बुधवार, ८ मार्च, २०२३

आठवणी

आठवणी


    भरत आणि माझी पहिली भेट कोळगावच्या श्री कोळाईदेवी विद्यालयात झाली. या शाळेत आंम्ही दोघे पाचवी ते दहावी पर्यंत एकाच वर्गात होतो. परंतु आमची खरी ओळख सातवीला झाली. भरत आणि मी, दोघेही दोन छोट्या वाड्यांमधून गावातल्या शाळेत यायचो.  मी तोंडेवाडी मधून दोन किलोमीटर चालत यायचो तर भरत साकेवाडी मधून चार किलोमीटर चालत. वाडीतल्या २५-३० मुलांच्या शाळेमधून हजार-बाराशे मुलांच्या गावातल्या शाळेत आलं की बुजल्यासारखं व्हायचं. वाडीत एका वर्गात फार फार तर ७-८ मुले असायची. या शाळेत एका वर्गात मुलांची संख्या ६५-७० पर्यंत असायची. अशा वेळी पहिले दोन वर्ष तर मुलांच्या ओळखी होण्यातच निघून जायचे. वाडीतल्या शाळेत तुम्ही कितीही हुशार असलात तरी गावातल्या शाळेत आल्यावर खरी हुशारी समजायची. दोन वर्षानंतर मला आणि भरतला वर्गात जरा बरे मार्क्स वगैरे पडायला लागले आणि मग सातवीत असताना मी, भरत, मंगेश वगैरे असे दूरच्या वाड्यांमधून येणारी मुलं वर्गातल्या पहिल्या सात आठ मुलांमध्ये यायला लागलो. मग आपोआप ओळखी वाढायला लागल्या, नवीन मित्र बनायला लागले. 


    मला गावातल्या शाळेमधला जो काळ स्पष्ट आठवतो तो म्हणजे सातवी ते दहावी पर्यंतचा. आम्ही दूरच्या वाड्यांमधून येणारी खूप सारी मुलं दुपारच्या सुट्टीत एकत्र जेवण करायला बसायचो. त्यात आमच्या बरोबर भरत नेहमी असायचा. आठवीच्या वर्गात एका खिडकीच्या दोन गजांमध्ये मोठी फट होती. दुपारच्या सुट्टीत त्या फटीमधूनच उड्या टाकून शाळेमागे आम्ही डबे उघडून जेवायला बसायचो. नंतर एकदा पाटील सरांनी खिडकीतून उड्या मारणाऱ्या दोन पोरांना चोप दिला तेव्हा तो मार्ग बंद झाला. आमच्या जेवणाची पद्धत म्हणजे आम्ही ७-८ मुलं गोल वेढा करून बसायचो आणि प्रत्येकाच्या डब्यातली भाजी थोडी थोडी करून वाटून घायचो. कुणी चुकून डबा आणायचा विसरला तरी उपाशी राहत नसे. नंतर नंतर गावातली काही मुलेसुद्धा शाळेत डबा घेऊन यायला लागली. दहावीला असताना आम्ही सगळी मुलं शाळेमागच्या डुबल मळ्यापर्यंत चालत जायचो आणि एका मोठ्या झाडाखाली बसून जेवण करायचो. मग माघारी येताना शेतांमधल्या सगळ्या बोरीवरचे पिकलेली बोरे पडायचो. त्यात भरत, मंगेश वगैरे मुलं बोरं पाडण्यात कमालीचे हुशार. यांचा नेम क्वचित चुकायचा. कधीकधी भरत बोरीवर चढून अख्खी बोर जोरजोरात हलवायचा आणि आम्ही खाली पडणाऱ्या बोरांचा सडा गोळा करायचो. मग शाळा सुटेपर्यंत वर्गात बोरं खात बसायचो. 


    भरतचा स्वभाव एकदम शांत होता. तो कधीच कुणाशी भांडला नसावा. वर्गात सर्वांना आडनावाने हाक मारायची सवय होती. वर्गशिक्षक हजेरी घेताना आडनाव आणि इंग्रजी इनिशिअल्स घेऊन नाव पुकारायचे. भरतचं नाव साके बी डी म्हणून पुकारलं जायचं. तर मग मुले याला बिडी नावाने चिडवायला लागले. पण हा मात्र मला कधीच चिडलेला आठवत नाही.


    आम्ही आठवी-नववीला पीटीच्या तासात कबड्डी खेळणं चालू केलं होतं. अर्थात मला कुणी टीममध्ये घेत नव्हतं. मी बाकीच्या मुलांचा खेळ पाहत बसायचो. मी, दिनेश आणि विक्रम (मोहारे) सारख्या अंगाकाठीने लहान असणाऱ्या पोरांना जर टीम मधे एखादा खेळाडू मिळत नसेल तरच कबड्डी खेळायचा चान्स मिळायचा. पण भरत, मंगेश, विठ्ठल वगैरे लोकांना स्वतःच्या टीममध्ये घेण्यासाठी भांडणं व्हायची. भरत आणि विठ्ठलची रेड असेल तर त्यांना पकडणं जवळपास अशक्यच असायचं. हे दोघे चार पाच पोरांना सहज ओढून मधल्या लाईन बाहेर घेवून जायचे. 


    भरत सातवीनंतर परीक्षांमध्ये वर्गातल्या मुलांना झपाट्याने मागे टाकायला लागला.  सुरुवातीला पाचवी सहावी मधे पहिल्या दहामध्ये नंबर मिळवणं कठीण जात होतं पण मग त्याने नववी-दहावीला अक्ख्या शाळेत दुसरा नंबर पटकावला. त्याचं एक कारण म्हणजे तो भयंकर अभ्यास करायचा आणि दुसरं म्हणजे त्याचं सुंदर हस्ताक्षर! तो खूपच नाजूक लिहायचा पण अतिशय वेगात. त्याच्या जाडजुड बोटांत शाईपेन पकडून तो एवढं नाजूक आणि सुंदर कसं लिहू शकतो असं प्रश्न आम्हाला पडायचा. मला स्वतःचं हस्ताक्षर वगैरे असं काही नव्हतं आणि मी मुद्दाम हुशार पोरांच्या वह्या घरी घेऊन जायचो आणि त्यांची लिहण्याची स्टाईल कॉपी करायचो. उदाहरणार्थ मी ह आणि ज प्रशांतचा कॉपी केला होता आणि मग स, र, य, वगैरे बरीच अक्षरं भरतची कॉपी केली. भरतच्या लिखाणाची स्टाईल मात्र मला पूर्णपणे कधीच जमली नाही. 


    माझं भूमिती एकदम कच्चं होतं म्हणून मी भरतकडून थोडं शिकून घ्यायला लागलो. तो मला प्रमेय वगैरे समजावून सांगायचा. मग दहावीला असताना मी परीक्षेचे जुने पेपर सोडवायला लागलो. ते सोडवताना खूप कंटाळा यायचा म्हणून मग मी ठरवलं की मुलांबरोबर पेपर टाईम लावून सोडवायचे. हे करायला विश्वनाथ आणि भरत दोघे तयार झाले. विश्वनाथ बरोबर मी मराठी आणि इंग्रजीची तयारी केली आणि भारत बरोबर बीजगणित आणि भूमितीची. आम्ही स्वतः प्रश्नपत्रिका बनवायचो आणि दुसऱ्याला सोडवायला द्यायचो. एकाच जागी बसून पेपर्स सोडवायचो आणि मग एकमेकांना तपासायला द्यायचो. भरत दरवेळी भूमितीमध्ये मला मागे टाकायचा. मी भरतसाठी कितीही अवघड प्रश्न काढले तरी तो ते सहज सोडवायचा. एकदा मी खूप विचार करून एक भूमितीचा विचित्र प्रश्न तयार केला. मला स्वतःला तो अर्ध्या तासात सुटत नव्हता. मला वाटलं की आता हा प्रश्न तरी भरतला सुटणार नाही किंवा कमीत कमी त्याला टाईम तरी पुरणार नाही. पण त्याने तो प्रश्न वेगळ्याच पद्धतीने दोन मिनटात सोडवला. नंतर मलाच समजावून सांगितलं की हा किती सोप्पा प्रश्न होता. 


    दहावीनंतर मात्र आम्ही दोघे वेगवेगळ्या मार्गाने निघून गेलो. तो आणि बरेच मित्र प्रवरानगरच्या जुनिअर कॉलेजला गेले आणि मी अहमदनगरला. नंतर माझी त्याच्याशी भेट झाली ती थेट बारावी नंतरच. भरतची घरची परिस्तिथी खूपच हालाकीची होती पण शाळेतली त्याची प्रगती पाहून भरतच्या शिक्षणाचा खर्च त्याच्या चुलत्यानें केला. भरत त्यांना मदत करायला गावातील चुलत्यांच्या किराणा दुकानामध्ये कधीकधी काम करायचा. मी बारावी नंतर एकदा त्याला त्याच दुकानात भेटलो. भरतला बारावीला चांगले मार्क्स मिळाले होते परंतु मेडिकल एंट्रन्समध्ये कमी मार्क्स मिळाल्याने त्याचं ऍडमिशन MBBS साठी होणार नव्हतं. त्याला MBBS करायची खूप इच्छा होती परंतु आता ते जमणार नव्हतं. त्याला DEd करण्यासाठी लोक आग्रह करत होते. मी त्याला सांगितलं की खूप सारी मुलं गॅप घेऊन परत परीक्षेची तयारी करतात. नगरमध्ये मी  बारावीच्या तयारीसाठी आडसूळ-क्लास लावले होते. त्या क्लासमधले कितीतरी जण परत गॅप घेऊन मेडिकलची तयारी करणार होते. मी भरतला सांगितलं की तू सुद्धा परत एकदा प्रयत्न करून पहा. भरतने माझा सल्ला ऐकला, घरच्यांना गॅप घेवून देण्यासाठी तयार केलं आणि नगरला अडसूळ-क्लास जॉईन केले. आणि मग पुढच्या वर्षी मेडिकल एंट्रन्समधे ह्याने ९५% मार्क्स मिळवले आणि पुण्यातील प्रतिष्टीत बी जे मेडिकल कॉलेजला MBBS साठी ऍडमिशन मिळवलं.  हा नंतर भेटला की म्हणायचा की तुझ्यामुळे मी डॉक्टर झालो. जे की काही खरं नाही. नुसता सल्ला देणारे हजार लोक सापडतील, तो सत्यात उतरवणारा एखादाच असतो. मेडिकल एंट्रन्समधे ९५% मार्क्स मिळवायला आणि MBBS सहजपणे पास व्हायला किती मेहनत लागते याची आपण कल्पनापण करू शकत नाही. 


    मी BSc नंतर एक वर्ष गॅप घेवून Physics ची तयारी करत होतो. त्यावेळी काही कारणांमुळे माझे पैसे संपले होते आणि मला पुढचे ३-४ महिने राहण्यासाठी जागा हवी होती. तेव्हा मला स्वप्नीलने भरतकडे चौकशी करायला सांगितलं. मी भरतला फोन केला तर त्याने मला लगेच त्याच्या हॉस्टेल वर बस्ता गुंडाळून यायला सांगितलं. मी दुसऱ्याच दिवशी औंध मधून बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पोहोचलो. त्याने त्याच्या रूममध्ये एक गादी टाकून माझी राहायची व्यवस्था केली. एवढंच नाही तर त्याने त्यांच्या मेसमध्ये माझ्या जेवणाचीपण व्यवस्था करून दिली. तो स्वतः मेस चा सेक्रेटरी होता हे मला नंतर समजलं. त्याच्या ओळखीने मी मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचो. 


    बी जे मेडिकल कॉलेजच्या जुन्या हॉस्टेलच्या रूम्स म्हणजे भले मोठे हॉल असायचे. भरत त्याच्या तीन वर्गमित्रांबरोबर अशाच एका मोठ्या रूम मध्ये राहत असे. म्हणजे मी चार भावी डॉक्टर्स बरोबर राहत होतो. मला वाटायचं की हि सगळी हुशार डॉक्टर मुलं सतत अभ्यास करत असावीत. तर असं काही नव्हतं. हे बाकी मुलांसारखेच  परीक्षेच्या फक्त एक दोन दिवस आधी अभ्यास करायचे. बाकीचा वेळ फक्त टाईमपास चालू असायचा. हे रात्रभर गप्पा मारत बसायचे, मोबाईलमध्ये गेम्स खेळत राहायचे आणि टाईमपास पत्ते खेळायचे. रात्री एक दोन वाजता पुणे स्टेशनवर जाऊन त्यांच्या एका आवडीच्या हॉटेलमधून लस्सी किंवा मसाला दूध प्यायाचे. मी सुद्धा खूप वेळा त्यांच्याबरोबर गेलो. एवढं सगळं होऊन मग पहाटे ४-५ला सर्व झोपी जायचे परंतु सकाळी ८ लाच उठून मेडिकल प्रॅक्टिसला निघून जायचे. खरं म्हणजे परीक्षांपेक्षा हि सकाळची मेडिकल प्रॅक्टिस खरा डॉक्टर घडवते. हे मात्र सर्व डॉक्टर्स न चुकता मन लावून करायचे. त्यांना माहित होतं की कधी मनसोक्त मजा करायची आणि कधी मन लावून काम करायचं.


    भरतची एक सवय मात्र मला थोडी विनोदी वाटायची. मला सकाळी जाग आली की अंथरुणावर खूप वेळ पडून राहायची सवय आहे. भरतचं त्याच्या नेमकं उलटं होतं. त्याला सकाळी जाग आली की तो तटकन उठून बसायचा आणि लगेच खाटेवरून उतरून उभा राहायचा. मग एक-दोन आळोखे पिळोखे देवून लगेच ब्रश आणि टॉवेल उचलून बाथरूमला निघून जायचा. त्याच्या खाटेजवळच खाली माझी गादी होती. तो खाटेवरून अचानक उतरला की मी दचकून उठून बसत असे. हे पाहून दरवेळी तो मला म्हणायचा "तू झोप, मी आलोच". मग दहा-पंधरा मिनटात हा अंघोळ वगैरे करून यायचा आणि आवरून प्रॅक्टिसला निघून जायचा.


    भरत मेडिकल कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात पुढाकाराने भाग घ्यायचा. तो स्वतः त्यांच्या एक-टप्पा क्रिकेट टीमचा कॅप्टन होता. या एक-टप्पा क्रिकेट मधे बॉलर हाप-पीच मधून स्लो बॉल टाकत आणि बॅट्समन तो बॉल जमिनीलगतच मारायचा प्रयत्न करत. मारलेल्या बॉलचा जरी एक टप्पा कॅच घेतला तरी बॅट्समन आऊट होत असे.  क्रिकेट ग्राउंड म्हणजे १५-२० मीटरचं वर्तुळ. त्याच्या बाहेर  टप्पा न पडता बॉल गेला तर ६ रन मिळविण्याऐवजी बॅट्समन आऊट होत असे. पण त्याला एक अपवाद होता. बॉलरच्या मागे बाऊंड्री वर हे लोक दोन बांबूचे खांब रोवायचे. दोन्ही खांबांमध्ये एक-दोन मीटरचं अंतर असायचं. जर कुणी त्या दोन खांबांमधून बॉल थेट ग्राउंड बाहेर मारला तर त्याला आऊट न होता ८ रन मिळायचे. त्याला हे लोक अठ्ठा मारला असे म्हणायचे. हे अठ्ठे मारण्यात भरत पटाईत होता. मला भरत त्यांच्या मॅच पाहायला घेऊन गेला होता. भरतच्या जीवावर दरवर्षी त्याची टीम पहिलं किंवा दुसरं बक्षिस नक्कीच मिळवायची.


    भरत आणि त्याच्या मित्रांबरोबर राहून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी मुलांमध्ये कधी जास्त मिसळत नसायचो. ते मला यांच्याबरोबर राहून आपोआप जमायला लागलं. ते तीन-चार महिने माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. यामुळे मी MSc ला असताना आपोआप मुलांमध्ये मिसळायला लागलो आणि मग मला खूप सारे नवीन मित्र भेटले. जुने शाळेतले मित्रसुद्धा नव्याने जवळ आले. 


    अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून सावरून MBBS करणाऱ्या भरतला नशिबाने मात्र कधीच साथ दिली नाही. मी भरतला शेवटचा भेटलो ते दिनेशच्या लग्नात. त्यावेळी मी, मंगेश आणि स्वप्नील पुण्यातच होते. मग आम्ही तिघे, संदीप आणि गावातील अजून काही मित्र दिनेशच्या लग्नाला आलो होतो. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही सर्व जण एका हॉटेलमध्ये भेटलो.  तिथे मला समजलं की भरत जेव्हा MBBS च्या शेवटच्या वर्षात होता तेव्हा त्याची आई कसल्यातरी दुर्धर आजराने दगावली. नंतर भरत त्यातून सावरून बाहेर पडला होता. MBBS  पूर्ण करून भरतने पाथर्डीला सरकारी दवाखान्यात गरजेची प्रॅक्टिस पूर्ण केली आणि कोळगावला परत येऊन दवाखाना चालू केला होता. गावातील एकमेव MBBS डॉक्टरचा दवाखाना होता तो. गावामध्ये अजूनही काही MBBS डॉक्टर्स होते पण सर्वांनी आपापले दवाखाने शहरांमध्ये टाकले होते. भरत हा एकटाच होता ज्याने गावामध्ये परत येवून दवाखाना टाकला. आणि अल्पावधीत त्याच्याकडे गावातील पेशंटची रांग लागली. मग भरतचं लग्न झालं. त्याची बायकोसुद्धा डॉक्टर आहे. मग हे दोघे डॉक्टर एकाच दवाखान्यात काम करायला लागले. असं सर्वकाही सुरळीत चालू होतं पण मग लग्नानंतर काही महिन्यांनी भरत भयंकर आजारी पडला. त्याला डेंग्यू झाला होता. त्यातून बाहेर पडताना त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. अशा परिस्थितीत तो वाचण्याची शक्यता जवळपास शून्य होती. त्यावेळी त्याच्या सासूने स्वतःची एक किडनी भरतला दिली. सुदैवाने ती किडनी भरतला सूट झाली. किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमध्ये किडनी सूट होणं खूप महत्वाचं असतं नाहीतर पेशंट हमखास दगावतो. अर्थात हे भरतला माहित होतं. आम्ही भेटलो तेव्हा तो म्हणाला की आत्ताचं आयुष्य त्याला बोनसमध्ये मिळालं आहे. आणि हे तो सगळ्या मित्रांना सांगायचा. पण हा बोनस एवढ्या लवकर संपेल असं मात्र मला कधीच वाटलं नव्हतं. 


    मी भरतला शेवटचं पाहिलं ते मागच्या शनिवारी. सकाळी साडे-आठच्या दरम्यान शाळेतील WhatsApp ग्रुप वर खूप सारे श्रद्धांजली मेसेजेस आले होते. मी पहिला मेसेज उघडून पाहिला तर त्यात भरतचा फोटो होता. मला काही क्षण समजलंच नाही की भरत गेला आहे. मग मला मंगेशने फोनवर सांगितलं की ते खरं आहे. त्याचा अंत्यविधी सकाळी दहा वाजता होणार होता. मी एक दिवस आधीच त्रिवेंद्रम वरून गावी आलो होतो. मी लगेच भावाबरोबर कोळगावला निघालो. अपेक्षा एवढीच होती की एकदा शेवटचं भरतला पाहावं. मी संदीपला फोन केला. तोसुद्धा गावात पोहचला होता. मग आम्ही दोघे भरतच्या घराजवळ गेलो. तिथे अंत्यविधीची तयारी चालू होती. गौऱ्या पेटवल्या होत्या, ताटी बांधून तयार होती आणि भरतला शेवटची अंघोळ घालत होते. त्याच्याभोवती खूप गर्दी झाली होती. मी संदीपला म्हणालो की एकदा भरतला पाहून येवू. आम्ही दोघे गर्दीतून वाट काढत तिथे गेलो पण खूप वेळ काहीच दिसेना. मग काही वेळानंतर अंघोळ झाल्यावर त्याला खाटेवर ठेवलं. तेव्हा फक्त काही क्षणांपुरता भरत आम्हाला दिसला. भरतचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. त्यावर कसलेच भाव नव्हते. डोळे बंद करून भरत शांतपणे झोपला होता. असं वाटतंच नव्हतं की तो आम्हाला सोडून गेला आहे. मला एका क्षणासाठी असं वाटलं की तो आता तटकन उठून बसेल आणि "तू झोप, मी आलोच" असं म्हणेल. पण अर्थात असं काही होणार नव्हतं. भरतच्या आयुष्याचा बोनस शेवटी संपला होता. अश्रू आवरत मी आणि संदीप बाजूला जावून उभे राहिलो.


    माझा आत्मा वगैरे गोष्टींवर विश्वास नाही. म्हणून मी त्याच्या आत्म्याला शांती मिळो वगैरे म्हणणार नाही. मला वाटतं की माणूस जगातून खऱ्या अर्थाने तेव्हा जातो जेव्हा लोक त्याच्या आठवणी विसरतात. भरत अजूनही जिवंत आहे, माझ्या आठवणींमध्ये, जशाचा तसा. 


- विक्रम खैरे (८ मार्च २०२३)