साहेब. परत लावू का?"

पाटील मानेनेच हो म्हणाले आणि लगेच म्हस्क्यांना सांगितलं "म्हस्के गाडी काढा. वाघमाऱ्यांच्या वाड्यावर जायचंय." 

म्हस्के हवालदारांनी लगेच भींतीवर अडकवलेली पोलिसांच्या जीपची चावी काढली. पण मग काहीतरी विचार करून पाटलांनी म्हस्क्यांना विचारलं "आज किती पिलात म्हस्के?"

"जास्त नाही साहेब. फक्त दोन बिअर" म्हस्क्यांनी प्रश्नाचा अर्थ समजून उत्तर दिलं.

"आणि संध्याकाळी?" विश्वास न बसून पाटलांनी पुढे विचारलं.

"आं.. रेड लेबलची एक क्वार्टर फक्त" म्हस्क्यांनी अडखळत उत्तर दिलं.

"मग कावळ्यांना द्या ती चावी." पाटलांनी आता आदेश सोडला. 

हे ऐकून म्हस्के हवालदारांचं तोंड पडलं. ते कावळेंकडे चावी घेऊन जाणार तोच कावळेंनी स्वतः पुढे जाऊन म्हस्क्यांच्या हातातली चावी जवळपास हिसकावून घेतली आणि दरवाजाबाहेर लगबगीने निघून गेले. आणि काही क्षणांतच बाहेर जीप चालू झाल्याचा आवाज आला.


पाटलांनी भिंतीवर अडकवलेली इन्स्पेक्टरची टोपी डोक्यात घातली. बाकीच्या हवालदारांना तिथेच थांबायला सांगून म्हस्क्यांना पंडितला घेऊन चलण्याचा इशारा केला. म्हस्क्यांनी स्वतःच्या टकलावरून आणि तोंडावरून रुमाल फिरवला आणि पंडितला घेऊन चौकीबाहेर पडले. जीप चालू करून कावळे अजूनही फोन कानाला लावून बसले होते आणि हे लोक कधी येतील याचीच वाट पाहत होते.  


पाटील पुढे डाव्या बाजूच्या सीटवर बसले आणि म्हस्के पंडितला घेऊन मागे चढले. बसल्यावर आधी परत एकदा पाटलांनी विचारलं "वाघमारेने फोन उचलला का?". 

कावळेंकडून 'नाही' ऐकून त्यांना फोन ठेवून द्यायला सांगितलं आणि मागे वळून म्हस्क्यांना औंध हॉस्पिटलला ऍम्ब्युलन्स तयार ठेवण्यासाठी फोन करा असं सांगितलं. 

पण मग कावळे म्हणाले "मी केला फोन साहेब. तयार असेल ऍम्ब्युलन्स. फोनवर पत्ता सांगितला की लगेच येतील." 

हे ऐकून पाटील खुश होऊन मनापासून म्हणाले "खूप हुशार आणि फास्ट आहात कावळे तुम्ही. चुकून हवालदार झालात फक्त."

कावळेंनी लगेच “थँक यू” म्हणून "निघायचं का?" असं विचारलं आणि पाटलांनी मानेनेच होकार दिला. 

कावळेंनी लगेच ऍक्सलरेटर वर जोरात पाय दिला. जीपचे मागचे दोन्ही चाकं मोठ्याने आवाज करत खरकले आणि जीप जोरात उसळी मारून पुढे निघाली. पाटलांचं डोकं वेगात मागे सीटवर आदळलं. पंडित आणि म्हस्के सुद्धा मागे जोरात कलंडले. म्हस्क्यांनी वरचा हॅन्डल पकडून धरलेला होता. त्यांनी चपळाईने लगेच दुसऱ्या हाताने पंडितला ओढून धरले. नाहीतर पंडित जीपच्या बाहेरच पडला असता. चार सेकंदात कावळेंनी चार गिअर टाकले आणि बाकी जण धक्क्यातून सावरायचा आतच डावीकडे गाडी वेगात वळवुन पक्क्या रस्त्यावर काढली. कावळे सोडून सर्वजण उजवीकडे जोरात सरकले. आता सरावलेले तघेही घाबरून हाताला येईल त्या गोष्टी पकडून बसले होते. पाटील काही बोलणार तोच ताशी सत्तरच्या वेगात परत एकदा कावळेंनी गाडी डावीकडे वळवली आणि PWD रस्त्यावर घेतली. 


समोर आलेला सरळ रस्ता पाहून पाटलांच्या जीवात जीव आला. धडधडत्या छातीनेच मोठ्याने ओरडत पाटील म्हणाले "हळु चालवा जरा कावळे!" 

पुढच्याच क्षणाला कावळेंनी जीव खाऊन ब्रेक दाबला. चाकं डांबरी रस्त्यावर घासून मोठा आवाज झाला. पाटलांनी स्वतःचं डोकं समोर आपटून फुटण्यापासून थोडक्यात वाचवलं. मागे पंडितचं सुजलेलं तोंड जोरात पुढच्या सीटच्या मागच्या बाजूला आदळलं. तो जोरात कळवळला. म्हस्क्यांनी स्वतःला परत एकदा हॅन्डल पकडून वाचवलं. पटापट गिअर बदलत आता कावळेंनी जीपचा वेग खूपच कमी केला. चाकांचाही आवाज न होऊ देता जीप चालू लागली. अचानक सगळीकडे शांतता झाली. काही क्षणांत जीप एवढ्या हळू चालायला लागली की वीस-पंचवीस फुटांवर एक मरतुकडं कुत्रं रस्त्यावर झोपलं होतं. त्याने मान उचलून जीप कडे पाहिलं आणि परत मान खाली टाकून झोपी गेलं. जस काय 'ही जीप आज काही इथपर्यंत पोहोचत नाही' असा विचार करून.


मग पाटलांनी हवालदार कावळेंना जीप थांबवायला सांगितली. कावळेंनी लगेच गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन थांबवली आणि "काय झालं साहेब?" असं विचारलं. 

"एक काम करा कावळे, म्हस्क्यांना चावी द्या आणि तुम्ही मागे जाऊन बसा त्या पोराबरोबर", पाटील म्हणाले. हे ऐकून हवालदार कावळेंचा चेहरा पडला आणि हातात जीपची चावी घेत मान खाली घालून काहीतरी पुटपुटत लगेच उतरून मागे निघाले. पाटलांचं बोलणं ऐकून म्हस्के आधीच उतरून ड्राइव्हरच्या बाजूने पुढे निघाले होते. वाटेत भेटलेल्या कावळेंकडे त्यांनी खुनशी नजरेनं पाहिलं आणि "पिलोय मी अन् चढलीय तुला" असं म्हणत जीपची चावी हिसकावून घेतली.


विलासराव म्हस्क्यांनी एवढी पिवूनसुद्धा आरामात जीप चालू केली. रस्त्यावरच्या झोपलेल्या कुत्र्याला हॉर्न देऊन उठवून लावत साधारण वेगात पोलिसांची जीप वाघवस्तीच्या दिशेने निघाली.


५. भिंत


जयकिशन भयंकर रागाने कालियाकडे पाहत होता. रागाने त्याचा चेहरा पूर्ण लालबुंद झाला होता. कालियाच्या उजव्या हाताचं बोट जसं विनयच्या नाकाजवळ जात होतं तसं जयकिशनच्या नसांमधलं रक्त गरम होत होतं. ज्या क्षणी ते बोट विनयच्या गोऱ्या नाकाच्या शेंड्यावर टेकलं त्याच क्षणी जयकिशनच्या रागाचा भयानक उद्रेक झाला. 


सिंहासारखी डरकाळी फोडत जयकिशनने जीव खाऊन दोन्ही हातांवर जोर लावला आणि उजव्या हाताला लटकलेल्या दोघांना डावीकडे फेकून दिलं. मोकळ्या झालेल्या उजव्या हाताची मूठ बनवून जोरात डाव्या हाताला लटकलेल्या दोघांच्या तोंडावर एक-एक प्रहार केला. जयकिशनच्या त्या बॉक्सर पंचने दोघेही जमिनीवर पडून गारद झाले. हा प्रकार पाहून त्याला मिठी मारलेले दोघे मागे पळत जाऊन आपापल्या काठ्या शोधायला लागले. 


नाग्या आणि पिराजी अजूनही जयकिशनचा उजवा-डावा पाय पकडून बसले होते. जयकिशनने लगेच खाली वाकून डाव्या हाताने पिराजीची मान धरली आणि अतिशय वेगात त्याला उचलून स्वतःच्या पुढे ठेवलं. त्याचे पाय जमिनीवर टेकत नाहीत तोच डाव्या पायाने कमरेत एक जबरदस्त लाथ घातली. त्या लाथेचा प्रहार एवढा जोरदार होता की पिराजी भयंकर वेगात संग्रामच्या अंगावर गेला. एका क्षणासाठी पिराजीला वाटलं की आता संग्राम त्याला तोंडावर पडण्यापासून वाचवेल पण संग्राम पिराजीचा वेग पाहून गर्रकन वळत बाजूला झाला. पिराजी सरळ संग्रामच्या मागे असणारा वाड्याचा लाकडी दरवाजा तोडून आत जाऊन पडला.


दरवाजा तुटून झालेल्या आवाजाने सुद्धा दूध पिणाऱ्या मांजरीला काहीच फरक पडला नाही. खाली मांडणीजवळ विव्हळत पडलेल्या पिराजी कडे तिने एक डोळा उघडून तुच्छ कटाक्ष टाकला आणि परत शेपूट हलवत दूध पिण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. 


पिराजीला बसलेली लाथ पाहून नाग्याला त्याची चूक समजली. लगेच जयकिशनचा पाय सोडून तो चपळाईने मागे पळाला आणि स्वतःची काठी शोधून हातात घेतली. आत्तापर्यंत डावीकडून एक जण हातात काठी घेऊन जयकिशनकडे पळत येत होता. जयकिशनने त्याच्या काठीचा मार डाव्या हाताने झेलत काठीच पकडून धरली. मग काठीला एक जोराचा हिसका देत त्याला उजवीकडे फेकून काठीवर कब्जा केला. आता हातात आलेल्या जाडजूड काठीमुळे जयकिशनचा आत्मविश्वास दुपटीने वाढला होता.


आतापर्यंत शेकडो हिंदी चित्रपटातील मारामाऱ्या पाहून सुद्धा नकळत ही सगळी मवाली पोरं नेमकी तीच एक चूक करत होते. एकावेळेस एकच जण काठी घेऊन जयकिशनवर चाल करून येत होता. जयकिशनपण याचा पुरेपूर फायदा घेत होता. कधी काठीने काठी अडवून मग लगेच जबरदस्त लाथेने लोकांना पटांगणाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पाठवत होता तर कधी काठीचा वार चपळाईने चुकवत स्वतःच्या हातातल्या काठीने त्यांच्या पाठीवर-पोटावर जोरात वार करत होता. आणि विशेष म्हणजे हे सगळं करताना तो जोरजोरात कण्हत आणि गुरकत होता. एवढं की संग्राम, कालिया आणि विनयसुद्धा त्याच्या मारामारीपेक्षा आवाजानेच घाबरून श्वास रोखून उभे राहिले होते. 


संग्राम मात्र मनातून घाबरला असला तरी अत्यंत सावध उभा होता. उजव्या हातातली वीट उगारून. तो कोणत्याही क्षणी जयकिशनला वीट फेकून मारू शकत होता. विटेचा आकार आणि वजन सुद्धा एवढं होतं की जर डोक्यावर वार झाला तर जयकिशनचं वाचणं खूप अवघड होतं, पण जर हा एकमेव वार चुकला तर संग्रामच्या हातातलं शेवटचं अस्त्र तो गमावून बसणार होता. याची जाणीव ठेवून संग्राम डावा पाय पुढे टाकून उजवा पाय मागे लांब घेत, वीट पकडलेला उजवा हात उगारून तिरका उभा होता. अगदी बेसबॉलच्या निष्णात पिचर सारखा. फक्त योग्य वेळेची वाट पाहत. 


पहिल्या बॉक्सर-पंचने गारद झालेले दोन जण तर कधीच मागे सरपटत जाऊन भिंतीला टेकून बसले होते. पिराजी अजूनही तुटलेल्या दरवाजावरच कमरेला हात लावून पडून राहिला होता. कालिया आणि संग्राम सोडून उरलेल्या पाच जणांपैकी चार जण चार बाजूला कण्हत पडलेले होते आणि उठायचा प्रयत्न करत होते. फक्त नाग्या काशीद एकटाच आत्तापर्यंत जयकिशनपासून वाचला होता. एखाद्या डोंबाऱ्यासारख्या उलट्या-पालट्या उड्या मारत त्याने दोनदा जयकिशनचा वार चुकवला होता. आता तो हातात काठी घेऊन जयकिशनवर चाल करून आला. कराटे वगैरे शिकलेल्या नाग्याने हाताने काठी आणि पायाने एक कराटेची लाथ एकाच वेळी फिरवली. जयकिशनने बाजूला होत त्याची लाथ चुकवली पण काठीचा वार त्याच्या पाठीवर जोरात पडला. जयकिशनला पडलेला हा पहिला फटका होता. पाठीची चांगलीच आग झाली पण चिडलेल्या जयकिशनने ती दात-ओठ खाऊन सहन केली. मागचा वार यशस्वी झाला हे पाहून नाग्याने परत तसाच लाथेचा अन् काठीचा वार जयकिशनवर परत केला. यावेळी जयकिशनच्या छातीवर काठीचा वार झाला. जयकिशन आणखीच चिडला आणि त्याने मनात ठरवलं की याला सोडायचं नाही. आता नाग्याचा आत्मविश्वास गगनाला टेकला होता. आत्तापर्यंत एकही जण जयकिशनला स्पर्शसुद्धा करू शकला नव्हता. जे बाकीच्या सात जणांना एकदाही जमलं नाही ते नाग्याने दोनदा करून दाखवलं होतं. खुश होऊन नाग्याने तिसऱ्यांदा जयकिशनवर तीच चाल केली. पण यावेळी जयकिशनने मागच्या दोन चुकांतून शिकून आधी काठीचा वार स्वतःच्या काठीने अडवला आणि नाग्याची लाथ अंगावर सहन केली. पण जयकिशनला या लाथेने काहीच फरक पडला नाही. तो थोडाही जागचा हलला नाही. हे पाहून लगेच जयकिशन, हातातली काठी पायाजवळ टाकून दोन्ही हाताने इशारा करत, नाग्याला म्हणाला "आ, मार मुझे". नाग्याने सुद्धा वेड्यासारखं अति-आत्मविश्वासाने काठी टाकून दिली. आणि तुफान वेगाने हवेत उडी मारून जयकिशनला लाथ मारायचा प्रयत्न केला. जयकिशनलापण हेच हवं होतं. त्याने चपळाईने नाग्याचा पाय हवेतच पकडला आणि एक जोराचा हिसका दिला. त्या हिसक्याने नाग्या खाली पाठीवर धाडकन उताणा पडला. नाग्याला काय झालं हे समजायच्या आतच जयकिशन त्याचा जवळ जाऊन खाली वाकला. एका हाताने त्याची कॉलर आणि दुसऱ्या हाताने त्याच्या पॅन्टचा बेल्ट पकडला आणि जोर लावून त्याने नाग्याला उचलला ते थेट डोक्यावरच.


दोन्ही हाताने डोक्यावर आडवा धरलेल्या, अर्धवट शुद्धीत असणाऱ्या नाग्याला, आरामात पेलत जयकिशनने एकदा गोल फिरत सगळीकडे भयानक रागीट नजर टाकली. जे चार जण उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांनीसुद्धा हे दृश्य पाहून काठ्या टाकून मटकन खाली बसून घेतलं. मग वीट उगारलेल्या संग्राम कडे खुनशी नजरेने पाहत जयकिशनने नाग्याला जोरात खाली आपटलं. मोठ्ठा धप्प असा आवाज होऊन नाग्या गुरासारखा किंचाळला. पण त्याच्या किंचाळण्यापेक्षाही मोठ्या आवाजात जयकिशन ओरडला "और हैं किसी में हिम्मत?" आणि जोरात स्वतःच्या हाताने स्वतःची छाती बडवायला सुरवात केली. वेड्याचा झटका आल्यासारखा. जसा एखादा गोरिला भांडणासाठी तयार होताना छाती बडवतो अगदी तसाच. कदाचित जरा जास्तच जोरात. धाडधाड आवाज करत.


हा प्रकार पाहून सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. संग्रामचा थरकाप झाला. कालिया आणि विनय अजूनही स्थिर उभे होते. श्वास रोखून. अजूनही कालियाचं बोट विनयच्या नाकावर टेकलेल्या अवस्थेत. आणखी पाच मिनिटं जर जयकिशन थांबला नसता तर कालिया आणि विनय यांची नावं जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून धरण्यासाठी गिनीस बुक मध्ये जमा झाली असती किंवा मृतांच्या यादीत तरी! पण आज विनय आणि कालियाचं नशीब चांगलं होतं. जोरजोरात छाती बडवणाऱ्या जयकिशनचा स्वतःचाच एक फटका डाव्या बाजूला जरा जास्तच जोरात बसला आणि काही क्षणांसाठी त्याचा श्वास थांबला. जयकिशन अचानक शांत झाला. काय झालं हे चेहऱ्यावर दिसू न देता. 


अचानक शांत झालेल्या जयकिशनला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. एवढा वेळ रोखून धरलेला श्वास कालिया आणि विनयने शेवटी सोडला. पण मात्र पुढच्याच घेतलेल्या जोरदार श्वासाबरोबर कालियाच्या बोटावरची तंबाखू विनयच्या नाकातून फुफ्फुसांमध्ये पोहचली आणि प्रतिक्षिप्त क्रियेने विनयची हनुवटी वर गेली. पुढच्याच क्षणाला विनय प्रचंड आवाज करत शिंकला आणि त्याचा जाड भिंगाचा चष्मा कालियाच्या पुढे जाऊन पडला. 


विनयच्या त्या शिंकण्याचा आवाज एवढा प्रचंड मोठा होता की पटांगणात सर्वजण दचकले, खाली मेल्यासारखा पडलेला नाग्या काशीद सुद्धा बोटभर टणकन उडाला, मागे गोठ्यातल्या सगळ्या गाई परत खडबडून जाग्या झाल्या आणि गळ्यात बांधलेल्या दोरींना हिसके देऊन आवाज कुठून आला हे पाहायला लागल्या, मुळेकाठच्या झाडावरचे पक्षी झोपेतून उठून उडाले, अक्ख्या वाघवस्तीवरची कुत्री तीन-चार सेकंद विनाकारण केकाटली आणि सैरावैरा इकडे तिकडे धावली. विशेष म्हणजे आत्तापर्यंत कशाचाच फरक न पडलेली मांडणीवरची काळी मांजर भयंकर दचकली जसं काय कुणी तिच्या अंगावर गार पाणी फेकलं किंवा शेपटीवर पाय दिला. दचकून मांजरीने घाणेरडा गुरकल्याचा आवाज काढत उंच उडी मारली ती थेट दुधातच. आणि जवळपास अर्ध संपलेलं दुधाचं पातेलं मांडणीवरून मांजरीसकट खाली कलंडलं. खाली येताना मांडणीवरची निम्मी भांडी पिराजीच्या अंगावर पाडत, ते पातेलं मांजरीला घेऊन खाली पडलं. पिराजी विव्हळला. दुधाने अंघोळ केलेल्या मांजरीने मात्र पातेल्याबाहेर उडी मारत तुटलेल्या दरवाजातून जोरात धूम ठोकली.  


दुधाने भिजलेली मांजर सैरावैरा धावत दरवाजातून बाहेर आली आणि पटांगणातल्या स्वच्छ उजेडाला आणि जमलेल्या लोकांना पाहून भयानक गांगरली. उजवी-डावीकडे वेड्यासारखं वळत ती संग्रामच्या पायाला धडकून सरळ पुढच्या भिंतीजवळ गेली आणि त्या आठ-दहा फुटाच्या भिंतीवर चढायचा प्रयत्न करू लागली. एरव्ही सुद्धा या रानटी मांजरीला ती भिंत पार करणं जड गेलं असतं आणि त्यात आज तर ती दुधाने पूर्ण ओली झालेली होती. चार फूट वर चढून, मग एकदा खाली घसरून, मांजर परत जीव तोडून भिंतीवर चढू लागली.


भांड्यांचा आलेला आवाज आणि नंतर दुधाने न्हालेली मांजर पाहून संग्रामला जे समजायचं ते समजलं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कित्येक दिवसानंतर आज अशी सुवर्णसंधी आली होती. त्यात हातात आयतीच वीट घेऊन उभा राहिलेल्या संग्रामला संधीचा पुरेपूर फायदा घ्यायची हीच एकमेव वेळ होती. संग्रामनेही बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष त्या भिंतीवर चढणाऱ्या मांजरीवर केंद्रित केलं. पायांची नखं भिंतीत रोवत आत्तापर्यंत मांजर जवळपास पूर्ण भिंत चढत आली होती. म्हणजे पुढच्याच क्षणी ती समोरचे दोन पाय भिंतीवर टाकून भिंत पार करू शकत होती. संग्रामने नेमकं त्याच क्षणाला उजवा हात मागे पूर्णपणे ताणून, मांजरीच्या डोक्यावर नेम धरून, जोरात कण्हत जीव खाऊन विजेच्या वेगाने वीट फेकली.


मग आधी जोरात ठप्प असा आवाज झाला …लगेच मांजरीचा किंचाळलेला घाणेरडा आवाज ...परत दोनदा एकामागोमाग ठप्प असा आवाज ...आणि शेवटी दोनदा जमिनीवर अवजड पोते पडल्यासारखा एकापाठोपाठ धप्प असा आवाज झाला. आणि मग अचानक सगळीकडे वादळापूर्वीची भयाण शांतता पसरली. 


मांजर दरवाजातून बाहेर पळाली तोपर्यंत वाघवस्तीतल्या कुत्र्यांचं केकाटणं थांबलं होतं. सगळ्यांच्या नजरा त्या सैरावैरा धावणाऱ्या मांजरीवरच होत्या. फक्त विनय सोडून. त्याच्या चष्म्याविना झालेल्या अंधुक दृष्टीला मांजर दिसलीच नाही. चष्मा नसल्याने बेडकासारखे बाहेर आलेले त्याचे डोळे, फक्त चष्मा कुठे पडलाय हेच शोधण्यात गुंग होते. त्याला कालियाच्या पुढे पडलेला चष्मा दिसला आणि तो कालियासमोर जाऊन उभा राहिला. 


जर मांजर जागची हलली नसती तर संग्रामने विजेच्या वेगाने फेकलेली वीट सरळ तिच्या डोक्यातच बसली असती पण तेवढ्यात मांजरीने कसोशीने पुढचे दोन पाय भिंतीवर रोवून स्वतःला वर ओढून घेतलं. विटेचा आघात खाली भिंतीवर लोंबणाऱ्या मांजरीच्या शेपटीवर झाला. त्यासरशी जोरात ठप्प असा आवाज झाला. शेपटी वीट आणि भिंतीच्या मध्ये चेपली जाऊन अत्यंत घाणेरड्या आवाजात मांजर किंचाळली आणि भिंतीपलीकडे उडी मारून पळाली. पण संग्रामने पूर्ण ताकद लावून फेकलेली वीट एवढ्या जोरात भिंतीवर आदळली होती की तिचे अर्ध्यातून दोन तुकडे होऊन मागे उडाले. त्या दोन तुकड्यांच्या वेगात मात्र तिळमात्र बदल झालेला नव्हता जशी काय ती भिंत रबराचीचं बनलेली होती. विटेच्या एका तुकड्याने जयकिशनच्या डोक्यावर ठप्प असा आवाज करत जोरदार आघात केला आणि दुसरा तुकडा नेमका कालियाच्या समोर चष्मा शोधण्यासाठी उभा राहिलेल्या विनयच्या डोक्याच्या दिशने वेगात निघाला. नेमकं त्याच वेळेस विनय चष्मा उचलण्यासाठी खाली वाकला आणि विटेच्या दुसऱ्या तुकड्याने कालियाचा कपाळमोक्ष केला. मग जयकिशन आणि कालिया एकापाठोपाठ जमिनीवर धप्प आवाज करत पडले. 


झालेल्या आवाजाने विनय आधीच घाबरला होता. त्याने चष्मा डोळ्याला लावला आणि सर्वात आधी वळून जयकिशन जिथे उभा होता तिथे पाहिलं. खाली जमिनीवर निपचीत पडलेला जयकिशन त्याला दिसला. त्याच्या डोक्यावर झालेली जखम, त्यातून येणारं रक्त आणि शेजारीच पडलेली रक्ताने माखलेली अर्धवट वीट त्याला दिसली. त्याने हळूच वळून, तो स्वतः सोडून पटांगणात उभा असणारा एकमेव माणूस, संग्राम कडे पाहिलं. संग्राम अजूनही वीट फेकून नेमकं काय झालं याचा विचार करत तसाच वीट फेकलेला हात समोर ठेवून उभा होता. संग्रामने वीट फेकून जयकिशनला मारलं एवढंच विनयला समजलं.


विनयचा रागाने थरकाप उडाला. अंगावरचे केस ताठ उभे राहिले. संग्रामकडे पाहत त्याचे डोळे रागाने एवढे लाल झाले की जसं काय डोळ्यात रक्तच उतरलंय. एक भयंकर सणक त्याच्या डोक्यात गेली. आणि भयानक मोठ्या आवाजात "तुझ्या आईची ..." असं म्हणत त्याने शिव्यांचा जो काय वर्षाव चालू केला की जसकाय मशीन गन मधून गोळ्याच बाहेर पडत आहेत. पहिले काही क्षण संग्रामला समजलंच नाही की काय झालं. आपोआप त्याचे दोन्ही हात स्वतःच्या कानावर गेले. जोरात कान दाबून धरत तो खाली बसला. कितीही कान दाबला तरी विनयचा आवाज सतत येत होता. डोकं भयंकर दुखायला लागलं. कान जोरात दाबल्यामुळे की शिव्यांमुळे हे त्याला समजलंच नाही. संग्राम आता जमिनीवर पडून गडाबडा लोळायला लागला होता. 


फक्त संग्रामच नाही, तर जयकिशन आणि कालिया सोडून, पटांगणातील सगळी पोरं आता कानावर हात ठेवून जमिनीवर वेड्याचा झटका आल्यासारखे लोळत होते. जखमी नाग्या काशीद सुद्धा कसाबसा गुडघ्यांमध्ये डोकं घालून शरीराला कमीत कमी झटके बसतील याची काळजी घेत होता. पिराजीने स्वतःला तुटलेल्या दरवाजाखाली लपवून वाचण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि तो आता दरवाजा अंगावर घेऊन खाली पडलेल्या भांड्यांच्या पसाऱ्यात आणि दुधात लोळत होता. आत्तापर्यंत वाड्यामागच्या गोठयातल्या गाईंनी ओरडत मानेला हिसके देत स्वतःला दावणीतून मोकळं केलं होतं. आणि पटांगणाच्या बाजूने असणाऱ्या कच्च्या रस्त्याने त्या सैरावैरा धावत निघाल्या.  


६. आर डी एक्स


रात्रीचे साडे बारा वाजत आले होते. वाघवस्तीच्या पाटीजवळून सरळ जाणाऱ्या पक्क्या रस्त्याच्या शेवटी विलासराव म्हस्क्यांनी पोलिसांची जीप उजवीकडच्या कच्च्या रस्त्यावर वळवली. अचानक समोरून जोरात धावत गाईंचा घोळका येत होता. ते पाहून आपल्याला खरंच आज खूप चढली का अशी शंका विलासरावांच्या मनाला चाटून गेली. त्यांनी लगेच ब्रेक दाबून जीप पूर्णपणे थांबवली. जीपला चुकवत पंधरा-वीस गाई रस्त्याच्या दोन्ही कडेने निघून गेल्या. भास तर झाला नाही असं वाटून म्हस्क्यांनी इन्स्पेक्टर पाटलांकडे एक कटाक्ष टाकला. पाटील सुद्धा कपाळावर आठ्या आणत म्हस्क्यांकडे पाहत होते. मग दोघांनीही एकाच वेळी खांदे उडवले. काहीच न बोलता म्हस्क्यांनी जीप परत चालू केली. वाघमाऱ्यांचा वाडा आता फक्त आणखी तीन-चारशे फूट अंतरावर होता.


पोलिसांची जीप रस्त्याच्या शेवटी येऊन पटांगणाच्या कोपऱ्याला थांबली. लांबून त्यांना काय झालं हेच समजलं नाही. एक गोरा चष्म्यावाला मुलगा उभा राहून काहीतरी तावातावाने बोलत होता आणि बाकी आठ-नऊ जण खाली लोळत होते. म्हस्क्यांनी जशी जीपची चावी काढली आणि इंजिनचा आवाज बंद झाला तसा विनयचा आवाज त्यांच्या कानावर पडला. जीपमधल्या सगळ्यांनी कानावर हात ठेवले आणि डोकं खाली घातलं. अचानक त्याचंही डोकं दुखायला लागलं.


मागे बसलेल्या हवालदार कावळेंनी सुद्धा कानावर हात ठेवले, पण डोकं खाली टाकून बसण्याची प्रबळ इच्छा दाबून ते आपल्या जागेवरून पराकाष्टेचा प्रयत्न करून उठले. तसेच मागे चालत जाऊन त्यांनी जीपच्या बाहेर उडी टाकली. कानावर हात ठेवूनच पटपट चालत ते विनयसमोर जाऊन उभे राहिले. विनयचं संग्राम सोडून दुसरीकडे कुठंच लक्ष नव्हतं. दोन्ही कान तसेच जोरात दाबून धरत कावळेंनी एक क्षण विचार केला. मग त्यांनी आधी डाव्या कानावरचा हात काढून चपळाईने विनयच्या चष्मा काढला आणि लगेच उजव्या हाताने एक खाडकन विनयच्या कानाखाली मारली. परत लगेच दोन्ही हात कानावर दाबून कावळे विनयकडे पाहू लागले.


गाढ झोपेतून, बादलीभर थंड पाणी अंगावर टाकल्यानंतर खडबडून जागा होणाऱ्या माणसासारखा, विनय जागा झाला. आणि नेहमीसारखा शांत झाला. कदाचित जरा जास्तच शांत. 


विनयचं बंद झालेलं तोंड पाहून कावळेंनी कानावरचे हात काढून अजूनही डाव्या हातात असणारा चष्मा विनयकडे दिला. विनय चष्मा डोळ्यावर लावत जयकिशनकडे धावला. जयकिशनचा खांदा जोरजोरात हलवत त्याच्या नावाने ओरडायला लागला. तोपर्यंत कावळेंनी पुढे जाऊन जयकिशनच्या नाकापाशी बोट लावून खात्री केली की तो फक्त बेशुद्ध झाला आहे आणि लगेच पायातला बूट काढून त्याचा घाणेरडा वास जयकिशनला दिला. जयकिशन शुद्धीवर आला आणि ओरडणाऱ्या रडकुंडीला आलेल्या विनयकडे पाहून म्हणाला "भाई रो मत, कुछ नहीं हुआ मूझें."


इकडे आत्तापर्यंत म्हस्क्यांनीपण कावळेंचं अनुकरण करत स्वतःच्या बुटाचा वास देऊन कालियाला शुद्धीवर आणलं होतं. लोळणारा संग्राम आता उठून बसला होता पण विनयकडे घाबरून पाहत कानावरचा हात काढू का नको हाच विचार करत होता. पिराजी घाबरून दरवाजाखालीच पडून होता आणि नाग्याने अजूनही डोकं गुडघ्यांमध्ये दाबून ठेवलं होतं.


पुढच्या दहा-पंधरा मिनटात पाटलांनी आणि दोन्ही हवालदारांनी पळापळ करून सगळ्या पोरांना पाणी पाजलं, नाग्याला उचलून आतमध्ये बेडवर झोपवलं, पिराजीला दरवाजाखालून शोधून काढलं, कालिया आणि जयकिशनच्या डोक्यावरच्या जखमांना जीप मधल्या प्रथमोपचाराच्या पेटीतून रक्तस्राव थांबण्यापुरत्या पट्ट्या केल्या आणि मग विनय आणि जयकिशनला पंडित बरोबर जीपमध्ये मागे बसवलं. कावळेंनी कालिया आणि नाग्या काशीदसाठी फोन करून ऍम्ब्युलन्सला वाघमाऱ्यांच्या वाड्याचा पत्ता दिला. जयकिशन धडधाकट होता हे पाहून त्याला मुद्दामून ऍम्ब्युलन्स मध्ये न पाठवायचा विचार करून पाटलांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ. नाहीतर औंध हॉस्पिटल मध्ये परत मारामाऱ्या होतील.


वाड्याच्या तुटलेल्या दरवाजासमोर संग्राम, पाटलांचं आणि दोन्ही हवालदारांचं मनापासून आभार मनात म्हणाला "देवासारखं आलात पाटील साहेब तुम्ही. आजचा दिवसच लय वाईट होता." मग जीपकडे पाहत पुढे म्हणाला "त्या पोरांना मात्र सोडू नका. त्या गोऱ्या ढापण्याला तर अजिबात नाही. आजून कान दुखतोय माझा."

"कोणता गुन्हा लावायचा त्यांच्यावर संग्रामराव? आलेत शिकायला पुण्यात. झाली चूक. द्या सोडून. पोलीस चौकीत नेवून चांगले फटके देतो. परत कधी इकडं फिरकणार नाहीत. मग तर झालं?" पाटलांनी भुवया उडवत विचारलं.

नाराज होतं मानेनेच संग्राम हो म्हणाला.

पाटील पुढे म्हणाले "तसा कावळेंनी फोन लावला होता. तुम्ही उचलला नाही."

"सायलेंट वर आसन. सभेपासून सायलेंट वर होता. आजच्या सभेत दारू पुरवायचं काम आमच्याकडंच होतं." संग्राम म्हणाला आणि मग पुढे काहीतरी आठवत म्हणाला "त्याच्याहून आठवलं. तुमचा हफ्ता द्यायचा होता उद्या सकाळी. आत्ताच घेऊन जा."

मग पिराजीला ओरडत सांगितलं "पिराजी, त्या नाग्याने नवीन इंपोर्टेड माल आणलाय. त्यातलं एक खोकं घेऊन ये गोडावून मधून आणि साहेबांना दे."


तोपर्यंत ऍम्ब्युलन्स तिथे हजर झाली. त्यात कालिया आणि नाग्याला घेऊन आणखी एक-दोन जणांसोबत संग्राम औंध हॉस्पिटलला निघून गेला. त्याआधी संग्रामने बाकी पोरांना उधळलेल्या गाई शोधून आणायला पाठवून दिलं. 


आता म्हस्क्यांनी जीप वळवून घेतली होती. मागे जीपमध्ये हवालदार कावळे त्यांच्याबरोबर बसलेल्या विनय, पंडित आणि जयकिशनशी बोलत होते "सांगवी मध्ये चुकून राहू नका तुम्ही. त्याऐवजी विद्यापीठाच्या हॉस्टेल वर रहा. पॅरासाईट म्हणुन कितीतरी लोक राहतात तिथं." आणि स्वतःचा फोन नंबर देऊन सांगितलं की काही प्रॉब्लेम आला तर फोन करा. त्यांच्या कुठल्यातरी काकांच्या खूप ओळखी आहेत विद्यापीठामध्ये. 


तोपर्यंत पिराजी एक भलं मोठं खोकं घेऊन आला. आधी जीपमधे पुढे बसलेल्या इन्स्पेक्टर पाटलांच्या बाजूने जाऊन उत्साहाने म्हणाला "नाग्या सांगत व्हता एकदम बॉम्ब माल हाये. कस्टम मध्ये अडकला व्हता."

'बॉम्ब' ऐकून विनय, पंडित आणि जयकिशन, कावळे हवालदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, पिराजी आणि पाटलांचं संभाषण लक्ष देऊन ऐकू लागले. 

पाटील खुश होऊन खोक्याकडे इशारा करत म्हस्क्यांकडे पाहून म्हणाले "म्हस्के, म्हणलं होतो ना तुम्हाला फॉरेनचा स्टॉक देतो म्हणुन."

खोक्यावरचं नाव लांबूनच वाचत म्हस्के म्हणाले "सही ना साहेब. मानलं तुम्हाला."

मग पाटलांनी पिराजीला उद्देशून सांगितलं "जा ते मागं बसलेल्या कावळे हवालदारांकडं देऊन ये".

काय पाहायला मिळणार या विचाराने विनय, पंडित आणि जयकिशनच्या छातीचे ठोके जोरात पडायला सुरुवात झाली. पिराजी खोकं घेऊन जीपच्या मागे गेला. खुनशी नजरेने विनय, जयकिशन आणि पंडितकडे पाहत पिराजीने ते खोकं कावळेंच्या हातात दिलं. तिघांनी त्या बिअरच्या खोक्यावरचं नाव वाचलं "RDS Brown Ale" आणि कपाळावर हात मारून घेतला. 


७. शाप


दुसऱ्या दिवशी जयकिशन, विनय आणि पंडितने सांगवीची रूम खाली केली आणि पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलवर पॅरासाईट म्हणुन राहू लागले. भौतिकशास्त्र विभागामध्ये लोकांना फक्त एवढंच कळलं की चालत्या बस मधून पडल्यामुळे जयकिशनचं डोकं फुटलं. तिघांनी ठरवूनच ही खोटी कथा सर्वांना सांगितली होती. तिघांनी हा विषय परत कधीच काढला नाही आणि कधीच मुळा नदीपलीकडे सांगवीच्या बाजूला एकदाही पाऊल टाकलं नाही.


अजूनही जयकिशनचं भगत सिंग वरचं प्रेम कमी झालेलं नाही पण तो आता जास्त प्रॅक्टिकल वागतो. विनय आणखीच शांत झाला आहे. पंडित मध्ये मात्र काहीच बदल झालेला नाही. 


इकडे वाघवस्तीवर दुसऱ्याच दिवशी वाघमाऱ्यांच्या वाड्यावर झालेल्या हाणामारीची गोष्ट सगळीकडे पसरली. नाग्या काशीदने कसं पिसाळलेल्या भैय्यांना जबरदस्त मारलं याच्या गोष्टी लोक रंगवून सांगू लागले. कालियाने कसा संग्राम वरचा वार डोक्यावर झेलला किंवा संग्रामने कसं एका विटेत दोन भैय्यांना बेशुद्ध केलं आणि त्या रानटी मांजरीची शेपटीपण तोडली, या गोष्टी स्वतः कालियाने आणि संग्रामने सगळ्यांना अनेकवेळा ऐकवल्या. तेव्हापासून वाघ वस्तीवर 'एका दगडात दोन पक्षी मारणं' या बरोबर 'एका विटेत तीन प्राणी मारणं' असा वाक्यप्रचार रुजू झाला.  


तो एका विटेचा वाक्यप्रचार कसा प्रचलित झाला यामागची गोष्ट आता लोक विसरून गेले आहेत. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे त्या घटनेनंतर तीन-चार महिन्यात हळूहळू एक-एक करून संग्राम वाघमारेच्या टोळीतले लोक वाघवस्ती सोडून निघून गेले. लोकांच्या मते वाघमाऱ्याच्या वाड्याला आणि आसपासच्या घरांना भुताने झपाटले किंवा कसलातरी भयानक शाप बसला. सर्वात आधी वाघमाऱ्यांचा दुधाचा धंदा बसला. त्यांच्या सगळ्या गाईंनी दूध देणं हळूहळू बंद केलं. एक-दोन आठवडयात वाघमाऱ्यांनी सगळ्या गाई विकून टाकल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या विकत घेतलेल्या गाई-म्हशी सुध्दा वाघमाऱ्यांच्या गोठ्यात आटून जात. काही लोकांच्या मते याच कारण म्हणजे वाघमाऱ्यांच्या वाड्याला शेपूट तुटलेल्या काळ्या मांजरीने दिलेला शाप होता.  


खरं तर दुसऱ्याच दिवसापासून वाघवस्तीवर नऊ जणांना निद्रानाशाचा भयंकर आजार झाला. हे नऊ जण म्हणजे कालिया सोडून ज्या लोकांनी आदल्या रात्री पंधरा मिनिटं विनयच्या शिव्यांचा मारा सहन केला ते. कालिया बेशुद्ध पडल्यामुळे एकटाच वाचला. संग्राम आणि त्याच्या टोळीतल्या या आठ जणांना जरा थोडी झोप लागली की अचानक प्रचंड डोके दुखून जाग यायची. काहींना डोळे मिटले की भयंकर स्वप्न पडायची त्यात एक चष्मा लावलेली पांढरी हडळ चित्रविचित्र मंत्र म्हणत आहे असं दिसायचं. पिराजीला ती हडळ दरवाजा मागे लपून बसलेली किंवा घरातल्या मांडणीवर बसलेली दिसायची. तर नाग्याला एक भला-मोठा राक्षस त्याला डोक्यावर गरगर फिरवत मंत्र म्हणताना दिसायचा. नऊचे नऊ जण लालभडक डोळे घेऊन वाघवस्तीवर फिरायचे. त्यांनी वाट्टेल ते दवाखाने, तंत्र-मंत्र, जादू-टोणा उतरवण्याचे प्रकार वगैरे केले पण काहीच फरक पडला नाही. फक्त वाघवस्तीपासून दूर गेल्यावरच त्यांना नीट झोप लागत असे. 


मग हळूहळू संग्राम सहित टोळीतले ते आठ जण विस्थापित झाले. पिराजी धुळ्याला त्याच्या गावी निघून गेला आणि सर्जेराव आबांच्या ओळखीने त्याने तिथे नवीन टोळीमध्ये आता जम बसवलाय. त्या रात्रीनंतर कायमचा लंगडत चालणाऱ्या नाग्या काशीदला आता लोकं लंगडा काशीद नावाने ओळखू लागले होते. या लंगड्या काशीदला घेऊन संग्राम आता नाशिकला आबांचा कारभार पाहत आहे आणि त्या दिवशीच्या सभेच्या नेत्याच्या ओळखीने राजकारणात उतरण्याचे प्रयत्न करत आहे. इकडे नव्या-सांगवी मध्ये राहून सच्चू कालिया एकटाच आबांचं सांगवीचं साम्राज्य सांभाळतो.    


आजही संग्राम आणि कालिया एकदम जिवलग मित्र आहेत. कामानिमित्ताने त्यांची भेट बऱ्याचदा होत राहते. खूप दिवस भेट झाली नाही तर कालिया हटकून संग्रामला तंबाखू मळत व्हिडीओ कॉल करतो आणि दर वेळेस संग्राम न चुकता "भाडखाऊ, हात धुतला का तशीच मळतो?" या प्रश्नानी बोलायला सुरुवात करतो.  


दहा वर्षांनंतर आजही संगमेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी लोक 'वाघवस्ती'च्या मोडकळीस आलेल्या पाटीपासून सरळ जाऊन मग डाव्या बाजूच्या रस्त्याला वळतात. पण पूर्वी तिथे असणारा ऊजव्या बाजूचा कच्चा रस्ता आता लोक विसरले आहेत. आता त्या जुन्या रस्त्यावर छोट्या-मोठ्या बाभळीच्या झाडांची गर्दी झाली आहे. त्या झाडां-झुडपांमधून वाट काढून गेलं की साधारण चारशे फुटांवर एका जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. हा जुना वाडा म्हणजे वाघमाऱ्यांचा शापित वाडा. असं सांगतात की तिथे गेल्यावर अचानक लोकांचं डोकं दुखायला लागतं. काहींच्या मते तिथे चित्रविचित्र आवाज येतात. काहींना शिव्या ऐकायला येतात तर काहींना कुणाच्यातरी छातीवर जोरजोरात मारल्याचा धाडधाड आवाज येतो. तिथे आजही एक शेपूट तुटलेली भुताटकी काळी मांजर लोकांना अधूनमधून दिसते. 


वाघमाऱ्यांच्या शापित वाड्याजवळ कुणीही पंधरा-वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही असाही लोकांचा समज आहे. याला एक अपवाद फक्त सच्चू कालियाचा आहे. हा कधी कधी या वाड्यापाशी येऊन बराच वेळ थांबतो. लोकांच्या मते या देखण्या सच्चू वर ती शेपूट तुटलेली काळी मांजर भाळलीय आणि त्यामुळंच सच्चूला वाड्याचा कधीच त्रास झाला नाही!


- विक्रम खैरे (३ मे २०२०)

८ टिप्पण्या:

  1. Abhinandan..Pudhil bhaghachi aturtene vat baghat aahot...Kaliya ani kalich prem katha

    उत्तर द्याहटवा
  2. Naya hai wah. Pan aisa lagta nahi hai ki naya hai wah...
    Mast hai yah!

    उत्तर द्याहटवा
  3. अंधारात चाचपडत जाताना सारखे वाटत रहाते की काही तरी होणार, काही तरी होणार आणि जेंव्हा खरोखरी काही घडू लागते तेंव्हा ते इतक्या झटपट घडते की त्या धक्यातून सावरायला ही वेळ मिळत नाही!
    वर्णनातून सर्व दृष्य डोळ्यासमोर उभे राहिले. सांगवी ऐकून माहिती आहे पण आता तिथे खरोखर असा पडका वाडा आहे का हे पहायची इच्छा झाली आहे.
    चित्रही एकदम छान रेखाटले आहे.

    उत्तर द्याहटवा