शनिवार, १८ जुलै, २०२०

अभिमन्यु!



अभिमन्यु!


कित्ती हलकं वाटायला लागलं! मस्त गार वारा वाहतोय. तोही एकदम जोरात. कपड्यात शिरून, अंगा-खांद्यावरून, गालावरून, कानांवरून, थेट वरपर्यंत, डोक्यावरच्या केसांना उडवत. धुंद गार वारा. गुंग करणारा. हात पसरून असंच राहावंसं वाटतं. इथेच. कायमचं.


मला डोंगर दऱ्यांतून फिरायला भयंकर आवडतं. इतकं की मी तहानभूक विसरून नुसता फिरत असतो. बैराग्या-सारखा. म्हणजे पूर्वी खूपच कमी होतं. फक्त शनिवारी आणि रविवारी. दर सोमवारी ऑफिसमध्ये गेलं की आधी एक तास फक्त बेत आखायचो. कुठे फिरायला जायचं, कोणते डोंगर-किल्ले चढायचे, ते ठरवायचो आणि मगच कामाला लागायचो. शुक्रवारी ऑफिस संपेपर्यंत फक्त काम. खूप सारं काम उरकायचं आणि निघायचं भटकंतीला!


आतासुद्धा मी फिरतोय, हरिश्चंद्र गडावर! हा सह्याद्री पर्वतरांगेतला अत्यंत सुंदर पण दुर्गम डोंगर. माझा आवडता डोंगर! याआधी इथे मी कित्येक वेळा आलोय. वेगवेगळ्या वाटेनं. कधी अवघड नाळीची वाट तर कधी सोपी पाचनईची नाहीतर नेहमीची खिरेश्वरवरून दाट जंगलातून जाणारी! दरवेळी आलं की मी आधी तारामती शिखरावर चढतो. केदारेश्वराच्या लेणीमध्ये जातो. कमरेपर्यंत पाण्यात उतरून शिवलिंगाचे दर्शन घेतो आणि हमखास कोकण कड्यावर जाऊन येतो. म्हणजे आता कुणीच त्या रेलिंग्सच्या पलीकडे एक पाऊलसुद्धा ठेवत नाही, पण दहा-बारा वर्षांपूर्वी लोक त्या सुंदर कड्याच्या कडेपर्यंत जायचे. तिथल्या काळ्याभिन्न दगडावर झोपून खाली पाहायचे. तीन हजार फूट खाली! काय अप्रतिम देखावा! पण मला कितीही इच्छा झाली तरी मी कधीच दिवसाढवळ्या त्या रेलिंग्स पार केल्या नाहीत.


तसा कोकण कडा खूपच धोकादायक. इथून कित्येक लोक पडून गतप्राण झाले आहेत. जेव्हा रॅपलिंगची परवानगी होती तेव्हा सुद्धा अपघात झाले. त्यात मोठमोठे सराईत गिर्यारोहक गेले. आता मात्र सगळं बंद आहे. अपघातांची वाढलेली संख्या पाहून शेवटी पुरातत्व खातं जागं झालं आणि त्यांनी या रेलिंग्स बांधल्या. खूप आधीपासून कोकण कड्याच्या माथ्यावर एक भेग होती. त्या भेगेने वेगळा झालेला, थोडासा अधांतरी असणारा, कड्याचाच पुढे आलेला एक भाग होता. एके दिवशी भयंकर पावसाने तो अधांतरी भाग ढासळला. लोकांच्या मते त्यानंतर हे सगळे अपघात वाढले. तसा या दोन्ही गोष्टीत काही संबंध नाही कारण अपघात आधीसुद्धा होतच होते पण लोकांच्या अंधश्रद्धा काही संपत नाहीत. उलट आता रेलिंग्समुळे अपघात कमी झाले आहेत हे मात्र नक्की! 


आज परत मी हरिश्चंद्र गडावर आलो. या आवडत्या डोंगरावर यायला तसं मला विशेष काही कारणही लागत नाही. तरीही खरं म्हणजे यावेळी येण्याचं मूळ कारण मात्र माझे आळशी मित्र आणि माझं भूतां-खेतांवरचं अनोखं प्रेम! म्हणजे माझा आजिबात विश्वास नाही असल्या गोष्टींवर पण माझे मित्र दरवेळेस नवीन गोष्टी शोधून आणतात. तसं पाहिलं तर त्यांचं काहीच चुकत नाही. लोकांचा कशावरही लगेच विश्वास बसतो. 


यावेळेची गोष्ट मात्र माझ्या कानावर आधीच आलेली, कोकण कड्याची! भोळ्या लोकांना आणि माझ्या मित्रांनापण वाटतं की कोकण कड्यावर काहीतरी चेटूक आहे. असं म्हणतात की कड्यावरून खाली पाहिलं की लोक गुंगतात. चक्कर येऊन कड्यावरून पडतात. म्हणून सारे अपघात झाले. मी प्रयत्न केला वाद घालायचा. जर असं आहे तर मग दहा-बारा वर्षांपूर्वी लोक कसे काय कड्यावरून डोकावून पाहायचे? तर याच उत्तर त्यांच्याकडे आधीच तयार होतं. कडा ढासळल्यापासून चेटूक चालू झालं. आधी नव्हतं. वर असा दावा केला की त्यानंतर जे कोणी रेलिंग्स पार करून गेले त्या सगळ्यांचा कडेलोट झाला. आता हे मात्र सत्य आहे. म्हणजे अर्धसत्य. ज्या थोड्या लोकांचा अपघात झाला त्यांनी रेलिंग्स पार केल्याच होत्या. रेलिंग्स न पार करता हनुमान उडी मारून कडा पार करणार का? कितीतरी लोक रेलिंग्स पार करून माघारी आलेच असतील. पण यांना कोण समजावणार! मी वाद घालून जिंकायला लागलो की यांचं शेवटचं अस्त्र म्हणजे 'तू बोलूच नकोस, तू देवावर विश्वास ठेवतो पण भुतांवर नाही'. मग दरवेळेसारखं शेवटी मीच हे धाडस करायचं ठरवलं आणि मित्रांना सांगितलं की तुमच्यासमोर रेलिंग्स पार करून कड्याखाली डोकावून दाखवतो. तशीही माझी खूप दिवसांपासून इच्छा होतीच असं करायची. 


नेहमीप्रमाणे माझ्या मित्रांनी आळशीपणा केला आणि ऐन वेळेला कलटी मारली. मलाही हे अपेक्षितच होतं. मला जाणवत होतं की माझ्या सारख्या-सारख्या भटकंतीमुळं मी एकटा पडतोय. मीही लोकांपासून जमेल तेवढं दूरच राहायचो. पण आता मी मित्रांसमोर माघार घेणार नव्हतो. मी सांगितलं की कोकण कड्यावरून सेल्फी काढूनच पाठवतो! कसलं चेटूक अन् कसलं काय! खरं तर त्यांनाही हे माहित आहेच. माझी नुसती फिरकी घ्यायचं काम करतात. एके काळी पुण्यातल्या भुताटकीच्या  कितीतरी जागांवर मी यांना घेऊन गेलोय, तेपण रात्री अपरात्री! पुणे विद्यापीठातल्या एलिस गार्डनमध्ये रात्री बारा वाजता थेट एलिसच्या समाधीवर नेलं, तेही अमावस्येच्या रात्री! सांगवीतल्या त्या शापित वाड्यावर सुद्धा नेलं. कसली भुतं अन् कसलं काय! तेव्हा आम्हाला काही कामं नव्हती. आता सगळे संसारात व्यस्त. मी सोडून. 


मी आज सकाळीच खिरेश्वरला आलो. अपेक्षेप्रमाणे पावसाची हलकी भुरभुर चालूच होती. किती सुंदर गाव! पावसात तर अजूनच सुंदर दिसतं. तिथले लोकपण खूपच प्रेमळ आणि भोळे. त्यांच्यापण त्याच अंधश्रद्धा. गावातून ती हरीशचंद्रांच्या डोंगरांची महाकाय रांग दिसली. ती पाहूनच डोळे तृप्त होतात. त्यात भर म्हणून आज तिच्यावर जमलेल्या पांढऱ्या-काळ्या ढगांनी काढलेली रांगोळी! पावसाळ्यात हरिश्चंद्र गड चढण्याची मजा काही औरच! सगळीकडे हिरवळ आणि थंड वातावरण. हिवाळ्याइतकं थंड नाही आणि उन्हाळ्याइतकं गरमपण नाही. नेमकं जसं हवं तसंच. आणि त्यात बरसणाऱ्या पावसाच्या सरी! 


मी त्या गावामागच्या गर्द हिरव्या घनदाट जंगलातून चालत तोलार खिंड गाठली. नेमकं तोलार खिंडीच्या मोठ्या खडकाजवळ आलो आणि जोरात पाऊस सुरु झाला. अगदी माझ्या मनासारखा! मग मी मस्त पावसात भिजत ती खिंड आणि पुढचे सात छोटे डोंगर पार करू लागलो. या सतत वर-खाली होणाऱ्या डोंगरवाटांवरून जाताना कधी कधी वाटतं की किती वेळ आपण याच रस्त्याने परत परत जात आहोत. मग मी गडावर पोहोचलो. किती वेळ लागला समजलंच नाही.


गडावर पोहोचल्यावर आधी मी तारामती शिखरावर जायला निघालो. आता पाऊस थांबला होता. धुकं कमी झालं होतं. सगळीकडे उमललेली सुंदर रानफुले दिसायला लागली होती. पांढरी, निळी, गुलाबी, लाल, पिवळी, मोरपंखी फुलं. कित्ती रंग! या रंगीत देखाव्याकडे पाहतच मी शिखरावर पोहोचलो. शिखरावरच्या भगव्या झेंड्याच्या कडेने खूप चकरा मारल्या, लहान मुलासारख्या. मग कितीतरी वेळ बसून राहिलो. इथे बसून वेळ कसा निघून जातो समजतच नाही. 


मग मी खाली उतरून हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात गेलो. जवळपास हजार वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिरं. बांधलेलं नाही तर चक्क कोरलेलंच. एका भल्या मोठ्या दगडातून कोरून बनवलेलं मंदिर! उंच रेखीव कळस आणि चहुबाजूने कोरलेल्या वेगवेगळ्या मोहक मुर्त्या. पाहणाऱ्याला गुंग करणाऱ्या. मी कितीतरी वेळ त्या मुर्त्या एकटक पाहत राहिलो, मंत्रमुग्ध झाल्यासारखा! असं वाटत होतं की माझ्याकडे खूप सारा वेळ आहे; इतका की तो संपतच नाही.

 

या मंदिराच्या उत्तरेला केदारेश्वराची मोठी लेणी आहे. त्यात चहुबाजूने पाणी आणि मध्ये एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या कडेने पुरातन काळी चार स्तंभ होते. लेणीच्या वरच्या कातळाला आधार म्हणून. त्या चार स्तंभांपैकी तीन कधीच तुटले आहेत आणि फक्त एकच शिल्लक राहिला आहे. अशी अख्ख्यायिका आहे की तो चौथा स्तंभ म्हणजे कलयुगाचा आधार! प्रत्येक स्तंभ पडला की त्याबरोबर एक युग संपतं. किंवा एक युग संपलं की एक स्तंभ तुटून पडतो. मागच्या तीन स्तंभांबरोबर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग संपलं. कलयुग हे शेवटचं युग. आता तो चौथा स्तंभ तुटला की कलयुगसुद्धा संपेल. जरी माझा देवावर विश्वास असला तरी हे म्हणजे काहीपण. जर खरं मानलं तर मग हे स्तंभ लाखो वर्षांपूर्वी बांधायला पाहिजे होते, पण हे तर जास्तीत जास्त हजार वर्ष जुने. तरी समजा हे सत्ययुगातल्या माणसांनी बांधले असतील तर त्या काळी साडे-तेहतीस फूट उंच माणसे होती. त्यांनी पाच फुटांचे खेळण्यातले खांब का बांधावेत? भोळ्या लोकांच्या भोळ्या अंधश्रद्धा! कुठेही काहीही जोडतात. खरंतर माणसाला जगबुडीच्या कल्पना करायला भयंकर आवडतं. या असल्या कल्पनेमागं माझ्या मते माणसाचा निव्वळ स्वार्थीपणा आहे. दुसरं काही नाही. म्हणजे प्रत्येक माणूस मरतोच; आज नाहीतर उद्या. पण मग तो मेल्यावर या जगाचं काय? म्हणून माझ्याबरोबर सगळं जगपण मरू देत; त्यासाठी जगबुडीची कल्पना करायची! मरू दे; मी पण मरणारच कधीतरी! मग मी त्या कमरेपर्यंत खोल, थंड नितळ पाण्यात प्रवेश केला. बर्फासारखं थंड पाणी! यात लोक जास्त वेळ उभे राहू शकत नाहीत. पण मला मात्र अश्या पाण्याचा अमाप अनुभव! मला काहीच फरक पडत नाही. त्यातूनच चालत-चालत मी शिवलिंगाला त्या चारही खांबांच्या कडेने प्रदक्षिणा घातली. त्या कलयुगाच्या खांबाला जोरात ढकलून पाहिलं. आजिबात हलला नाही. मी असं प्रत्येक प्रदक्षिणेबरोबर जोरात ढकललं तर? किंवा इथे दररोज येऊन ढकललं तर? पडेल का हा स्तंभ? होईल का सुटका या फेऱ्यातून? सर्वांची! का हे सुद्धा चक्रच आहे, कलयुगानंतर परत सत्ययुग?


आता मी कोकण कड्याच्या दिशेने निघालो. वारा जोरात वाहत होता. धुकं आता जवळपास पूर्ण निवळलं होतं. ढग विरळ होऊन निळं आकाश दिसायला लागलं. माझे कपडे आता पूर्णपणे वाळले होते. थोड्याच वेळात मला त्या रेलिंग्स दिसायला लागल्या. पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या आणि त्यावर लाल रेडिअमच्या पट्ट्या चिकटवलेल्या. आता अचानक वारा वाहायचा थांबला. मी त्या रेलिंग्सला टेकून उभा राहिलो. त्या रेलिंग्सच्या जवळपास वीस-पंचवीस फुटांवर तो कडा होता. संध्याकाळ व्हायला आली होती. मी तिथेच सूर्यास्त पाहत उभा राहिलो. क्षितिजावर आसपास विरळ पांढऱ्या ढगांचे आडवे पट्टे मारलेले होते. त्यातून तो लालभडक सूर्य हळूहळू क्षितिजावरून खाली उतरला. उतरताना तो चोहीकडच्या पांढऱ्या ढगांवर लाल-पिवळ्या रंगांची उधळण करत गेला. शेवटची कोर मात्र एक हिरवी चमक देऊन गेली. क्वचितच दिसणारं हे दृश्य पाहून आनंदाने माझे डोळे भरून आले. दिवस संपला.


आता या रम्य कातरवेळेत मी आजूबाजूला पाहून रेलिंग्सच्या वर चढलो आणि पलीकडे पाऊल टाकलं. अजून सगळं स्पष्ट दिसत होतं. पण विनाकारण माझ्या हृदयाचे ठोके जोरात पडायला लागले. तसा मी घाबरत नव्हतोच. हा तर साधा कोकण कडा. मी तर एलिस गार्डन मध्येपण घाबरलो नव्हतो. रात्री बारा वाजता दोन डोळे चमकले होते एलिसच्या समाधीवर. मग त्या डोळ्यांनी दोन उड्या मारल्या आणि समजलं की तो बेडूक आहे. इथे तर अजून टक्क उजेड आहे. मी तसा तर त्या सांगवीच्या पडक्या वाड्यातपण घाबरलो नव्हतो. अचानक कसलातरी आवाज आला होता आणि मग मीच घाबरलेल्या सर्वांना ते काळं मांजर दाखवलं होतं. इथंतर असं काहीच नाही. माझ्या हृदयाचे ठोके भीतीने नाही तर उत्सुकतेने वाढले होते कारण आता मी कोकण कड्यावरून डोकावून पाहणार होतो. 


मी हळूहळू पावलं टाकत कड्याच्या शेवटपर्यंत गेलो. मग मला सेल्फीची आठवण झाली. आता जिरवतोच सगळ्यांची म्हणत मी पॅन्टच्या खिशातून फोन काढला. एक मस्त सेल्फी घेऊन तो पाठवूनपण दिला. कसली भुते अन् कसलं चेटूक! कड्यावरून खाली डोकावणं म्हणजे अवघडंच प्रकार. पुढे कोण वाकणार? म्हणून मी तिथल्याच काळ्याकुट्ट कातळावर आडवा झोपलो आणि मुंडकं कड्यावरून पुढे करत डोकावून पाहिलं. कित्ती भयंकर खोल! मी काही काळ श्वास रोखून पाहतच राहिलो, तंद्री लागल्यासारखं. एवढं सुंदर की कितीही वेळ पाहिलं तरी मन भरणार नाही. त्यात अजूनही क्षितिजावर गडद लाल रंग पसरलेला. मग मी तिथंच उठून बसलो. कधी क्षितिजावरच्या देखाव्याकडे पाहत तर कधी खाली वाकून. इथेच बसून राहावं असं वाटत होतं. मी अजून काही वेळ थांबलो. मग क्षितिजावरची रंगांची उधळण लयाला गेली. तसा मी माघारी जायला उठून उभा राहिलो. सगळीकडे गडद शांतता पसरली होती. वाऱ्याची साधी झुळूक सुद्धा नव्हती. मी मात्र आता शेवटचं कड्याच्या खाली पाहिलं. किती मोहक! किती सुंदर! जगण्याचं सार्थक झालं हे पाहून! मग मी दोन्ही हात पसरवले आणि एक पाऊल उचललं. 


कित्ती हलकं वाटायला लागलं! मस्त गार वारा वाहतोय. तोही एकदम जोरात. कपड्यात शिरून, अंगा-खांद्यावरून, गालावरून, कानांवरून, थेट वरपर्यंत, डोक्यावरच्या केसांना उडवत. धुंद गार वारा. गुंग करणारा. हात पसरून असंच राहावंसं वाटतं. इथेच. कायमचं.


मला डोंगर दऱ्यांतून फिरायला भयंकर आवडतं. इतकं की मी तहानभूक विसरून नुसता फिरत असतो. बैराग्या-सारखा...


 

-- विक्रम खैरे (१३ जुलै २०२०)

"गूढकथा म्हणजे काय हे ज्यांच्याकडून शिकलो त्या दिवंगत रत्नाकर मतकरींना समर्पित!"

-----------------------------------------------------------

विशेष आभार: 

सूचना आणि दुरुस्त्या : अभिजित बेंद्रे, रामाशीष जोशी, प्रितेश रणदिवे, कैलास जाधव

मुखपृष्ठ : अभिजित बेंद्रे